शूट ॲट साईट!
पुणे: रस्त्याने जाताना (Nagar Road) आपण भारत-पाकिस्तान सीमेवरून तर जात नाही ना, असा भास होतो. कारण येथील हवाईदलाच्या सीमाभिंतीवर लाल रंगात ‘येथे अतिक्रमण अथा घुसखोरी केल्यास थेट गोळी मारली जाईल,’ असे लिहिले आहे. केवळ भीती निर्माण व्हावी यासाठी हे लिहिले आहे की संरक्षणासाठी असे टोकाचे पाऊल उचलले आहे, याची चर्चा नगररोड परिसरात रंगली आहे. (Latest News Pune)
नगररोडवरील पाचवा मैल ते खुळेवाडी फाट्यापर्यंत हवाईदलाची (Air Force) सीमाभिंत आहे. या सिमाभिंतीवर सुरक्षेचे कुंपण आहे. तसेच या भिंतीवर १५ ते २० फुटाच्या अंतरावर इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेत तेही लाल रंगाच्या अक्षरात ‘या ठिकाणी अतिक्रमण अथवा घुसखोरी केल्यास गोळी मारली जाईल,’ असे लिहिले आहे. त्यामुळे येथील पादचारी मार्गावरून जाणाऱ्यांमध्येसुद्धा भीतीचे वातावरण आहे. या रस्त्यावर अनेक फेरीवाले, फळविक्रेते, शूजविक्रेते दुपार ते सायंकाळपर्यंत थांबतात. त्यांनी आता या ठिकाणी थांबणे कमी केले आहे.
पोलिसांना एखाद्या अट्टल गुन्हेगाराला मारण्यासाठी ‘शूट ॲट साईट’ची ऑर्डर दिली जाते. हीसुद्धा दुर्मीळातील दुर्मीळ घटना असते. आपल्या देशात लोकशाही आहे. न्यायव्यवस्था सक्षम आहे. त्यामुळे कोणत्याही गुन्हेगाराला तो दहशतवादी असला तरी न्यायालयीन प्रक्रियेप्रमाणे खटला चालविला जातो. त्यानंतरच सर्व न्यायालयीन सोपस्कार पार पाडल्यानंतर फाशी दिली जाते. त्यामुळे शत्रूलासुद्धा पाहताच क्षणी गोळी मारली जात नाही. त्याला ताब्यात घेऊन कृत्य करण्यामागील हेतू तपासला जातो. सक्षम अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी केली जाते. त्यानंतर पुरावे, साक्षीदार तपासल्यानंतर संबंधिताला कायद्याप्रमाणे शिक्षा होते. हवाईदलाने मात्र आपल्या विभागाच्या सीमाभिंतीवर असा टोकाचा इशारा का लिहिला?
माहिती आणि इशारा या साठी फलक
हवाईदलाच्या सीमाभिंतीवर अतिक्रमण केल्यास अथवा घुसखोरी केल्यास गोळी मारली जाईल, असे लिहिणे म्हणजे माहिती तसेच इशारा असू शकते. ज्या ठिकाणी महत्त्वाची आणि संवेदनशील स्थळे आहेत तेथे अतिरेक्यांचा धोका असतो. त्यामुळे देशाच्या व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लिहिले जाण्याची शक्यता असून देशभरात ज्या-ज्या ठिकाणी हवाईदलाचे स्थळ आहेत, तेथे अशा मजकुराचा इशारा दिला जातो, असे अधिकृत सूत्रांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले.
चोरटे किंवा घुसखोर अशिक्षित असल्यास काय?
संरक्षण दल किंवा हवाई दलात घुसखोरी करणारे चोरटे किंवा घुसखोर अशिक्षित असल्यास त्यांना हवाई दलाची इशारावजा धमकी वाचता आली नाही तर काय, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. चंदनाचे वृक्ष करवतीने कापून नेणाऱ्या अनेक टोळ्या पोलिसांनी पकडल्या होत्या. त्यांना काही वाचता-लिहिता येत नव्हते. चोरीचा किरकोळ गुन्हा असल्यामुळे त्यांची सुटकाही लवकर होते. नंतर ते पुन्हा अशा चोऱ्या करायला तयार असतात, असे पोलिसांनी सांगितले.
हवाई दलाची जागा अतिसंवेदनशील
नगरोडलगत हवाई दलाची सीमाभिंत आहे. हे ठिकाण अतिसंवेदनशील आहे. या ठिकाणी मिग फायटर विमानांचे तळ तसेच पुढे गेल्यास बॉम्ब ड्रम आहे. त्यामुळे येथील सुरक्षा जवान डोळ्यात तेल घालून करतात. संवेदनशील परिसर असल्याने या ठिकाणी घुसखोरी केल्यास गोळी मारली जाईल, असा धमकीवजा इशारा दिल्या असण्याची शक्यता संरक्षण दलातील तज्ज्ञ मंडळींनी व्यक्त केली आहे.
संरक्षण दलाच्या कर्मचारी-अधिकारी क्वार्टर्समध्ये चोऱ्या
संरक्षण दल असो की हवाई दल, त्यांच्या जागेतील चंदनाचे वृक्ष चोरट्यांनी करवतीने कापून नेले आहेत. एवढेच नाही तर चोरट्यांनी संरक्षण दलाच्या कर्मचारी व अधिकारी क्वार्टर्समध्ये घुसून चोऱ्या केल्या आहेत. येरवडा , चंदननगर व विमानतळ पोलीस ठाण्यात अशा चोरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यामुळे अशा चोरट्यांना वचक बसावा, हासुद्धा हेतू असू शकतो,असा पोलिसांचा अंदाज आहे.