संग्रहित छायाचित्र
पुणे शहर स्वच्छ शहर या वाक्याप्रमाणे प्रत्यक्षात शहर स्वच्छ करण्यासाठी पुणे महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहे. शहरातील विविध ठिकाणांवर स्वच्छता करण्यासाठी महापालिकेचे सगळ्याच विभागातील कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. असे असतानाच पुणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये रेल्व प्रशासनाच्या पार्किंगमध्येच घाणीचे साम्राज्य पसरल्याचे वास्तव समोर आले होते. त्यानंतर महापालिकेच्या घनकचरा विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून अस्वच्छतेचा परिस्थिती पाहिली. त्यावर नाराजी व्यक्त करत पुणे रेल्वे विभागाला हा भाग स्वच्छ करण्याचे सूचना करत दंडात्मक कारवाई करण्यााचा इशारा देत कान उघडणी केली आहे. तसेच यावर दंडात्मक कारवाई का करु नये असाही खुलासादेखील मागविला आहे.
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून रेल्वे स्थानक परिसरात बुधवारी (दि.११) पाहणी करण्यात आली. पुणे रेल्वे स्थानक परिसर व पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळून आली आहे. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम २९६ अन्वये महानगरपालिकेस कोणत्याही जागेतील स्वच्छतेबाबत खात्री करून घेण्याच्या प्रयोजनासाठी तिची पाहणी करता येऊ शकते. या नियमानुसार ही पाहणी केल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील प्रकरण १४ -स्वच्छता विषयक तरतुदीनुसार आपल्या जागेत सार्वजनिक स्वच्छता राखणे, केरकचरा साठू न देणे ही आपली जबाबदारी आहे. तसेच पुणे महानगरपालिका, सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य उपविधी २०१७ मधील प्रकरण ५ अन्वये कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांनी आपले आस्थापनेमध्ये सार्वजनिक स्वच्छता राखणे बंधनकारक असून मुद्दा क्र. १६ अन्वये या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर महानगरपालिका कठोर शास्ती लागू करू शकते.
रेल्वे स्टेशन परिसरात पहाणी केली असता अंतर्गत परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता असल्याचे निदर्शनास आले आहे. रेल्वे स्टेशनच्या अंतर्गत परिसरात झाडणकाम केलेले नसून, केरकचरा, पालापाचोळा अनेक दिवसांपासून पडून असल्याचे, झाडांच्या कापलेल्या फांद्या अस्ताव्यस्त पडलेल्या असल्याचे आढळून आले.
फुटपाथ नादुरस्त स्थितीत असल्याचे दिसून आले आहे . तसेच नागरीकांमार्फत उघड्यावर लघुशंका केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच अनेक प्रवासी नागरिकांमार्फतदेखील इतरत्र कचरा टाकला जात असल्याचे आढळून आले आहे.
तसेच उघड्यावर धुम्रपान व थुंकणे असे प्रकार प्रवाशांमार्फत होत आहेत. तसेच स्टेशन परिसरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या बाटल्या, दारुच्या बाटल्या व अस्वच्छता असल्याचे स्थानिक आरोग्य निरीक्षक यांच्या पहाणी दरम्यान निदर्शनास आले आहे.
महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयामार्फत पुणे स्टेशन परिसरात डीप क्लिन ड्राईव्ह घेऊन स्वच्छता करण्यात आलेली आहे, परंतु रेल्वे स्टेशनच्या अंतर्गत परिसरात दैनंदिन स्वरूपात स्वच्छता राखणे, प्रवासी नागरिकांमध्ये स्वच्छता राखणेच्या अनुषंगाने जनजागृती करणे, अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणे, ही रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे.
तसेच संपूर्ण रेल्वे स्टेशनच्या अंतर्गत परिसरात स्वच्छता करून घेऊन, साठलेला केरकचरा, राडारोडा, पालापाचोळा, झाडांच्या फांद्या तात्काळ उचलून घ्याव्यात. तसेच अंतर्गत परिसरातील शौचालयांची स्वच्छता करून घ्यावी व उघड्यावर लघुशंका करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.
रेल्वे स्टेशनच्या अंतर्गत परिसराच्या स्वच्छतेची जबाबदारी ही आपले विभागाची असून त्यानुसार संपूर्ण परिसरात सदैव स्वच्छता राखली जाईल याची दक्षता घेण्यात यावी. असेही आवाहन रेल्वे विभागाला घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संदिप कदम यांनी रेल्वेला पाठवलेल्या पत्रात केले आहे.
अशी आहे कायदेशीर तरतूद
सद्यस्थितीत निदर्शनास आलेल्या या अस्वच्छतेमुळे अनारोग्यकारक परिस्थिती निर्माण होत असून दैनंदिन स्वरूपात येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यास यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. आपल्या आस्थापनेमध्ये स्वच्छता न राखल्याबद्दल मुंबई प्रांतिक अधिनियम १९४९ मधील कलम ३९२ अन्वये आपणावर दंडाची शास्ती का करण्यात येऊ नये याबाबतचा खुलासा हे पत्र मिळताच दोन दिवसांचे आत सादर करावा. असे महापालिकेने पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.