संग्रहित छायाचित्र
पुणे: शहरात गेल्या तीन वर्षांत ४२ हजार ६६५ जणांना कुत्र्याने चावा घेतला आहे. शहरात सहा जणांचा रेबीजमुळे मृत्यू झाला आहे. मात्र, शहरात रेबिजच्या आजारामुळे कोणाचाही मृत्यू नसल्याचे महापालिका आरोग्य विभागाने आधी खोटी माहिती दिली होती, असे समोर आले आहे. (Dog Bite Pune)
नायडू रुग्णालयात उपचार घेतलेल्या शहराबाहेरील ४६ जणांचाही यामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे शहरात रेबीजमुळे सहाजणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. तर सातारा जिल्ह्यातील एका अंगणवाडी ताईचा रेबिजने मृत्यू झाला. तर रेबिजमुळे मृत्यू झालेल्यांमध्ये विद्यार्थी, शेतक-यांचाही समावेश आहे.
पुणे जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यातील रुग्णांचा रेिबजमुळे मृत्यू झाल्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. पुणे महापालिकेतील नायडू संसर्गजन्य रुग्णालयात रेबिज झालेल्या रुग्णांना दाखल करतात. रेबिज आजारावर उपचार नाहीत. प्रतिबंधात्मक उपायोजना हाच एकमेव मार्ग आहे. कुत्रा चावल्यामुळे होणारा रेबिज हा आजार जीवघेणा असून वेळीच योग्य उपचार मिळाले तरच जीव वाचवता येऊ शकतो. (Rabies Deaths in Pune)
राज्यातील आरोग्य विभागाची महत्त्वाचे कार्यालय पुणे शहरात आहेत. यामध्ये राज्याचे ‘जलजन्य व संसर्गजन्य आजाराचे’ सहसंचालक कार्यालय, कुटुंब कल्याण कार्यालय एवढेच नसून माहिती व शिक्षणाचे मुख्य कार्यालय ( आयसीब्युरो) पुणे शहरात आहेत. दरवर्षी आरोग्य विभाग आरोग्य जनजागृतीसाठी कोट्यावधी रूपये खर्च करते. तरीसुद्धा ही माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहच नसल्याचे दिसून येते.
पुणे शहरात भटक्या व मोकाट कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया व लसीकरण विविध संस्थांच्या माध्यमातून होते. ब्लूक्रॉस सोसायटी, ॲनिमल वेल्फेअर असोसिएशन, युनिवर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटी अशा संस्थांच्या माध्यमातून दरवर्षी पुणे शहरातील भटक्या कुत्र्यांना ॲंटीरेबिज लस दिली जाते. गेल्या सहा वर्षांत या संस्थांनी ४७ हजार ५०० कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया व ॲंटीरेबिजची लस दिली गेली आहे. त्यामुळे शहरात रेबिजच्या आजारामुळे कोणाचाही मृत्यू नसल्याचे महापालिका आरोग्य विभागाने खोटी माहिती दिली. मात्र लेखी माहिती घेतल्यानंतर पुणे महापालिका हद्दीत सहाजणांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले . यासह शहराच्या बाहेरील ४६ रुग्णांचा तीन वर्षांत रेबीजमुळे मृत्यू झाल्याचे सांगितले.
दोन महिन्यात चार हजार जणांना कुत्र्याचा चावा
यावर्षी जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यात चार हजार पुणेकरांना कुत्र्याने चावा घेतला आहे. गेल्या वर्षी २२,९४५ जणांना कुत्राने चावा घेतल्याची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागात आहे. महापालिकेच्या शहरातील मुख्य रुग्णालयात व दवाखान्यात ॲंटीरेबिजची लस मोफत उपलब्ध आहे. पुणे जिल्ह्यात किंवा जिल्ह्याबाहेरील प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा जिल्हा उपआरोग्य केंद्रात ॲंटीरेबिजची लस उपलब्ध असल्याचा दावा आरोग्य प्रशासन करते. मात्र, वस्तुस्थिती काय आहे, याची माहिती घ्यावी लागणार असे काही स्वयंसेवी संस्थांचे मत आहे.
पुणे महापालिकेच्या नायडू रुग्णालयात गेल्या तीन वर्षांत पुणे शहरातील सहाजणांचा रेबिजने मृत्यू झाला. नायडू रुग्णालयात उपचार घेणाऱ्या शहराबाहेरील ४६ जणांचाही यामुळे मृत्यू झाला आहे. प्राणीप्रेमी संस्थांमुळे पुणे शहरातील भटक्या कुत्रांना ॲंटीरेबिज लस दिली जाते. गेल्या सहा वर्षांत या संस्थांनी ४७ हजार ५०० कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया व ॲंटीरेबिजची लस दिली गेली आहे. त्यामुळे रेबीज मृत्यू दर कमी करण्यात यश मिळविले आहे.
- डॉ. भगवान पवार, आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका
कुत्रा पाळणाऱ्यांनी पहिल्या तीन महिन्यात कुत्र्याला ॲंटीरेबिज लस देणे आवश्यक आहेत. त्यानंतर नियमित प्रत्येक वर्षी ही लस देणे आवश्यक आहे.जर आपल्या कुत्र्याला बाहेरच्या कुत्राने चावा घेतल्यास बुस्टर डोस देणे आवश्यक आहे.
- डॉ. विवेक पांडे, पशूवैद्यक तज्ज्ञ