पुणे: मलनि:सारण वाहिन्यांत वाहते भ्रष्टाचाराचे पाणी!
शहरातील पावसाने पालिकेच्या कारभाराचे पितळ उघडे पाडले असतानाच मलनि:सारण वाहिन्यांसाठीही पालिकेने मोठी उधळपट्टीच केल्याचे दिसून आले आहे. एवढेच नव्हे तर त्या वाहिन्यातूनही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचे पाणी वाहिल्याचे स्पष्ट होते आहे. पालिकेतील माननियांनी आतापर्यंत त्यासाठी कोट्यवधींचा निधी उधळल्याचे दिसून आले आहे.
२०२३-२०२४ च्या अंदाजपत्रकाव्दारे मलनि:सारण देखभाल, दुरुस्ती विभागाने तयार केलेल्या ‘सिव्हरेज मास्टर प्लॅन’ नुसार अपुऱ्या पडणाऱ्या अंदाजे १८० किलोमीटर लांबीच्या विविध व्यासाच्या मलवाहिन्या बदलाव्या लागणार असल्याचा साक्षात्कार पालिकेच्या अधिकाऱ्यांना झाला. यापैकी शहरातील ८० किलोमीटर मलनि:सारण वाहिन्यांसाठी तब्बल ४३१.३९ कोटी रुपयांची तरतूद पालिकेने २०२४-२०२५ च्या अंदाजपत्रकात केली आहे. याचा अर्थ एक किलोमीटर अंतरावरील मलवाहिन्या टाकण्यासाठी पालिकेला पाच कोटी ३९ लाख रुपये खर्च येणार आहे.
महापालिका आणि लोकप्रतिनिधी गेली दोन दशके पुणेकरांची मोठी फसवूक करत आहेत. कारण २००२ पासून ते २०२२ पर्यंत पालिकेच्या चार टर्म पूर्ण झाल्या. या प्रत्येक टर्ममध्ये लोकप्रतिनिधी सांडपाणी अर्थात मलवाहिन्या टाकण्यासाठी नियोजनशून्य विकासाप्रमाणे प्रभागात दीडशे ते तीनशे मिलिमीटर व्यासाच्या वाहिन्या टाकत होते. या वाहिन्यांमध्ये गाळ साठला म्हणून दरवर्षी पुन्हा ते काढून नवीन वाहिन्या टाकल्या जात होत्या. हा नित्यक्रम गेली वीस वर्षांपासून पालिकेत सुरू होता. यावर पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले. यामध्ये ठेकेदार व तत्कालीन नगरसेवकांचा केवळ फायदा झाला. शहरातील सांडपाण्याचा मास्टर प्लॅन कधी झालाच नाही. त्यामुळे उशिरा जाग आलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आता सिव्हरेज मास्टर प्लॅन तयार केला आहे. यामध्ये शहरातील सर्व जुन्या वाहिन्या काढून टाकल्या जाणार होत्या. त्या जागी नवीन मोठ्या व्यासाच्या वाहिन्या पुढील वीस ते तीस वर्षांच्या लोकसंख्या वाढीचा दर लक्षात घेऊन टाकण्यात येणार आहेत. त्यासाठी शहरात साधारणत: १८० किलोमीटर लांबीच्या मलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. त्यासाठी बाराशे कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च अपेक्षित आहे.
दोन वर्षांत ८९ कोटी खर्च
गेल्या वर्षी महापालिकेने मलनि:सारण देखभाल दुरुस्ती, नालेसफाई, पावसाळी वाहिन्या साफसफाईसाठी ६० कोटी रुपये खर्च केले होते. या वर्षीच्या अंदाजपत्रकात २८ कोटी ४५ लाख रुपयांची तरतूद आहे. याचा अर्थ पावसाळ्यापूर्वी ही कामे होणे अपेक्षित होते. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत महापालिकेने केवळ सांडपाणी व नाले सफाईसाठी ८८ कोटी ८५ लाख रुपये खर्च केले आहेत.
सांडपाणी वाहिन्यांचे जाळे
पुणे पालिकेने शहरातील उंच व सखल भागाप्रमाणे पंधरा विभाग केले आहेत. त्याला एस १ ते एस १५ क्रमांक दिले आहेत. शहरातील मलवाहिन्या किंवा सांडपाणी वाहिन्या, पावसाळी वाहिन्यांचे जाळे तयार केले गेले आहे. यामध्ये शहरातील गल्ली, बोळापासून ते अंतर्गत रस्ते, मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या या वाहिन्या आहेत. यामध्ये तीनशे, सहाशे, नऊशे, बाराशे, पंधराशे, अठराशे, चौवीसशे मिलीमीटरच्या या वाहिन्या असणार आहेत. त्यामुळे शहरात भविष्यात पावसाळ्यात पुराच्या पाण्याचा धोका जाणवणार नसल्याचा अंदाज आहे.
‘‘पुणे महापालिकेने ‘सिव्हरेज मास्टर प्लॅन’ तयार केला आहे. २०२७ पर्यंत अपुऱ्या पडणाऱ्या अंदाजे १८० किलोमीटर लांबीच्या विविध व्यासाच्या वाहिन्या बदलाव्या लागणार आहेत. त्यामुळे शहरातील उंच व सखल भागाप्रमाणे एस १ ते एस १५ पर्यंत पंधरा भाग केले आहे. या वर्षीच्या अंदाजपत्रकात ८० किलोमीटर लांबीच्या विविध व्यासाच्या मलवाहिन्यांचे काम सुरू केले आहे. त्यासाठी ४३१ कोटी ३८ लाख रुपयांची तरतूद आहे.’’
- राजेद्र जाधव, कार्यकारी अभियंता, मलनि:सारण विभाग, पुणे महापालिका