६५ ची परवानगी असताना ५०० वृक्षांची कत्तल
दिलीप कुऱ्हाडे/अमोल अवचिते
गोखलेनगर (Gokhalenagar) भागातील वीर बाजीप्रभू प्राथमिक विद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या मेंढी फार्मसमोर सर्व्हे क्रमांक ९८ व ९९ येथे एका बांधकाम व्यावसायिकाचा गृहप्रकल्प आणि व्यापारी संकुलाचे बांधकाम प्रस्तावित आहे. यासाठी ६५ वृक्षांचे पुनर्रोपण आणि तोडण्याची परवानगी असताना तब्बल ५०० वृक्षांची कत्तल करण्यात आल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.
येथील बांधकामाला अडथळा ठरणाऱ्या ६५ वृक्षांपैकी काहींचे पुनर्रोपण आणि तोडण्याची मागणी बांधकाम व्यावसायिक भारत देसडला यांनी पुणे महापालिकेच्या उद्यान विभागाकडे केली होती. ही परवानगी मिळाल्यावर देसडला यांनी ६५ ऐवजी तब्बल ५०० वृक्षांची कत्तल केल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला. भारत देसडला यांनी मात्र ३० गुंठ्यात ५०० झाडे कशी असू शकतील, असा सवाल करीत हा आरोप फेटाळून लावला.
‘‘ही झाडे तोडण्यासाठी (Tree Cutting) आयुक्त तथा वृक्ष प्राधिकरण अध्यक्ष डाॅ. राजेंद्र भोसले यांच्या सहीचे पत्र आहे. या पत्रावर काढण्यात येणाऱ्या आणि पुनर्रोपण करण्यात येणाऱ्या वृक्षांची पाहणी तज्ज्ञ समितीने केल्याचेही नमूद करण्यात आले आहे,’’ असे देसडला यांनी आपली बाजू मांडताना ‘सीविक मिरर’ला सांगितले. . विशेष म्हणजे, सध्या वृक्ष प्राधिकरण समितीच अस्तित्वात नाही. त्यामुळे कोणत्या तज्ज्ञांनी पाहणी केली, यावर उलटसुलट चर्चा सुरू आहे.
वेताळ टेकडीच्या अगदी पायथ्याला असलेल्या नैसर्गिक ओढ्यामुळे सर्व्हे क्रमांक ९८ व ९९ येथील परिसर वृक्षराजीने नटलेला होता. या ठिकाणी बांधकामाला अडथळा ठरतात, म्हणून जिव्हाळा सहकारी गृहरचना संस्थेकरिता ‘असेंट लॅडमार्क्स’तर्फे बांधकाम व्यावसायिक भारत देसडला यांनी ६५ वृक्ष तोडण्याची आणि पुनर्रोपण करण्याची परवानगी मागितली होती. त्यांना ही परवानगी महापालिका आयुक्त तथा वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. मात्र, ६५ वृक्षांऐवजी तर तब्बल पाचशेपेक्षा अधिक वृक्षांची कत्तल करून संपूर्ण जागा सपाट केल्याचे सामाजिक कार्यकर्ते समीर निकम आणि सुधीर मुकारी यांनी समोर आणले आहे.
वेताळ टेकडी वनविभागाच्या हद्दीतून डोंगरामधून येणारा नैसर्गिक ओढा हा सर्व्हे क्रमांक ९८ आणि ९९ मधून शकुंतला निकम उद्यानामधून पुढे जातो. हा ओढा पावसाळ्यामध्ये तुडुंब भरून वाहतो. डोंगराच्या पायथ्याशीच ओढ्याची दिशा बदलण्याचा प्रकार येथे सुरू आहे. डोंगराच्या पायथ्याशीच दिशा बदलण्याचा प्रकार हा अतिशय घातक असून डोंगरावरून येणारा पाण्याचा प्रवाह भविष्यात गोखलेनगर परिसरातील घरांमध्ये पाणी जाऊन पूरस्थिती निर्माण करू शकतो. त्याचबरोबर या ठिकाणी पाचशेहून अधिक वृक्ष मुळासकट तोडले आहेत. या अनधिकृत वृक्षतोडीवर ताबडतोब कारवाई व्हायला हवी. पावसाळ्यात पूर येऊन दुर्घटना घडू नये, यासाठी तत्काळ उपाययोजना करण्यात यावी तसेच या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते समीर निकम आणि सुधीर मुकारी यांनी ‘सीविक मिरर’सोबत बोलताना दिला.
देसडला यांनी फेटाळला ५०० वृक्ष तोडल्याचा आरोप
५०० वृक्ष तोडल्याचा आरोप बांधकाम व्यावसायिक भारत देसडला (Bharat Desadla) यांनी फेटाळून लावला. ‘‘बांधकामाला झाडांचा अडथळा होत असल्यामुळे महापालिकेच्या उद्यान विभागाकडे वृक्ष तोडण्याची परवानगी मागितली होती. एका वर्षापासून आम्ही परवानगीसाठी पाठपुरावा करत होतो. ४ दिवसांपूर्वी ही परवानगी महापालिकेने दिली. आम्ही ६९ झाडांसाठी परवानगी मागितली होती. तेवढीच झाडे तोडण्यात आली आहेत. मुळात ३० गुंठ्यांमध्ये ५०० झाडे कशी लावली जातील? त्यामुळे ५०० झाडे तोडल्याचा दावा तथ्यहीन आहे. महापालिकेच्या परवानगीनेच वृक्षतोड केली आहे,’’ असा दावा त्यांनी ‘सीविक मिरर’सोबत बोलताना केला.
पुरावे द्या, कारवाई करू...
गोखलेनगर भागात बांधकामपूर्व दाखला घेताना वृक्षतोड करण्याची परवानगी मागण्यात आली होती. त्यानुसार संबंधित चार अधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्यानंतर परवान्यावर स्वाक्षरी केलेली आहे. मी सध्या नवीन असलो तरी संबंधित ठिकाणी पाहणी केली आहे. बांधकाम व्यावसायिकाने १०५ वृक्ष तोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार तेवढी वृक्षतोड करणे अपेक्षित आहे. या जागेवर ५०० हून वृक्षतोड झाली असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच तशी तक्रारीचे पत्रदेखील प्राप्त झाले आहे. मात्र त्यांनी कोणतेही पुरावे दिले नाही. तक्रारदाराने ५०० झाडे असल्याचे फोटो द्यावे. पुरावे सादर केले तर कारवाई करता येईल. नैसर्गिक ओढ्याचा मार्ग बदलण्याचा विषय आमच्याकडे येत नाही. हा विषय महापालिका आयुक्तांचा आहे, असे महापालिकेच्या उद्यान विभागाचे मिस्त्री रवींद्र कांबळे यांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले.
लोकप्रतिनिधी आणि वृक्ष प्राधिकरण समिती अस्तित्वात नसतानाही काही सदस्य आणि तज्ज्ञ समिती अस्तित्वात कशी आहे? सर्रास वृक्षतोडीच्या प्रकरणांना मान्यता का दिली जाते? ६५ वृक्ष स्थलांतरित करण्याची परवानगी घेऊन पाचशेपेक्षा अधिक झाडे कापण्याचा पराक्रम पुण्यातील तज्ज्ञ समितीच करू शकते. अशा तज्ज्ञ समितीमध्ये कोण आहेत, त्यांची नावे शैक्षणिक पात्रतेसह जाहीर करण्यात येऊन या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी.
- समीर निकम, सामाजिक कार्यकर्ते
गोखलेनगर भागात वृक्षतोड करण्याची परवानगी आयुक्तांच्या मान्यतेने मिळाली आहे. वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्ष म्हणून आयुक्तांनी तज्ज्ञांचा अभिप्राय घेऊन ही मान्यता दिलेली आहे. त्याशिवाय थेट परवानगी देता येत नाही.
- रवी खंदारे, सहायक आयुक्त, शिवाजीनगर- घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालय