संग्रहित छायाचित्र
पुणे : मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जिव्हाळ्याच्या एसटी महामंडळाच्या ‘ई-शिवनेरी’ बसमध्ये आता विमानामध्ये असतात तशा ‘सुंदरी’ पाहायला मिळणार आहेत. प्रवाशांना मदत करण्यासाठी तसेच त्यांच्या स्वागतासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर ‘शिवनेरी सुंदरी’ नेमण्यात येणार आहेत. एसटी बसमध्ये आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे प्रवाशांच्या तिकिटावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावण्यास मदत मिळेल. त्याकरिता ही अभिनव योजना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी दिली. एसटी महामंडळाने ‘एक्स’वर याबाबत पोस्ट करून घोषणेचे पत्र जाहीर केले.
एसटी महामंडळाचे नवे अध्यक्ष भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विविध खात्याच्या तब्बल ७० पेक्षा अधिक विषयांवर चर्चा झाली. या बैठकीत संबंधित विषयांना मान्यता देण्यात आली. त्यापैकी, मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी परिचारिका नेमण्यास देखील मान्यता देण्यात आल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील स्वर्गीय आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ एसटीच्या ३४३ बस स्थानकांवर ‘आनंद आरोग्य केंद्र’ या नावाने दवाखाना सुरू करण्यात येणार आहे. अत्यंत माफक दरामध्ये बस स्थानकांवरील प्रवाशांबरोबरच आसपासच्या सर्व नागरिकांना कमी दरामध्ये विविध आरोग्य चाचण्या व औषधे एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित संस्थांना बसस्थानकांवरील ४०० ते ५०० चौ. सेमी. ची जागा उपलब्ध करून देण्यात येईल. तेथे त्या संस्थेने आरोग्य तपासणी दवाखाना, पॅथॉलॉजी लॅब व औषध दुकान सुरू करून सेवा देण्यात येणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल व अमरावती जिल्ह्यातील धारणी या आदिवासी बहुल प्रदेशांमध्ये एसटीचे नवे आगार निर्माण करण्यात येणार असून या आगाराच्या निर्मितीनंतर एसटीच्या एकूण आगारांची संख्या 253 होणार आहे. एसटी महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकांवर त्या परिसरातील महिला बचत गटांना आपले स्थानिक पदार्थ विक्री करण्यासाठी चक्रीय पद्धतीने नाममात्र भाडे आकारुन १० बाय १० आकाराचा स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
उपरोक्त निर्णयाबरोबरच नवीन २५०० साध्या बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू करणे तसेच १०० डिझेल बसेसचे प्रायोगिक तत्त्वावरील इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करणे अशा विविध विषयांना या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार व एसटी महामंडचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.