पुणे: पौड रस्त्याचा झाला कोंडवाडा; वनाझ मेट्रो स्थानक ते चांदणी चौकादरम्यान वाहतुकीचा बोजवारा

पुण्यातील पौड रस्त्यावरील वनाझ मेट्रो स्थानकाजवळील सीएनजी पंपापासून चांदणी चौकापर्यंत दैनंदिन वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. येथे रोज होत असलेल्या कोंडीमुळे वाहनचालक आणि प्रवाशांच्या त्रासात भर पडली आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

वनाझ मेट्रो स्थानक ते चांदणी चौकादरम्यान वाहतुकीचा बोजवारा

कायमस्वरुपी उपाय करण्याची नागरिकांची मागणी

पुण्यातील पौड रस्त्यावरील वनाझ मेट्रो स्थानकाजवळील सीएनजी पंपापासून चांदणी चौकापर्यंत दैनंदिन वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. येथे रोज होत असलेल्या कोंडीमुळे वाहनचालक आणि प्रवाशांच्या त्रासात भर पडली आहे.

रस्त्याच्या या भागात प्रचंड गर्दी होत असल्याने वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. वाहनचालक आणि प्रवाशांना आधीच शहरात ठिकठिकाणी प्रचंड रहदारीच्या अडथळ्यांना तोंड द्यावे लागत आहे. कोंडीमुळे  रोजच प्रवासाला लागत असलेली प्रदीर्घ वेळ आणि त्यामुळे निर्माण होणारा ताणतणाव यावर बहुआयामी दृष्टिकोनातून कायमस्वरुपी सर्वंकष उपाययोजना करणे नितांत गरजेचे असल्याचे पौड रस्ता भागातील रहिवाशांचे मत आहे.

या उपाययोजनांमध्ये रस्त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे, येथील वाहतुकीचे प्रभावी व्यवस्थापन आणि सार्वजनिक वाहतुकींचे पर्याय सहज सुलभपणे उपलब्ध करून रस्त्यांवर वाढलेले अतिरिक्त ओझे कमी करणे आदींचा समावेश असावा, असे या परिसरातील रहिवाशांचे म्हणणे आहे.

भुसारी वसाहतीतील रहिवासी गिरीश जालान यांनी 'सीविक मिरर'ला सांगितले की, ‘‘वनाझ मेट्रो स्थानकाजवळील सीएनजी पंपापासून चांदणी चौकापर्यंतच्या पौड रस्त्याच्या एक किलोमीटरच्या टप्प्यात भुसारी वसाहतीजवळील दोन चौकांत संध्याकाळी रहदारीच्या वेळी प्रचंड कोंडी होते.  कात्रजकडे जाणाऱ्या रस्त्यातील चौकातही मोठ्या रहदारीच्या काळात याच समस्या आहेत. येथेही अशाच भीषण वाहतूक कोंडीला चालकांना रोज तोंड द्यावे लागते. चौका-चौकांत बेशिस्तपणे वाहने उभी केली असल्याने या पार्किंगचा रहदारीला मोठा अडथळा होतो. याशिवाय भुसारी वसाहतीच्या चौकालगतच्या बसस्थानकावर, प्रवासी बसची वाट पाहत चक्क रस्त्यावर उभे राहतात. त्यामुळेही वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो.’’

“सीएनजी पंपाकडे जाताना रिक्षाचालक चुकीच्या मार्गाचा अवलंब करत असल्यानेही वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. वाहतूक पोलीस याकडे सर्रास दुर्लक्ष करत आहेत.  भुसारी वसाहत चौकात रस्त्यांच्या दुतर्फा पदपथ आहेत. परंतु चांदणी चौकाकडे जाताना या रस्त्यावर पुढील चौकात पदपथ नाहीत. येथे अनधिकृतरित्या पार्किंग केले जाते. तसेच रस्त्यालगत विक्रेते आणि खाद्यपदार्थ्यांच्या टपऱ्यांचे अतिक्रमण झालेले आहे. पुणे महापालिकेने येथील बेकायदेशीर दुकाने हटवली होती. तरी या टपऱ्या येथे अल्पावधीतच पुन्हा उभारण्यात आल्या आहेत. त्यांच्या भोवती ग्राहकांची वाहने पुन्हा बेशिस्तपणे उभी केली जात आहेत. त्यामुळे येथील वाहतुकीला अडथळा होऊन रहदारी सुरळीत होत नाही. परिणामी वाहनांची अगदी परस्परांना खेटून वाहतूक होत आहे,’’ असेही जालान यांनी नमूद केले. त्यांनी असेही सांगितले, की एकलव्य महाविद्यालयाजवळील रस्ता महापालिकेच्या भूखंड संपादनानंतर खुला होणार होता, त्याचे काम अपूर्ण आहे. एव्हाना उर्वरित भागाचे काम पूर्ण झाले असते, तर पौड रस्त्यावरील वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होऊ शकली असती.

येथील अन्य एक रहिवासी विवेक कडू यांनी सांगितले की, ‘‘सीएनजी पंपाजवळ गॅस भरून घेण्यासाठी लागत असलेली रिक्षांची लांबलचक रांग हे या भागातील वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण आहे. येथे पोहोचण्यासाठी रिक्षा येथील रस्त्यावरून सर्रास चुकीच्या बाजूने जातात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा वाढतो. शिवाय, कोथरूडहून चांदणी चौकाकडे जाणारे प्रवासी अनेकदा वाहतुकीला अडथळा निर्माण करून वाहने चालवतात, त्यामुळेही कोंडीत भर पडते. रस्त्यालगत असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्या-टपऱ्यांमुळे येथे खाण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांच्या दुचाक्या-चारचाकी वाहनांची बेशिस्त पार्किंग हीसुद्धा वाहतूक कोंडीमागील महत्त्वाची समस्या आहे.’’

कोथरूड वाहतूक पोलीस निरीक्षक साळगावकर यांनी एका आठवड्यापूर्वी पदभार स्वीकारला आहे. या भागातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी कोणते उपाय योजले जात आहेत किंवा जाणार आहेत, याची माहिती ते देऊ शकतील. येथील वाहतूक व्यवस्थापन योग्य पद्धतीने करण्यासाठी जर उपाययोजना आणि कारवाई करण्यात दिरंगाई झाल्यास किंवा वाहतूक प्रश्न त्यांना सोडवता आला नाही तर आपण या प्रकरणात लक्ष घालू, असे वाहतूक प्रशासन विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील गवळी यांनी 'सीविक मिरर'ला सांगितले.

कोथरूड वाहतूक पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी नुकताच पौड रस्ता वाहतूक विभागाचा कार्यभार स्वीकारला आहे. त्यांनी या भागात वाहतुकीच्या समस्या असल्याचे मान्य केले. ते म्हणाले, “मी सध्या या भागातील वाहतुकीच्या सर्व समस्या समजावून घेत आहे. त्यानंतर त्या सोडवण्यासाठी मी तातडीने पावले टाकणार आहे. सध्या येथे तत्काळ सुरू केलेल्या उपायांमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईसह, वाहतूक कोंडी होत असलेल्या रस्त्यांवर गस्त वाढवली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन किंवा सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रवाशांना दंड करतात त्यांना दंड आणि शिक्षेला सामोरे जावे लागेल.’’

सुनियोजित वाहतूक व्यवस्थापनासाठीचे काही उपाय

रस्त्यांच्या पायाभूत सुविधांत सुधारणा : अतिरिक्त रहदारीला सामोरे जाण्यासाठी रस्ता रुंदीकरण. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक चौकांची आणि वाहतूक छेदन बिंदूंची नव्याने रचना करणे, तसेच सुलभ पद्धतीने वळता येईल, अशा लेनची रचना करण्याची गरज आहे.  

 स्वयंचलित वाहतूक नियंत्रक दिवे बसवणे : गर्दीच्या वेळी वाहतूक व्यवस्थापन सुरळीत आणि प्रभावीपणे करण्यासाठी 'सेन्सर'सह वाहतूक नियंत्रक दिवे (ट्रॅफिक सिग्नल) कार्यान्वित करणे.

 वाहनतळांबाबतच्या उपाययोजना : अनधिकृत, अव्यवस्थित आणि बेशिस्त वाहनतळांच्या (पार्किंग) विरोधात कठोर कारवाई करण्याची गरज.  विशेषत: चौक आणि बस स्थानकांजवळील बेशिस्त 'पार्किंग'विरुद्ध कारवाई करणे गरजेचे. त्यासाठी पर्यायी अधिकृत वाहनतळ निर्मिती करण्याची आवश्यकता.

 अवैध दुकाने-टपऱ्यांवर नियंत्रण : अनधिकृत टपऱ्या-दुकाने आणि विक्रेत्यांना येथे अतिक्रमण करण्यापासून रोखण्यासाठी गस्त आणि प्रतिबंधक कारवाई करण्याची गरज. सार्वजनिक जागा स्वच्छ आणि मोकळ्या ठेवण्यासाठी सातत्याने कारवाई करण्याची गरज. 

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest