पुणे मेट्रो
सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाने पुणे मेट्रो स्थानकांचा स्ट्रक्चरल पाहणीचा अंतिम अहवाल मेट्रोला गुरूवारी पाठवला आहे. या अहवालाला विलंब झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मेट्रो स्थानके सुरक्षित असल्याचा निर्वाळा अहवालात दिल्याचा दावा महामेट्रोने आता केला आहे.
काही अभियंत्यांनी पुणे मेट्रो स्थानकांच्या त्रुटी संबंधी मेट्रोला पत्राद्वारे कळविले होते. मेट्रोने त्यावर त्वरित कार्यवाही करत सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाची मेट्रो स्थानकांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासंबंधी नेमणूक केली. तसेच मेट्रो स्थानकांच्या सुरक्षिततेबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या जनहित याचिकेवर १७ एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाने पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट करून सात दिवसांत अहवाल सादर करावा, असे सांगिण्यात आले होते.
त्यानुसार, विद्यापीठाकडून मेट्रोच्या वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गावरील स्थानकांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. प्राध्यापक बी.जी. बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली हे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. बिराजदार यांनी मेट्रोला स्ट्रक्चरल ऑडिटचा पाहणी अहवाल सादर केला होता. या अहवालात मेट्रो स्थानकांबाबत काही तांत्रिक मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. त्याला महामेट्रोकडून उत्तर देण्यात आले. त्यानंतर पुन्हा तपासणी करून अखेर अंतिम अहवाल महामेट्रोला सादर करण्यात आला आहे.
या अहवालात सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाने स्पष्ट निर्वाळा दिला आहे की, “मेट्रोची स्थानके ही सुरक्षित आहेत. स्थानकांना भेट देऊन त्यांचे निरीक्षण करण्यात आले तसेच मेट्रो स्थानकांच्या संरचनेचे विश्लेषण करून त्यांची भूकंप विरोधक क्षमता देखील पडताळण्यात आली. मेट्रो स्थानकांची पर्याप्त सुरक्षाद्वारे आखणी करण्यात आली आहे आणि मेट्रोची स्थानके सुरक्षित आहेत.”