संग्रहित
हिंजवडी ते शिवाजीनगर या महत्त्वाच्या मेट्रो मार्गाला आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. मार्च २०२५ पर्यंत मेट्रो धावण्याचे उद्दिष्ट संबंधित ठेकेदाला पूर्ण करण्यात आले नाही. दरम्यान, हे काम आता ऑक्टोंबर २५ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. यामुळे रोजच्या वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी आयटीयन्स आणि नागरिकांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. २३ किलोमीटरच्या या मार्गावरती आणखी काही स्थानकांचे काम बाकी असल्याने यासाठी मुदतवाढ मिळणार आहे.
पुणे प्रादेशिक क्षेत्रीय विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्याकडे हा प्रकल्प आहे. पीपीपी ( पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) या तत्वावर या प्रकल्पाचे काम सुरू आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या या कामाला जुलै महिन्यानंतर गती मिळाली होती. मात्र प्रत्यक्षामध्ये मेट्रोची डेडलाईन पाळण्यामध्ये संबंधित ठेकेदार अपयशी ठरला आहे. हिंजवडी (माण, मेगा पोलीस) ते शिवाजीनगर पुण्यातील तिसरा मोठा मार्ग आहे. संपूर्ण मार्ग हा १८ ते २० मीटर उभ्या केलेल्या खांबावर आहे. त्याचप्रमाणे पुणे- बंगळूरु महामार्ग आणि मुळा नदीच्यावरती उभारण्यात आलेला आहे. या एकूण प्रकल्पासाठी जवळपास ८ हजार ३१३ कोटी रुपये खर्च होणार आहेत. प्रत्यक्षामध्ये या कामाला नोव्हेंबर २०२१ मध्ये सुरुवात झाली. मात्र, मार्च २०२५ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होऊ शकणार नाही. त्यामुळे या प्रकल्पाला आणखी मुदतवाढ मिळणार आहे. या मार्गावरील काही स्थानकांचे काम अपूर्ण असून, शिवाजीनगर (आरबीआय) आणि औंध या दोन ठिकाणी कामे संथ असल्याने याचा मोठा अडथळा या मार्गाला बसला आहे.
दरम्यान, सद्यस्थितीमध्ये ७९ टक्के काम पूर्ण झालेले आहे. त्यामध्ये पिलर उभारण्याचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे २३ स्थानकांपैकी १२ स्थानकांची कामे पूर्ण झाली असून, इतर स्थानकांची कामे अपूर्ण आहेत. विविध ठिकाणी जिन्याचे आणि ११ स्थानकांचे महत्त्वाचे काम बाकी आहे. विविध परवानगी आणि वाहतूक नियोजन दृष्टीने काही स्थानकांची कामे वेळेपेक्षा अधिक लांबली असल्याने मुदतवाढ देण्याची नामुष्की या प्रकल्पावर आली. यामध्ये प्रामुख्याने इंटर कनेक्ट काम असल्याने विद्यापीठ चौकामध्ये कामाची गती कमी आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावर असलेल्या एचटी लाईनमुळेदेखील या कामांमध्ये मोठा अडथळा निर्माण झाले असल्याचे पीएमआरडीए प्रशासनाने नमूद केले. या प्रकल्पामध्ये नमूद असलेल्या आणि करारानुसार संबंधित कंपनीने वेळेत काम पूर्ण न केल्याने या कंपनीला दंडाची टांगती तलवार असणार आहे. हा प्रकल्प पीपीपी तत्त्वावर असल्यामुळे कन्सेशन एग्रीमेंट या नुसार जे काही नियम घालून देण्यात आलेले आहे त्यानुसार त्या दंडाची रक्कम आकारण्यात येणार आहे. मात्र, त्याची नेमकी रक्कम अथवा त्याची माहिती खुली करण्यात आली नाही.
ही आहेत स्थानके
मेगापोलिस सर्कल, एम्बेसी क्चाड्रॉन बिझनेस पार्क, डोहलर, इन्फोसिस फेज २, विप्रो फेज २, पाल इंडिया, शिवाजी चौक, हिंजवडी, वाकड चौक, बालेवाडी स्टेडियम, एनआयसीएमएआर, रामनगर, लक्ष्मीनगर, बालेवाडी फाटा, बाणेर गाव, बाणेर, कृषी अनुसंधान, सकाळनगर, विद्यापीठ, आरबीआय, कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर आणि दिवाणी न्यायालय आदी.
सप्टेंबरपर्यंत तरी मेट्रो धावणार का?
या मार्गावरती ११ स्थानकांची कामे, जिने आणि वेगवेगळ्या परवानग्या या मिळून पुढील सहा महिन्यांमध्ये काम पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यानंतर मेट्रोची ट्रायल आणि काम पूर्ण झाल्यानंतर मेट्रो खुली करण्यात येईल. मात्र ही कामे पुढच्या सहा महिन्यांत तरी पूर्ण होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जागेसाठी मोठा विलंब
या प्रकल्पासाठी संबंधित कंपनीला जागा ताब्यात देण्यासाठी मोठा वेळ खर्च पडला आहे. त्यातच शिवाजीनगर आणि सिव्हील कोर्ट या वेगवेगळ्या ठिकाणी जागा देण्यासाठी उशीर लागला. काही ठिकाणी काम लगेच सुरू करण्यात येणार होते. मात्र त्यासाठी जागेमुळे तब्बल सात ते आठ महिन्यांनी उशीर झाला. यामुळे पीएमआरडीए प्रशासनाकडूनदेखील या प्रकल्पावरती फरक पडल्याने पुढे मोठा वेळ खर्ची पडला. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून दंडाची रक्कम आकारण्यात येणार आहे.
या प्रकल्पा अंतर्गत असलेल्या अॅथॉरिटी डिफॉल्ट आणि करारानुसार संबंधित कंपनीला दंड आकारण्यात येणार आहे. त्याबाबत वरिष्ठांच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. त्याची माहिती गोळा करण्यात येत आहे.
- रीनाज पठाण, कार्यकारी अभियंता, पीएमआरडीए