Pune News: येरवड्यात रानडुकराने घातला हैदोस; अनेकांना घेतला चावा

येरवड्यात सोमवारी (दि. २६) ही घटना घडली. पहाटेच येथील रहिवाशांना चक्क रानडुकरामुळे जाग आली. या रानडुकराने धुमाकूळ घालत अनेकांवर हल्ला केला. काहींच्या हाताचे, मांडीचे चावे घेत तो सैराट सुटला होता.

Yerwada Wild Boar News

येरवड्यात रानडुकराने घातला हैदोस; अनेकांना घेतला चावा

अथक परिश्रमानंतर पकडण्यात यश

कुणाच्या ध्यानीमनी नसताना अचानक अवतरलेल्या रानडुकराने धुमाकूळ घातल्यामुळे येरवड्यातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. सैरभैर झालेल्या या रानडुकराने अनेकांना चावा घेतला. अखेर दीड ते दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्याला पकडण्यात यश आले.

येरवड्यात सोमवारी (दि. २६) ही घटना घडली. पहाटेच येथील रहिवाशांना चक्क रानडुकरामुळे जाग आली. या रानडुकराने धुमाकूळ घालत अनेकांवर हल्ला केला. काहींच्या हाताचे, मांडीचे चावे घेत तो सैराट सुटला होता. रानडुकराला पाहून कुत्र्यांचे भुंकणे अखंड सुरू होते. क्षणार्धात बघ्यांची गर्दी झाली. त्यामुळे रानडुक्कर अधिकच गोंधळले. ते समोर येईल त्याच्या अंगावर जात होता. त्याला पकडण्यासाठी वराहपालनामध्ये प्रावीण्य असलेली मंडळी पुढे आली. मात्र रानडुकराने त्यांच्या तोंडाला फेस आणला. अखेर दीड ते दोन तास हैदोस घातल्यावर त्याने शरणागती पत्करली आणि येरवडेकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

सोमवारी सकाळी येरवड्यातील मदर तेरेसानगर, गाडीतळ परिसरात अचानक रानडुक्कर शिरल्याने रहिवासी भयभीत झाले होते. रानडुक्कर वस्तीत रस्ता मिळेल तिकडे धावत होते. त्याच्या रस्त्याच्या मध्ये येणा-यांना जोरात धडक देत होते. त्यानंतर पडलेल्या व्यक्तीच्या पायाचा किंवा हाताचा चावा घेत होते. रानडुकराचा हा धुमाकूळ आणि कुत्र्यांच्या सततच्या भुंकण्यामुळे काय झाले हे पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान रानडुकराने पाच ते सहाजणांना चावा घेतला होता.

सामाजिक कार्यकर्ते डॅनियल लांडगे आणि सहकाऱ्यांनी तत्काळ या रानडुकराला पकडण्यासाठी येरवड्यातील काही वराहपालन करणा-यांना पाचारण केले. त्यांनी पारंपरिक पद्धतीने रानडुकराला पकडण्यासाठी प्रयत्न केला. मात्र रानडुकराने त्यांना गुंगारा दिला. रानडुकराने त्यांना काही किलोमीटर पळविले. त्यामुळे त्यांच्या तोंडाला फेस आला. अखेर दीड ते दोन तासांनंतर त्यांनी जाळी लावून रानडुकराला कैद केले. तरीसुद्धा थकलेले हे रानडुक्कर पाच ते सहाजणांना आवरत नव्हते. मोठ्या प्रयत्नांनंतर या रानडुकराला पकडल्यामुळे येरवड्यातील रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

 

रानडुकराला सोडले कात्रजच्या घाटात

रानडुकराला पकडल्यानंतर त्याला कात्रजच्या घाटात सोडण्यात आल्याचे समजते. मात्र रानडुकराचे मांस खाण्यासाठी रुचकर असल्यामुळे त्याला सोडून देणे अशक्य असल्याचे बोलले जाते. शिकारीमुळे दुर्मिळ होत असलेले रानडुक्कर पकडल्यानंतर त्याला पकडणाऱ्यांनी नक्कीच पार्टी केली असणार, हे सांगण्यासाठी तज्ज्ञाची गरज नाही.

 

ना महापालिकेला ना वनखात्याला दिली माहिती

येरवड्यात सोमवारी रानडुक्कर आल्याची माहिती ना महापालिका आरोग्य विभागास होती ना वनखात्याला. त्यामुळे पकडणाऱ्यांनी रानडुकराला कुठे सोडले, हे गुलदस्तातच आहे. वनखात्याचे कर्मचारी वेळीच आले असते तर रानडुकराला त्याच्या अधिवासात सोडता आले असते, असे प्राणिप्रेमींचे मत आहे.

 

रानडुक्कर चावल्यामुळे तीनजण रुग्णालयात आले होते. त्यापैकी दोघांना ॲंटीरेबिज सीरम आणि ॲंटीरेबिज व्हॅक्सिन देण्यात आले आहे. एकाची जखम मोठी असल्यामुळे त्याला ससून रुग्णालयात पाठविले.

- डाॅ. रूपेश अगरवाल, निवासी वैद्यकीय अधिकारी, महापालिकेचे राजीव गांधी रुग्णालय, येरवडा

 

पहाटे कुत्र्यांचा भुंकण्याचा प्रचंड आवाज येत असल्यामुळे घराच्या बाहेर काठी घेऊन आलो. एवढ्यात पाठीमागून येऊन रानडुकराने जोरात धडक दिली. त्यामुळे खाली पडलो. काही कळण्याच्या आत रानडुकराने माझ्या हाताचा चावा घेतला. राजीव गांधी रुग्णालयात जखमेवर उपचार घेतले आहेत.

- प्रकाश भालेराव, रहिवासी , मदर तेरेसानगर

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest