Pune News: बुलेटच्या सायलेन्सरवर रोडरोलर!

पुणे: कर्णकर्कश आवाजासह ध्वनिप्रदूषण करणा-या पाच हजार बुलेटवर वाहतूक विभागाने (Pune Traffic Police) कारवाई करीत तब्बल ५० लाख रुपयांचा दंड वसूल केला. या कारवाईत सर्व बुलेटचे माॅडिफाईड सायलेन्सर

Pune Police

बुलेटच्या सायलेन्सरवर रोडरोलर!

पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून शहरातील ६०० बुलेटवर जरब बसवणारी कारवाई; बुलेटचे माॅडिफाइड सायलेन्सर रोडरोलरखाली चिरडले, ५० लाखांचा दंडदेखील केला वसूल

पुणे: कर्णकर्कश आवाजासह ध्वनिप्रदूषण करणा-या पाच हजार बुलेटवर वाहतूक विभागाने (Pune Traffic Police) कारवाई करीत तब्बल ५० लाख रुपयांचा दंड वसूल केला. या कारवाईत सर्व बुलेटचे माॅडिफाईड सायलेन्सर काढून घेत ते रोडरोलरखाली चिरडण्यात आले. (Latest News Pune)

शहरातील बुलेटच्या माॅडिफाईड सायलेन्सरमुळे ध्वनिप्रदूषण होत आहे. याबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याबाबतची बातमी ‘पुणे मिरर’मध्ये गुरुवारी (दि. ८)  प्रसिद्ध झाली होती. त्याची दखल घेत वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्तांनी गुरुवारी आणि शुक्रवारी (दि. ८ आणि ९) शहरातील ६०० बुलेटवर कारवाई केली. या कारवाईत सर्व बुलेटचे माॅडिफाईड सायलेन्सर काढून घेतले. नंतर हे सर्व सायलेन्सर रोडरोलरखाली चिरडले.

शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी शुक्रवारी (दि. ९) संध्याकाळी पत्रकार परिषदेत बुलेटवर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली. बोराटे म्हणाले,  ‘‘शहरातील सर्व वाहतूक विभागांना गुरुवारी सकाळी बुलेटवर कारवाईचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे शहरातील ६०० बुलेट कारवाईसाठी उपायुक्त कार्यालयाच्या आवारात आणले होते. सर्व बुलेटचे मॅाडिफाईड सायलेन्सर काढून टाकण्यात आले. त्यानंतर सर्व सायलेन्सर रोडरोलरखाली चेंबविण्यात आले. यासह प्रत्येक बुलेटचालकांकडून हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.’’

विमानतळ, हांडेवाडी, कोरेगाव पार्क, डेक्कन, भारती विद्यापीठ, हडपसर या वाहतूक विभागांनी सर्वाधिक बुलेटवर कारवाई केली. अनेक बुलेटवर फॅन्सी नंबर प्लेट लावण्यात आले होते. या बुलेट पोलिसांपासून ते गुन्हेगारांचे होत्या. काही नंबर प्लेट गुन्हेगारी क्षेत्राचे उदात्तीकरण केलेल्या गब्बरसिंगचे छायाचित्र लावलेल्या आढळले. मॅाडिफाईड सायलेन्सरमध्पे पंजाब, पटियालाचे फटाक्यांचे आवाज करणाऱ्या, बंगलुरूचे गडगड आवाज करणाऱ्या तर इंदूरच्या नॅार्मल आवाज करणाऱ्या सायलेन्सरचा समावेश होता.

 ६५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज असल्यास अधिक दंड

सायलेन्सर मॅाडिफाय केलेल्या बुलेटचा आवाज ६५ डेसिबलपेक्षा अधिक असतो. काही बुलेट फटाक्यांचा आवाज करत जातात. त्याचा आवाज अतिशय कर्णकर्कश असतो. याचा त्रास लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना होतो. यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अभिप्राय घेतला जाणार आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमाप्रमाणे माॅडिफाईड सायलेन्सर बुलेटवर अधिक दंड होऊ शकतो, असे  बोराटे यांनी सांगितले.

हुंड्यात मिळालेल्या बुलेटवर खोटी नंबरप्लेट

एकाला भुसावळच्या सासरच्या मंडळींनी हुंड्यात बुलेट दिली होती. या बुलेटचे पासिंग झाले नव्हते. तरीसुद्धा हा युवक खोटी नंबरप्लेट लावून बुलेट शहरभर फिरवत  होता. शुक्रवारच्या कारवाईत ही बुलेट वाहतूक पोलिसांना सापडली. मात्र रात्री उशिरापर्यंत त्यावर काय कारवाई केली, हे समजू शकले नाही.

 ८०८७२४०४०० या क्रमांकावर द्या तक्रार

माॅडिफाईड सायलेन्सर लावलेली बुलेट चालवताना चालक आढळल्यास पुणे वाहतूक शाखेच्या ८०८७२४०४००  या व्हाॅट्सॲप क्रमांकावर बुलेटचा क्रमांक लोकेशनसह कळविण्याचे आवाहन शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी नागरिकांना केले आहे.

शहरात बुलेटवर नियमितपणे कारवाई होणार आहे.  नानापेठ, कोंढवा अशा भागांत बुलेटचे सायलेन्सर मॅाडिफाय केले जातात. अशा दुकानांवरही कारवाई केली जाईल. यासह काळ्या काचा असणा-या सर्वच मोटारींवर कारवाई केली जाणार आहे

- शशिकांत बोराटे, उपायुक्त, वाहतूक विभाग, पुणे शहर

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest