संग्रहित छायाचित्र
'डासांनी घेतला माजी नगरसेविकेचा जीव' हे शीर्षक तुम्हाला अतिशयोक्ती वाटत असले तरी हे सत्य आहे. आता हे सत्य समजावून घेण्यासाठी त्या घटनेच्या मागे जावयास हवे.
गेल्या महिन्यात डासांपासून संरक्षण करण्यासाठी वडगाव शेरी येथील माजी नगरसेविका शीतल ज्ञानेश्वर शिंदे (Shital Dnyaneshwar Shinde) (वय ४१) घराशेजारी धूर करण्यासाठी कचरा जाळत होत्या. कचरा व्यवस्थित पेटून त्यानंतर धूर व्हावा म्हणून त्यांनी त्यावर सॅनिटायझर टाकले. त्यामुळे आगीचा भडका उडाला आणि त्यांच्या साडीने पेट घेतला. त्यात त्या चाळीस टक्के गंभीर भाजल्या. यानंतर गेले दीड महिना शिंदे एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होत्या. आधीच त्यांना मधुमेहाचा आजार असल्यामुळे उपचारादरम्यान शिंदे यांच्या शरीरात अनेक अवयवांच्या कामावर परिणाम झाला आणि विविध समस्या निर्माण झाल्या. त्यातच त्यांचा बुधवारी (ता. ३) रात्री मृत्यू झाला. त्यामुळे वडगाव शेरीवर शोककळा पसरली होती.
गेल्या दीड-दोन महिन्यांपासून वडगाव शेरी, खराडी परिसरात मोठ्या प्रमाणावर डासांचे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यामुळे डासांपासून संरक्षण करण्यासाठी येथील नागरिक वेगवेगळे उपाय करीत होते. त्यामध्ये अनेकांना वाटते की धूर केल्यामुळे डास होत नाहीत. त्यामुळे अनेकजण कचरा जाळतात. असाच प्रकार फेब्रुवारीच्या २० तारखेला माजी नगरसेविका शीतल शिंदे यांच्याबाबत झाला. त्यांनी घराजवळ धूर करण्यासाठी कचरा जाळला होता. कचरा व्यवस्थित पेटत नव्हता म्हणून त्यांनी धुमसत असलेल्या कचऱ्यांवर सॅनिटायझर टाकले. त्यात आगीचा धडका उडाल्याने शिंदे यांच्या साडीने पेट घेतला. आगीमध्ये त्या चाळीस टक्के गंभीर भाजल्या होत्या. त्यानंतर त्यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांना आधीच मधुमेह असल्यामुळे उपचारादरम्यान त्यांना डायलिसिस करावे लागले. दरम्यान त्यांच्या शरीरातील अन्य अवयव निकामी होत गेले. बुधवारी (ता. ३ ) रात्री त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यामुळे वडगाव शेरी परिसरात शोककळा पसरली होती. शीतल शिंदे यांचे पती ज्ञानेश्वर शिंदेसुद्धा नगरसेवक होते. ज्ञानेश्वर शिंदे अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पहिल्यांदा नगरसेवक झाले. दुसऱ्या वेळी पत्नी शीतल यांना नगरसेवक केले होते. दोघांनीही वडगाव शेरीत चांगले काम केल्यामुळे त्यांची लोकप्रियता चांगली आहे. शीतल यांच्या अकाली जाण्यामुळे वडगाव शेरीतील रहिवासी हळहळ करीत आहेत. गुरुवारी सकाळी वडगाव शेरी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एका चांगल्या समाजसेविकेचा डासांनी प्राण घेतल्याने आता तरी पालिका प्रशासन जागे होणार आहे का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. प्रशासनाने डासांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. त्यासाठी आणखी काहीजणांचा प्राण जाण्याची प्रतीक्षा करू नये, असे एका नागरिकाने सांगितले.
डासांचा उपद्रव कायम
मुळा-मुठा नदीच्या काठावरील वडगाव शेरी, खराडी असो की मुंढवा, केशवनगर परिसरात डासांचा प्रादुर्भाव अधिक आहे. मुळा-मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी अडकून पडल्यामुळे डासांचे प्रमाण वाढत आहे. कितीही जलपर्णी काढली तरी ते पुन्हा पाण्याच्या प्रवाहात येऊन जमा होतात. त्यामुळे महापालिकेने जलपर्णीचा कायमस्वरूपी उपायोजना करावी अशी मागणी वडगाव शेरी, खराडीतील रहिवाशांनी केली आहे.
माजी नगरसेविका शीतल शिंदे डासांना प्रतिबंधासाठी धूर करीत होत्या. त्यासाठी त्या कचरा जाळत असताना सॅनिटायझर टाकल्यामुळे आगीचा भडका उडाला आणि त्या चाळीस टक्के भाजल्या होत्या. याबाबत मेडिको लिगल कंप्लेंट व अपघाती मृत्यूची नोंद केली गेली आहे.
- मनीषा पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर पोलीस ठाणे