Pune News: पुण्यातही बंगळुरूच्या धर्तीवर मनोरुग्णालय; केंद्राकडून साडेसातशे कोटींचा निधी

येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातील शंभर वर्षांपूर्वीच्या ब्रिटिशकालीन बैठ्या खोल्या जमीनदोस्त होणार आहेत. त्याजागी सुंदर पर्यावरणपूरक बैठे कक्ष ( वॅार्ड) बांधण्यात येणार आहेत. भरपूर सूर्यप्रकाश, खेळती हवा असणारे प्रशस्त कक्ष, प्रत्येक रुग्णाला बेड,

पुण्यातही बंगळुरूच्या धर्तीवर मनोरुग्णालय

साडेतीन हजार रुग्णांची क्षमता, ब्रिटिशकालीन बैठ्या खोल्या होणार आता जमीनदोस्त

येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातील शंभर वर्षांपूर्वीच्या ब्रिटिशकालीन बैठ्या खोल्या जमीनदोस्त होणार आहेत. त्याजागी सुंदर पर्यावरणपूरक बैठे कक्ष ( वॅार्ड)  बांधण्यात येणार आहेत. भरपूर सूर्यप्रकाश, खेळती हवा असणारे प्रशस्त कक्ष, प्रत्येक रुग्णाला बेड, व्यायामशाळा, योगा कक्ष, उद्यान, पदपथ अशी रचना असणार आहे. पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र कक्ष असून त्या कक्षावर  सौर ऊर्जा रूफ असणार आहे. केंद्र सरकार साडेसातशे कोटी खर्च करून हे तीन हजार ३५० रुग्ण क्षमतेचे रुग्णालय  बांधणार आहे.  (Pune News)

येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाचे (Yerwada Regional Hospital) अधीक्षक डॉ. सुनील पाटील याबाबत म्हणाले, येरवडा मनोरुग्णालयातील रुग्ण संख्या २५४० असून सध्या या ठिकाणी नऊशे पुरुष व सहाशे महिला उपचार घेत आहेत. रुग्णालयातील रुग्णसंख्या पाहता नवीन रुग्णालयाची आवश्यकता जाणवत होती. सध्या  ब्रिटिशकालीन शंभर वर्षांपूर्वीचे रुग्ण कक्ष आहेत. हे कक्ष जुने झाले आहेत. त्यापैकी अनेक कक्ष मोडकळीस आले आहेत. त्यामुळे नवीन रुग्णालयाचा प्रस्ताव होता. केंद्राने नवीन रुग्णालयासाठी साडेसातशे  कोटी रुपयांची तरतूद केली आहे. बंगळुरू येथील निम्हान्स रुग्णालयाच्या धर्तीवर येरवड्यात रुग्णालय बांधण्यात येणार आहे. सर्व रुग्ण कक्ष बैठे असणार आहेत. यामध्ये पुरुष, महिला कक्ष स्वतंत्र असणार आहेत. सर्व कक्ष पर्यावरणपूरक असून भरपूर सूर्यप्रकाश, खेळती हवा असणार आहे. तसेच कक्षाच्या वरती सौरऊर्जेचे पॅनल असणार आहे. 

मनोरुग्णालयात रुग्णाला दाखल केल्यानंतर रुग्णांची मानसिक व शारीरिक चाचणी केली जाते. येथे रुग्णाला शॉक ट्रिटमेंट दिली जाते. त्यापूर्वी रुग्णाची रक्त तपासणी, एक्सरे, ईसीजी आदी वैद्यकीय तपासण्या केल्या जातात. त्यानंतरच भूल देऊन शॉक ट्रिटमेंटचा उपचार सुरू करतात. या ठिकाणी प्रत्येकी एक इलेक्ट्रोथेरपिस्ट, भूलतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी आहेत. रुग्णांचा आजार किती दीर्घ आहे, त्यांच्या शारीरिक व मानसिक स्थितीवरून त्यांना फिट, अशक्त किंवा सर्वसाधारण कक्षात उपचारासाठी ठेवले जाते. त्यामुळे येथे सर्व विभागाचे स्वतंत्र कक्ष असणार आहेत. हे कक्ष रुग्णांसाठी सोईचे, फायद्याचे ठरतील, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

फॅमिली वॅार्डसह व्यसनमुक्ती केंद्र 

येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या नवीन सोई सुविधांमध्ये फॅमिली वॅार्ड, व्यसनमुक्ती केंद्रसुद्धा असणार आहे. याचे स्वतंत्र कक्ष असणार आहेत. फॅमिली कक्षात रुग्णांसोबत त्यांचे पालकसुद्धा राहू शकतात. त्यामुळे रुग्णाला उपचारांसोबतच पालकांचा सहवास मिळाल्यामुळे ते लवकर बरे होतील, असा विश्वास डॅा. पाटील यांनी व्यक्त केला. सध्या व्यसनाधीन रुग्ण मोठ्या प्रमाणात रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांवर स्वतंत्रपणे उपचार केले जाणार आहेत. त्यांना मनोरुग्णालयात ठेवले जाणार नाही, असेही पाटील यांनी सांगितले . 

येरवडा मनोरुग्णालयाला शंभर वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे. यातील अनेक कक्ष मोडकळीस आले आहेत. त्यामुळे ते बंद आहेत. केंद्र सरकारने नवीन रुग्णालयासाठी साडेसातशे कोटी मंजूर केले आहेत. बंगळुरूच्या निम्हान्सला केंद्रस्थानी ठेऊन नवे रुग्णालय बांधणार आहे.” 

- डॉ. सुनील पाटील , अधीक्षक, येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest