संग्रहित छायाचित्र
पुणे: महापालिका केंद्र सरकारच्या विशेष निधीतून मुळा-मुठा नदीकाठ सुशोभीकरण (जायका) प्रकल्प राबवत आहे. यासाठी मुळा-मुठा नदीकाठावर हजारो डंपर दगड, माती टाकून सुशोभीकरण करण्यात आले होते. मात्र मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे हजारो डंपर दगड, माती वाहून गेली असून नदीकाठ सुशोभीकरणाची वाट लागली आहे.
गेली तीन वर्षांपासून जायका प्रकल्पाचे काम सुरू आहे. या काळात मोठा पाऊस न झाल्यामुळे मुळा-मुठा नदी दुथडी भरून वाहिली नव्हती. मात्र, पुणे शहर आणि धरण परिसरात जुलै महिन्यात विशेषत: मागील आठवड्यात उच्चांकी पाऊस झाला. यामुळे मुळा-मुठा नदीकाठावरील दगड आणि माती मोठ्या प्रमाणात वाहून गेले आहे. त्यामुळे जायकाच्या मर्यादा उघड पडल्या आहेत.
पुणे महापालिकेच्या वतीने १० ते १२ वर्षांपूर्वी काही कोटी रुपये खर्च करून मुळा-मुठा नदीकाठ सुधारणा करण्यात आली होती. त्यासाठी हजारो ट्रक माती आणि घडीव दगड विशिष्ट पद्धतीने ठेवण्यात आले होते. त्यामुळे नदीकाठावरील झुडपांची वाढ होऊन नदीच्या पाण्यातील अशुद्ध घटक शोषून घेऊन पाणी शुद्ध होणार होते. बंडगार्डन ते ताडीवाला रस्ता तर दुसऱ्या बाजूला माळी महाराज विसर्जन घाट ते शाहदावल बाबा दर्ग्यापर्यंत काम झाले होते. त्यानंतर पुन्हा २०२२ मध्ये पुणे शहरात जी-२० च्या प्रतिनिधींच्या बैठका झाल्या. यासाठी महापालिकेच्या वतीने युद्धपातळीवर तयारी केली गेली होती. मुळा-मुठा नदीचे प्रदूषण नियंत्रण करणे याअतंर्गत पुन्हा बंडगार्डन येथील मुळा-मुठा नदीकाठ सुशोभीकरण करण्यासाठी घेतले आहे.
या भव्य प्रकल्पाचे काम बी. जी. शिर्के कंपनीला दिले आहे. त्यामुळे याठिकाणी दिवस-रात्र काम सुरु होते. मेट्रो मार्गात निघालेले मोठे दगड या ठिकाणी आणून पुन्हा नदीकाठावर टाकण्यात आले. काही मीटर नदीकाठाचे सुशोभीकरण करून ते पाहुण्यांना दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न महापालिकेने केला.
मुळा-मुठा नदीकाठावरील लाल व निळ्या रेषांचा विचार न करता ही कामे सुरू आहेत. पावसाळ्यात विशेषत: पूर परिस्थितीत बंडगार्डन पुलाखालून प्रचंड वेगाने मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असते. अशा वेळी कोटयवधी रुपये खर्च करू नदीकाठ सुधार प्रकल्प पाण्यात जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली होती. दगड, माती पाण्यात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंधाऱ्यातील साठा कमी होऊन मागे फुगवटा निर्माण होणार आहे. त्याचा परिणाम म्हणून पुराचे पाणी ताडीवाला रस्ता आणि पाटील इस्टेट परिसरातील घरांमध्ये शिरू शकते. याचा विचार ना महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेने केला आहे ना राज्य सरकारने.
जायका प्रकल्प चांगला असला तरी यामध्ये नागरिकांना सहभागी करून घेण्यात आलेले नाही. शहरातील अनेक सामाजिक संघटना आणि पर्यावरणवादी मंडळींचा याला विरोध आहे. हा विरोध झुगारून महापालिकेने न्यायालय, हरित लवाद न्यायालयात युक्तिवाद करून प्रकल्प रेटला. मात्र, या पावसाळ्यात या प्रकल्पाच्या मर्यादा दिसून आल्या. काही टन माती आणि दगड पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने जायका प्रकल्पाच्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पर्यावरणवाद्यांच्या सूचनांचा केला नाही विचार
अहमदाबाद येथील नर्मदा नदीकाठ सुधारणा प्रकल्पाप्रमाणे मुळा-मुठा नदी प्रकल्प करण्याचा विचार महापालिकेचा आहे. मात्र, येथील पावसाचे प्रमाण, पुराच्या पाण्याचा विर्सग याचा विचार केलेला दिसत नाही. मुळा-मुठा नदीकाठावर व्यवसायिकदृष्ट्या जागा भाड्याने देणे, पर्यटनाला चालना देणे, नदीला मिळणारे सर्व नाले एकत्रित जोडून मैलापाणी शुद्धीकरण करणे, नदीतील पाणी प्रवाहित करणे हा उद्देश आहे. मात्र, यामध्ये नागरिकांचा सहभाग, पर्यावरणवाद्यांनी केलेल्या सूचनांचा विचार केला गेल्याचे दिसून येत नाही.