पुणे : सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या मालमत्तेवर जप्ती

महापालिकेच्या करसंकलन आणि करआकारणी विभागाकडून मिळकतकर न भरणाऱ्या मालमत्ता जप्त केल्या जात आहेत. मिळकत विभागाच्या पथकाने अशाच पद्धतीने एरंडवणे येथील सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटची मिळकत जप्त केली आहे.

Sinhagad Technical Institute property Seizure

पुणे : सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या मालमत्तेवर जप्ती

तब्बल ४७ कोटी ४३ लाख १८ हजारांचा मिळकतकर थकवल्याने पुणे महापालिकेची एरंडवणे येथे कारवाई

महापालिकेच्या करसंकलन आणि करआकारणी विभागाकडून मिळकतकर न भरणाऱ्या मालमत्ता जप्त केल्या जात आहेत. मिळकत विभागाच्या पथकाने अशाच पद्धतीने एरंडवणे येथील सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटची मिळकत जप्त केली आहे. या इन्स्टिट्यूटकडे ४७ कोटी ४३ लाख १८ हजार ३०३ रुपयांचा मिळकतकर थकीत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

महापालिकेच्या करसंकलन आणि करआकारणी विभागाने थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला असून बड्या थकबाकीदारांच्या दारात थेट बॅंडबाजा वाजविला जात आहे. त्याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळत असून कोट्यवधी रुपयांच्या कराची वसुली होऊ लागली आहे.  महापालिकेच्या करसंकलन आणि करआकारणी विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी सांगितले की, सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या कोंढवा बुद्रुक, आंबेगाव बुद्रुक, एरंडवणे येथे मिळकती आहेत. एरंडवणे येथील मालमत्तेच्या मिळकतकराची थकबाकी ४७ कोटी ४३ लाख १८ हजार ३०३ रुपयांवर पोहोचली होती. त्यामुळे या मिळकतीवर बुधवारी (दि. ४) जप्तीची कारवाई करण्यात आली.

करआकारणी आणि करसंकलन विभागाने २०२४-२५ या वर्षासाठी ठरवून घेतलेले करवसुलीचे उद्दिष्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कारवाईचा धडाका लावला आहे. त्याकरिता २ डिसेंबरपासून करवसुलीकरिता बॅंड पथकाचा समावेश करण्यात आला आहे. तसेच स्वतंत्र वसुली पथके नेमण्यात आली आहेत. या सर्व पथकांमार्फत १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील थकबाकी असलेल्या मिळकतींवर वसुलीची कारवाई हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार मागील पाच  दिवसांत बँड पथकांद्वारे तसेच मध्यवर्ती पथकांद्वारे १६५ मिळकतींवर प्रत्यक्ष धडक मारण्यात आली. या ठिकाणाहून १४ कोटी १४ लाख २६ हजार २१२ रुपयांचा थकित मिळकतकर वसूल करण्यात आला आहे.

महापालिका कार्यक्षेत्रात १४ लाख ८० हजार मिळकती आहेत. त्यापैकी सुमारे ८ लाख ७४ हजार ५४६ मिळकतधारकांनी त्यांचा १ हजार ८०४ कोटी रुपयांचा मिळकत कर जमा केला आहे. उर्वरित मिळकतकर थकबाकीधारकांकडे या पुढील कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात थकबाकी वसुलीची कारवाई पथकांमार्फत केली जाणार आहे. ज्या मिळकतधारकांनी अद्यापही करभरणा केलेला नाही, त्यांनी तत्काळ कर भरावा आणि कारवाई टाळावी, असे आवाहन उपायुक्त माधव जगताप यांनी केले आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest