पुणे: डेक्कन कॉलेजवर भ्रष्टाचाराचे डाग?
नागपुरातील गोरेवाडा परिसरात असलेल्या ‘आर्कियोलॉजिकल थीम पार्क’च्या कामात डेक्कन कॉलेज ऑफ आर्कियोलॉजीने भ्रष्टाचार केल्याचा आरोप या कॉलेजच्याच माजी विद्यार्थ्यांनी केला होता. त्याची दखल घेत पुण्यातील न्यायालयाने चौकशीचे आदेश दिल्यानंतर सुमारे दोन वर्षांनी येरवडा पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
नागपूर शहर हे पुरातत्त्व दृष्ट्या महत्त्वाचे आहे. याठिकाणी असलेल्या गोरेवाडा परिसरात ‘आर्कियोलॉजिकल थीम पार्क’ तयार करण्याची राज्य सरकारची योजना होती. या ठिकाणी २०१८ मध्ये केलेल्या खोदकामात तीन हजार वर्षांपूर्वीचे मानवी सांगाडे सापडले होते. त्याचे जतन करून येथे थीम पार्क विकसित केले जाणार होते. यासाठी महाराष्ट्र वन विकास निगम व डेक्कन कॉलेज ऑफ आर्कियोलॉजी यांच्यामध्ये करार झाला होता. तब्बल साडेआठ कोटी रुपये खर्च करुन हा प्रकल्प साकारला जाणार होता. राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात चार कोटी रूपये निधी दिला. मात्र, सहा वर्षांत डेक्कन कॉलेजने उत्खननाशिवाय काहीच केले नाही. त्यामुळे थीम पार्क विकसित झालेच नाही. याच्या चौकशीचे आदेश न्यायालयाने दिल होते. येरवडा पोलीस ठाणे कलम २०२ अंतर्गत डेक्कन कॉलेजच्या या कामाची चौकशी करीत आहे.
गोरेवाडा आर्कियोलॅाजिकल थीम पार्क साठी राज्य सरकारने साडेआठ कोटी रूपये निधीची तरतूद केली होती. राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात चार कोटी रूपये निधी दिला. यानिधी मधून फक्त गोरेवाडा येथे उत्खनन करण्यात आले आहे. आर्कियोलाॅजिकल थीम पार्क काही झाले नाही.
डेक्कन कॉलेजने गोरेवाडा आर्कियोलाॅजिकल थीम पार्कची वर्क ऑर्डर सप्टेंबर २०१८ मध्ये काढली होती. त्यानंतर दोन महिन्यांनी म्हणजे नोव्हेंबरमध्ये खोदकामाला सुरवात झाली. देशात पहिल्यांदा एखाद्या ठिकाणी तीन हजार वर्षांपूर्वीचे मानवी सांगाडे सापडले होते. मात्र, २०१९ नंतर हे काम बंद झाले. या सर्व कामांत अनियमितता आढळली होती. त्यासंदर्भात कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या तक्रार अर्जाची दखल घेऊन पुणे न्यायालयाने तत्कालीन कुलगुरुंसह इतरांची चौकशी करण्याचे आदेश येरवडा पोलिसांना दिले होते.
भविष्यातील निविदाधारक विशाल आणि आकाश असोसिएटचे व्ही. एम. शर्मा यांना निविदा मंजुरीवर प्रभुत्व असलेले तत्कालीन कुलगुरू वसंत शिंदे यांनी ३० जानेवारी २०१८ ला गोरेवाडा प्रकल्पाची पाहणी करणाऱ्या पथकात त्यांचा समावेश केला होता. तसेच व्ही. एम. शर्मा यांनी डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्थेमध्ये शिक्षणासाठी प्रवेश घेतला. महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्या २६ नोव्हेंबर २०१४ च्या शासन निर्णयानुसार असे स्पष्ट आहे की, तीन लाखांपेक्षा अधिकच्या खर्चाच्या कामांना ई-निविदा ‘एआयसी’च्या कार्यप्रणालीद्वारे प्रसिद्ध करण्यात यायला हव्या. असे असतानाही निविदा मंजुरीवर डॉ. शिंदे आणि कुलसचिव जगन्नाथ कुलकर्णी यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचे उल्लंघन केले होते.
त्यांनी अवैध पद्धतीने ऑफलाइन निविदा प्रक्रिया राबवून, मर्जीतील निविदाधारक विशाल आणि आकाश असोसिएटचे व्ही. एम. शर्मा यांची निविदा मंजूर केली. डॉ. शिंदे आणि संचालक, एफडीसीएम, नागपूर यांच्यात ८ जून २०१८ रोजी झालेला सांमजस्य करार तसेच डॉ. शिंदे व प्रसाद जोशी यांच्यात १७ सप्टेंबर २०१८ मधील तरतुदींचे उल्लंघन केले. त्यांनी करार अटीचा ५ (बी) भंग करून तसेच व्ही. एम. शर्मा यांनी काम योग्य पद्धतीने न करता, त्यांच्या कामाबाबत तक्रारी असताना त्यांना एक कोटी २५ लाख ४७ हजार ५७९ रुपयांची रक्कम देऊ केली. डॉ. शिंदे, प्रसाद जोशी व इतरांवर कलम ४०९, ४२०, १२० ब अन्वये गुन्हा केला असल्याने त्याबाबत अभिजित खेडकर, डॉ. अभिषेक हरिदास आणि इतरांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, पुणे यांच्या न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर फिर्यादीवरून अपराधाची दखल प्रथमवर्ग दंडाधिकारी यांनी घेऊन फिर्यादीची शपथेवर साक्ष तपासणी घेतली होती. डेक्कन कॉलेजने तब्बल सहा वर्षांनंतर ७५ हजार रूपयांची स्टँम्प ड्यूटी आता भरली आहे. त्यामुळे या कामाचा पुरावाच आता पोलिसांना मिळाला आहे. त्यामुळे येरवडा पोलिसांनी कलम २०२ अंतर्गत गोरेवाडा प्रकल्पाची चौकशी सुरू केली आहे.
आठ कोटींचा करार फक्त ५०० रुपयांच्या स्टॅंप पेपरवर!
गोरेवाडा येथील थीम पार्कचा करार फक्त ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करून आठ कोटींच्या कराराची स्टॅम्प ड्युटी बुडविली होती. आता डेक्कन कॉलेजने ७५ हजार रूपयांची स्टॅम्प ड्यूटी भरली आहे. त्यामुळे हा पुरावा पोलिसांना मिळाला असून त्याची चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभिषेक हरिदास यांनी ‘सीविक मिरर’ला दिली.
राज्य सरकारलाही ‘आर्कियोलॉजिकल थीम पार्क’चा विसर
नागपूर येथील गोरेवाडा ‘आर्कियोलॉजिकल थीम पार्क’साठी राज्य सरकारने साडेआठ कोटी रूपये निधीची तरतूद केली होती. राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात चार कोटी रूपये निधी दिला. यानिधी मधून फक्त गोरेवाडा येथे उत्खनन करण्यात आले आहे. आर्किलोजिकल थीम पार्क काही झाले नाही. राज्य सरकारलासुद्धा या प्रकल्पाचा विसर पडला असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अभिजित खेडकर यांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले.
पोलीस चौकशीला विलंब का?
शिवाजीनगर येथील प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायालयाने ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी येरवडा पोलिसांना डेक्कन कॉलेजच्या गोरेवाडा आर्कियोलाॅजिकल थीम पार्कच्या अनियमिततेची चौकशीचे आदेश दिले होते. दरम्यान दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची येरवडा पोलीस ठाण्यातून बदली झाली. सध्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी नव्याने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
तत्कालीन कुलगुरू डॉ. वसंत शिंदे, जगन्नाथ कुलकर्णी, प्रसाद जोशी यांनी संगनमताने व्ही. एम. शर्मा यांना टेंडर देऊन या प्रकरणात कोट्यवधींचा घोटाळा केला आहे.
- अभिजित खेडकर, सामाजिक कार्यकर्ते आणि डेक्कन कॉलेज ऑफ आर्कियोलॉजीचे माजी विद्यार्थी
गोरेवाडा आर्कियोलाॅजिकल थीम पार्कच्या प्रकरणात डेक्कन कॉलेजच्या चौकशीचे आदेश न्यायालयाने दोन वर्षांपूर्वी दिले आहेत. मी येरवडा पोलीस ठाण्याचा पदभार नुकताच घेतला आहे. येत्या दहा ते पंधरा दिवसात चौकशी पूर्ण करणार आहे.
- रवींद्र शेळके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा ठाणे
गोरेवाड आर्कियोलाॅजिकल थीम पार्कच्या कायदेशीर बाबींची पूर्तता केली आहे. सध्या माझ्याकडे संस्कृत विभागाची जबाबदारी असल्यामुळे याबाबात काही सांगता येत नाही.
- प्रसाद जोशी, प्र कुलगुरू, डेक्कन कॉलेज ऑफ आर्कियोलॉजी