पुणे: येरवडा कारागृहातील कैद्यांच्या नातेवाईकांसाठी नवे प्रतीक्षालय!
येरवडा मध्यवर्ती कारागृहात राज्याच्या काना-कोपऱ्यातील कैदी ठेवलेले आहेत. साहजिकच या कैद्यांना भेटण्यासाठी त्यांचे नातेवाईक येरवडा कारागृहात येतात. या नातेवाईकांसाठी तुरुंगात प्रतीक्षालय असले तरी त्याची स्थिती अत्यंत खराब आहे. याठिकाणी ना पिण्याचे पाणी आहे ना न्याहरीसाठी एखादे कँटिन . हिरकणी कक्षाचा अभाव, शौचालयाची नेहमीप्रमाणे दुरवस्था. त्यामुळे कैद्यांच्या नातेवाईकांची मोठी कुचंबणा होते. यासाठी आता एका खासगी कंपनीच्या माध्यमातून आणि पीडब्ल्यूडीतर्फे अशी दोन सोईसुविधांयुक्त प्रतीक्षालये बांधली जात आहेत. याचे भूमिपूजन नुकतेच झाले असून या वर्षाच्या शेवटी हे प्रतीक्षालय वापरात येण्याची शक्यता आहे.
येरवडा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या वकील आणि नातेवाइकांसाठी सुसज्ज प्रतीक्षालय उभारण्यात येत आहे. सायबेज कंपनीकडून दीड कोटी रुपये खर्चून सामाजिक उत्तदायित्व निधीतून (सीएसआर) १७ हजार चौरस फुटांवर त्याचे बांधकाम होत आहे . मध्यवर्ती कारागृहासमोर असलेल्या ब्रिटिशकालीन घोड्याच्या तबेल्याच्या जागी हे प्रतीक्षालय उभारले जात आहे. कारागृह प्रशासनाने या तबेल्यांचे महिला कारागृह कर्मचाऱ्यांच्या घरात रूपांतर केले होते. हे तबल्याचे बांधकाम तोडून या ठिकाणी ‘सीएसआर’च्या माध्यमातून प्रतीक्षालय बांधले जात आहे. यासह सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) दहा कोटी रुपये खर्च करून पूर्वीचे प्रतीक्षालय पाडून त्याच्या जागी नवे प्रतीक्षालय बांधणार आहे. यासह कारागृहातून कैद्यांना न्यायालयात घेऊन जाणाऱ्या व न्यायालयातून कारागृहात कैद्यांना घेऊन येणाऱ्या पोलिसांसाठी ( कोर्ट पार्टी) प्रतीक्षालय बांधणार आहे.
येरवडा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाइकांना कारागृहासमोर रस्त्यावर थांबून मुलाखतीची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे जेल रस्त्यावर दररोज सकाळी आणि संध्याकाळी नातेवाइकांची मोठी गर्दी होऊन वाहनांना अडथळा निर्माण होतो. यातून अनेकदा लहान-मोठ्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत.
दररोज दीड हजार नातेवाईक
येरवडा कारागृहात सात हजारांपर्यंत कैदी शिक्षा भोगत आहेत. दररोज सुमारे दीड हजार कैद्यांचे नातेवाइक आणि त्यांचे वकील भेटण्यासाठी येतात. रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेत नातेवाइकांना थांबण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याने अनेकदा रस्त्यावर भेटीची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे कारागृहाला नवीन प्रतीक्षालयाची नितांत गरज होती.
सायबेजचे प्रतीक्षालय
'आयटी' क्षेत्रातील सायबेज कंपनीचे अधिकारी आणि कारागृह अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रतीक्षालयाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. कंपनीने कैद्यांचे नातेवाइक आणि वकिलांसाठी प्रतीक्षालय बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण नथानी, संचालिका रितू नथानी यांच्या हस्ते नुकतेच प्रतीक्षालयाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी कारागृह अधीक्षक सुनील ढमाळ, उपअधीक्षक भाईदास ढोले, पल्लवी कदम, आनंदा कदम आदी उपस्थित होते.