पेट्रोल पंपावर मिळते बाटलीत पेट्रोल
पुणे: बाटलीमध्ये पेट्रोल विकणे आणि विकत घेणे बेकायदेशीर असतानादेखील कर्वे रस्त्यावरील (Karve Road) इंडियन ऑईलच्या (Indin Oil) पेट्रोल पंपावर मात्र, दुचाकीस्वार ग्राहकांना बाटलीमध्ये पेट्रोल देण्यात आल्याचे समोर आले आहे.
कर्वेनगर येथील एका इंडियन ॲाईलच्या पेट्रोल पंपावर बुधवारी (दि. १४) दुपारी सव्वातीनच्या सुमारास काही युवक बाटलीमध्ये पेट्रोल घेण्यासाठी आले. त्यांच्याकडे दुचाकी होती, तरीसुद्धा दोघे दोन बाटलीत पेट्रोल घेऊन गेले. याबाबत बाटलीत पेट्रोल मिळणार नाही, असे फलक अनेक पेट्रोल पंपांवर झळकत असतात. मात्र या ठिकाणी असा फलकही निदर्शनास आला नाही. त्यामुळे पेट्रोल पंपावर बाटलीत सहज पेट्रोल मिळत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Petrol in Bottle at Karvenagar)
काही वर्षांपूर्वी एकतर्फी प्रेमातून पेट्रोल टाकून युवतींना जाळण्याच्या घटना घडल्या होत्या. यासोबतच गुन्हेगारी विश्वातील गुन्हेगार एकमेकांच्या भांडणात पेट्रोलचा सर्रास वापर करताना आढळतात. त्यामुळे केंद्र सरकारने सर्व ॲाईल कंपन्यांना पेट्रोल विक्रीच्या मार्गदर्शक सूचना दिल्या. त्यानुसार दुचाकी व मोटार व्यतिरिक्त कोणालाही बाटलीत सुटे पेट्रोल देण्यास प्रतिबंध करण्यात आले. असे पेट्रोल दिल्यास संबंधित पेट्रोलचालकाला दंडाची तरतूद आहे.
पुणे शहरात खुलेआम सुटे पेट्रोल विक्री होत आहे. शहरातील तसेच उपनगरातील गॅरेजमध्येसुद्धा पेट्रोल विक्री केली जात असल्याचे निदर्शनात आले आहे. वाघोलीसारख्या भागात आता पेट्रोल कुठेही सहज विक्रीसाठी उपलब्ध असते.
केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाच्या व पेट्रोल कंपन्यांच्या वेबसाईटवर मार्केटिंग डिसिप्लिन गाइडलाईन्स (एमडीजी) आहेत. त्यानुसार वाहनाव्यतिरिक्त कोणत्याही बाटलीत किंवा डब्यात अथवा भांड्यात पेट्रोल देता येत नाही. अशी विक्री करणा-यांचा खुलासा घेतो. तो खुलासा समाधानकारक नसल्यास त्यांच्यावर कारवाई करतो. “
- अभिषेक कुमार, वरिष्ठ विक्री व्यवस्थापक, इंडियन ॲाईल प्रा. लि. कंपनी, पुणे