महेंद्र संपत डावखर
पुण्यातील संचेती पुलावर एका तरुणाचे मंगळवारी शोले स्टाईल आंदोलन केले होते. जुन्नर येथील तहसीलदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी तरुणाने आंदोलन केले होते. मात्र, आता हे आंदोलन तरुणाच्या अंगलट आले आहे. तरुणाविरोधात खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेंद्र संपत डावखर असे या तरुणाचे नाव असून त्याच्यावर कलम ३०९ आणि १८९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्नरच्या तहसीलदारावर कारवाई करण्यासंदर्भातील आशयाचा हातात फलक घेऊन तो संचेती उड्डाणपुलाच्या खांबावर जाऊन थांबला होता. "माझी मागणी मान्य करा, अन्यथा मी स्वतःला संपवेन,” असा इशारा देत त्याने आंदोलन केले होते. त्यामुळे या चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
महेंद्र हा मूळचा जुन्नर तालुक्यातील सुल्तानपूर गावचा रहिवासी आहे. याच गावामध्ये महेंद्रच्या नातेवाईकांच्या नावे १ हेक्टर ६४ गुंठे जमीन आहे. मात्र ही जमीन भावकीत सामाईक मालकीची आहे. तिच्या खाते उताऱ्यावर अनेकांची नावे आहेत. या जमिनीवर महेंद्रचे वडील संपत आणि चुलत्यांची नावे आहेत. मात्र जमिनीच्या फेरफार नोंदीवर महेंद्रचे वडील संपत यांचे नाव नाही. फेरफार नोंदीवर वडिलांचे नाव लागावे, यासाठी महेंद्रने आंदोलन केले होते. मात्र, आता त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने तरुणाच्या अडचणीत आखणी भर पडली आहे.