एनआयबीएम रोड, मोहम्मदवाडीतील रहिवाशी उतरले रस्त्यावर
मूलभूत नागरी सुविधांच्या मागणीसाठी पुण्यातील एनआयबीएम रोड, (NIBM Road) कोंढवा (Kondhwa), उंड्री, मोहम्मदवाडी परिसरातील रहिवाशांनी आज साखळी आंदोलन केले. सकाळी नऊ वाजल्यापासून “रस्ता नाही, टॅक्स (tax) नाही”, “परिसरातील रस्ते गर्दीमुक्त करा”, असा पद्धतीचे फलक हातात घेऊन रहिवाशांनी कडनगर चौक ते एनआयबीएम रस्त्यालगतच्या पॅलेस बागेपर्यंत मानवी साखळी पद्धतीने आंदोनल करून महापालिकेचा (pmc) निषेध केला.
एनआयबीएम रोड, कोंढवा, उंड्री, मोहम्मदवाडी भागात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. तसेच रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. अशातच दोन दिवसांपुर्वी एका ब्रेक फेल झालेल्या व्हॅनिटी व्हॅनने पाच ते सहा वाहनांना धडक दिली. यात दोन जण ठार तर सहा जण जखमी झाले होते.
एनआयबीएम रस्त्यावर घडलेल्या जीवघेण्या या अपघातामुळे अखेर रहिवाशी रस्त्यावर उतरले आहेत. खड्डेमुक्त रस्ते, कचरामुक्त परिसर, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा या मूलभूत नागरी सुविधांची मागणी यावेळी रहिवाशांकडून करण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाने तात्काळ या सर्व समस्यांची दखल घ्यावी, आणि रहिवाशांना सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी यावेळी आंदोनलकर्त्यांकडून करण्यात आली आहे.