संग्रहित छायाचित्र
पुणे: येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात (Regional Mental Hospital Yerwada) साडेतीनशेपेक्षा अधिक बरे झालेले रुग्ण आहेत. यातील काही बेघर तर काहींना त्यांचे नातेवाईक घरी घेऊन जात नसल्यामुळे त्यांचा मुक्काम मनोरुग्णालयातच आहे. मानसिक आरोग्य कायदा ( मेंटल हेल्थ ॲक्ट) अंतर्गत रुग्णांचे पुनर्वसन बंधनकारक आहे. त्यामुळे येरवडा मनोरुग्णालयाने रुग्णांना घरी पाठविण्यासाठी किंवा त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सिंबायोसिस लॉ कॉलेजसोबत सामंजस्य करार केला आहे. रुग्णालय कायद्याच्या आधारे रुग्णाला घरी पाठविणार आहे.
येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये बरे झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. मात्र बेघर आणि ज्यांचे नातेवाईक घरी घेऊन जात नाहीत त्यांचा मुक्काम मनोरुग्णालयातच आहे. रुग्णालयातील कर्मचारी रुग्णाला घेऊन घरी गेल्यास नातेवाईक स्वीकारत नाहीत. अनेकांनी घर बदलले आहे. रुग्णाच्या नावे जमीन, फ्लॅट, शेती आहे. मात्र, त्याचा उपयोग रुग्णाला होत नाही. बरे झालेल्या मनोरुग्णांना सामान्य जीवन जगता यावे यासाठी कायदेशीर मदत घेण्याकरता येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाने सिंबायोसिस लॉ कॉलेजशी सामंजस्य करार केला आहे. या कराराअंतर्गत ‘सिंबायोसिस’ लॉ कॉलेज रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णाला घेऊन जाण्यासाठी समन्स देणे, रुग्णाला घरी जाण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया राबविणे, रुग्णाला घरी स्वीकारण्यासाठी नातेवाईकाला कायद्याने भाग पाडणे, रुग्णांच्या नावावर असलेली शेती, घर, फ्लॅट ( प्रॉपर्टी) संरक्षित करणे, रुग्ण व नातेवाईकांमध्ये मानसिक आरोग्य कायद्याबाबत जनजागृती करणे आदी कायदेशीर कामे मोफत करणार आहे. (Mental Health)
अकरा प्रकरणात कायदेशीर कारवाई
मनोरुग्णालयातील अकराजणांना घरी पाठविण्यासाठी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. यातील काहींच्या नावे फ्लॅट, जमीन, शेतजमीन अशा स्थायी व अस्थायी प्रॅापर्टी आहेत. मात्र, नातेवाईक त्यांना सांभाळण्यासाठी तयार नाहीत. मात्र, त्यांची मालमत्ता हवी. अशा रुग्णांच्या नातेवाईकांना न्यायालयातून समन्स पाठवून त्यांना घरी पाठविणे किंवा त्यांची मालमत्ता संरक्षित करणे ही प्रक्रिया सुरू असल्याचे समाजसेवा अधीक्षक भाऊसाहेब माने यांनी सांगितले .
"येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय आणि सिंबायोसिस लॉ काॅलेजमध्ये सामंजस्य करार झाला आहे. या अंतर्गत रुग्णाला घरी पाठविण्यासाठी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केली जाणार आहे. त्यामुळे रुग्णांना घरी किंवा त्यांचे मानसिक आरोग्य संस्थेत पुनर्वसन करणे शक्य होणार आहे." - डॉ. सुनील पाटील, अधीक्षक, येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय
"मनोरुग्णांना तज्ज्ञांकडून तपासून घरी पाठविण्याकरीता ठेवले जाते. मात्र, नातेवाईक रुग्णाला वर्षानुवर्ष घरी घेऊन जात नाहीत. त्यामुळे रुग्णालयातील लीगल सेलच्या माध्यमातून रुग्णाला घरी पाठविण्यासाठी सरकारी वकिलाची मदत होऊ शकते.’’ - भाऊसाहेब माने, सामाजसेवा अधीक्षक, येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय
"मनोरुग्णालयातील‘लिगल सेल’ दर बुधवारी सकाळी ११ ते तीन वाजेपर्यंत सुरू असतो. सिंबायोसिस लॉ कॉलेजच्या तृतीय वर्ष व एलएलएमचे विद्यार्थी रुग्णांची सर्व कौटुंबिक माहिती घेऊन कायदेशीर बाबींची पूर्तता करणार आहेत. त्यानंतर रुग्णांना घरी पाठविणार किंवा पुनर्वसनाचा मार्ग मोकळा करणार आहेत." - ॲॅड. विजय पमनाणी, लिगल सेल