अबाधित आहे नदीकाठचे राडारोड्याचे साम्राज्य!
पुणे: कल्याणीनगर (Kalyaninagar) येथील मुळा - मुठा नदी काठावरील डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्यासह (Dr. Salim Ali Bird Sanctuary) नदी पात्र, नाल्यात हजारो शेकडो ट्रक राडारोडा टाकण्याचे काम अजूनही सुरूच आहे. या जागेची मालकी कोणाची हे स्पष्ट होत नसल्याने कोणावर कारवाई करायची हाच पालिकेपुढे प्रश्न आहे. दुसऱ्या बाजूला याच स्थितीचा फायदा घेऊन एका सामाजिक, राजकीय नेत्याने जागा आपली असल्याचा दावा करत दररोज शेकडो ट्रक, ट्रॅक्टरने राडारोडा टाकणे सुरूच ठेवले आहे. (Latest News Pune)
'सीविक मिरर' ने ४ डिसेंबरला डॉ. सलिम अली पक्षी अभयारण्यात हजारो ट्रक राडारोडा अशा मथळ्याखाली बातमी प्रसिध्द केली होती. त्यानंतर नगररोड ( वडगावशेरी) क्षेत्रिय कार्यालयाचे सहायक आयुक्त राजेंद्र बनकर हे राडारोडा टाकणा-याच्या नावाने नोटीस देऊन, पाहणी करून कोणत्याही कारवाईशिवाय रिकाम्या हाताने परतले होते. येथे वारंवार राडारोडा टाकला जात असल्यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी सांगितले.
येथील एका सामाजिक, राजकीय नेते म्हणविणाऱ्या एकाने ही मुळा-मुठा नदी पात्रालगतची जागा आपली असल्याचा दावा करून येथे शेकडो ट्रक, वरुन ट्रॅक्टर राडारोडा टाकणे सुरूच ठेवले आहे. त्यामुळे पक्षी अभयारण्यासह येथील नाले, नदी पात्रात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. दररोज ट्रक, ट्रॅक्टर येऊन येथे राडारोडा टाकत आहेत. सिमेंट क्रॅाक्रिटचे ब्लॅाक, तुटलेले फर्निचर, माती, दगड, विटा, काचा, प्लॅस्टिक आदींचा या राडीरोड्यात समावेश आहे. शेकडो ट्रक राडारोड्यामुळे येथील परिसर जमिनीपासून पंधरा ते वीस फूट उंच झाला आहे. ओपन टु स्काय नाल्यात राडारोडा पडल्यामुळे नाले अधिकच अरूंद झाले आहेत.
मालकीचा वाद
येथील जागा कोणाच्या मालकीची याचा काही थांगपत्ता लागत नाही. ही जागा वन विभागाची, महानगरपालिकेची, फारूख वाडियांची की महार वतनावर दावा सांगणाऱ्यांची याचा थांगपत्ता कोणालाच लागत नाही. जागा कोणाचीही असो पण जागेवर राडारोडा टाकून शहराचे विद्रुपीकरण करण्याचा कोणालाही अधिकार नसल्याची संतप्त प्रतिक्रिया कल्याणीनगर रेसिडेन्शियल असोसिएशनने केला आहे. डॉ. सलीम अली अभयारण्य हे देश-विदेशातील पक्ष्यांसाठी नाही तर राडारोड्यासाठी प्रसिद्ध झाल्याची खंत डॉ.सलिम अली पक्षी अभयारण्य बचावसमितीने व्यक्त केली आहे. डॉ. सलिम अली पक्षी अभयारण्य तीन दशकांपूर्वी वृक्षराजींनी नटलेले होते. हा परिसर फुलपाखरे, किडे-कीटक आणि विविध जातींच्या देशी-विदेशी पक्ष्यांनी संपन्न बनलेला होता. हे ठिकाण पुण्यातील पक्षी निरीक्षणासाठी प्रसिध्द होते. सरकारी कागदपत्रात ‘पक्षी अभयारण्य अशी नोंद आहे. वाडिया यांनी २५ एकर जागा वन विभागाला खास डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्यासाठी बक्षिस दिली होती. अभयारण्याची जागा आपल्या मालकीची असल्याचा दावा करीत एकजण शेकडो ट्रक व ट्रॅक्टर राडारोडा याठिकाणी टाकत आहेत. त्यामुळे विदेशी पक्ष्यांचे अधिवास नष्ट झाले आहे. येथील नाले सुध्दा राडारोड्याने बुजविले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पुराचे पाणी कल्याणीनगर परिसरात पसरण्याची शक्यता आहे. याबाबत महापालिकेच्या नगररोड ( वडगावशेरी ) क्षेत्रिय कार्यालयाला माहिती असूनही संबंधितांवर कारवाई होताना दिसत नाही.
राडारोड्यासाठी तीन ट्रॅक्टर सज्ज
कल्याणीनगर येथील मुळ-मुठा नदीपात्रात राडारोडा टाकण्यासाठी तीन ट्रॅक्टर या ठिकाणी लावलेले आढळले. त्यापैकी एक ट्रॅक्टर गुरूवारी सकाळी अकरा वाजता बाहेरून आणलेला राडारोडा या ठिकाणी टाकताना आढळला. कोठुन राडारोडा आणला, कोणी सांगितले टाकायला, या बाबत माहिती देण्यास ट्रॅक्टर चालकाने नकार दिला.
कल्याणीनगर येथील डॅा सलिम अली पक्षी अभयारण्याला भेट देण्यासाठी माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आले होते. यावेळी हजारो ट्रक राडारोडा उचलून हा संपूर्ण परिसर स्वच्छ केला होता. येथे राडारोडा टाकला जात असेल तर दंड कोणाकडून वसुल करावा हा प्रश्न आहे. मात्र संबंधीतावर गुन्हा दाखल करावा लागेल.
- कुणाल खेमणार, अतिरिक्त महापालिका आयुक्त , पुणे महापालिका