पुणे मेट्रोचे हात दाखवून अवलक्षण!
विशाल शिर्के
TWEET@vishal_mirror
'ओळखा पाहू'च्या नावाखाली पुणेकरांना काहीही प्रश्न विचारल्यावर काय होते, याचा अनुभव 'पुणे मेट्रो' ला मंगळवारी आला आहे. मेट्रो रेल्वेच्या दोन छायाचित्रांमधील फरक ओळखा अशा आशयाचे ट्वीट मेट्रोने केले होते. त्यात मेट्रोच्या दोन गाड्यांचे छायाचित्र देण्यात आले होते. मात्र, त्यातील फरक सांगण्याऐवजी मेट्रोचे संथ गतीने सुरू असलेले काम, कार्यरत असलेले अत्यंत थोडे मार्ग, कामामुळे होणारी वाहतूक कोंडी अशा अनेक कारणांमुळे त्रस्त झालेल्या पुणेकरांनी मेट्रोच्या या ट्विटवर खास पुणेरी शैलीत टोमणे मारले आणि टीकाही केली.
वेगवान वाहतुकीसाठी शहरात मेट्रोचे जाळे आखण्यात आले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड त्यामुळे जोडले जाणार आहे. या शिवाय शहरातील हडपसर, कात्रज, बालेवाडी आणि येरवडा हे परिसर अधिक जवळ येणार आहेत. विविध उपनगरांमध्ये काम करणाऱ्या नोकरदारांना अथवा शहरातील एका टोकाहून दुसऱ्या टोकाला प्रवास करणाऱ्या कोणालाही मेट्रोचा फायदा होईल असा दावा केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात फारच थोडे मार्ग सुरू झाले आहेत. येत्या सप्टेंबरपर्यंत ३३ किलोमीटरचे मार्ग सुरू करण्याचे मेट्रोचे नियोजन आहे. तर, ८२.५ किलोमीटरच्या दुसऱ्या टप्प्याला अद्याप मंजुरीदेखील मिळालेली नाही. अशी स्थिती असताना लोकांच्या जखमेवर मीठ चोळणारे छायाचित्र प्रसिद्ध केल्याने पुणेकरांनी मेट्रोचा यथेच्छ समाचार घेतला आहे.
तसेच, अन्य गोष्टी करण्यापेक्षा मेट्रो प्रशासनाने आधी मेट्रो सुरू करावी, असे आवाहन पुणेकरांनी अस्सल पुणेरी शैलीत केले आहे.
दरम्यान, साधारण १५ दिवसांपूर्वीदेखील मेट्रोने अशाच प्रकारचे एक ट्वीट करून पुणेकरांच्या हातात आयते कोलीत दिले होते. पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडी चुकवायची असेल, तर मेट्रोने प्रवास करा, अशा आशयाचे ट्वीट पुणे मेट्रोने केले होते. मात्र, यामुळे पुणे मेट्रो पुणे महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करते आहे, असा अर्थ निघाला. पुणेकरांनी हाच धागा पकडून तेव्हाही मेट्रोवर शेरेबाजी केली होती. आता पुन्हा एकदा फरक ओळखामुळे पुणे मेट्रो 'ट्रोल' झाली आहे.
पुणे मेट्रोने समाजमाध्यमावर मेट्रो रेल्वेची दोन छायाचित्रे 'ट्वीट' केली आहेत. 'ओळखा पाहू !' असा मथळा देऊन मेट्रोच्या दोन छायाचित्रांमधील फरक ओळखण्याचे आवाहन पुणेकरांना केले. आपले उत्तर प्रतिक्रियांद्वारे कळवा असेही मेट्रोने त्यात म्हटले आहे. पुणेकरांनी ही संधी साधून मेट्रोला पुणेरी शैलीतील शाब्दिक फटकाऱ्यांचा आहेर दिला आहे.
सूरजीत जोशी यांनी फोटोतील डावीकडील मेट्रो मंगळागौर आणि उजवीकडील हळदी-कुंकवाच्या कामासाठी भाड्याने मिळेल, असे मजेशीर उत्तर दिले आहे. एकाने एक गाडी लहान मुलांच्या सहलीसाठी आणि दुसरी वाढदिवस, रांगोळी स्पर्धांसाठी असल्याचे म्हटले आहे. एलियन फ्रॉम प्लॅनेट अर्थ या नावाने ट्वीट करणाऱ्या व्यक्तीने मेट्रो सुरू होईपर्यंत तुमचे पगार चालू राहणार आहेत. त्यामुळे तोपर्यंत आपण गप्प बसलेले बरे, अशी खोचक टिप्पणी केली आहे. तर, कमलेश नावाच्या व्यक्तीने गुलाबी रंगाची गाडी माहेरी जाणाऱ्या महिलांसाठी आणि निळ्या रंगाची गाडी सासरी जाणाऱ्या पुरुषांसाठी असल्याचे नोंदवले आहे.
प्रसाद गुपचूप म्हणतात, 'आम्ही फरक नाही सांगू शकत दोन्ही (ट्रेन) मधला. मात्र, साम्य सांगतो. या दोन्ही गाड्या लोकांच्या उपयोगाच्या नाहीत', असे सांगत नाराजी व्यक्त केली आहे. आशिष शेवाळे यांनी 'दोन्ही फोटो केवळ शोसाठी (दिखाव्यासाठी) आहेत. तुमच्याकडून काही मेट्रो सुरू होत नाही', असे म्हटले आहे. मराठी बेरोजगार नावाने ट्विट करणारा किशन म्हणतो, 'रोजगार परप्रांतीयांना, इथं येडं बनवा लोकांना.' डूईंग व्हॉट इज राईट या नावाने ट्वीट करणाऱ्या सुमीतने अपयश आणि आपत्ती अशी संभावना करीत रोष व्यक्त केला आहे. राहुल याने (मेट्रो) चालू कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला आहे.
ओंकार जोष्टे म्हणतात, 'कृपया अशा प्रश्नमंजूषा मराठीतून घेतल्या जाव्यात.' तर, पुणेकर नावाने ट्विट करणारा संदीप म्हणतो 'पहिली फुलराणी आणि दुसरी रातराणी आहे.' काम माईंड या नावाने अकाऊंट असणाऱ्या एका व्यक्तीने 'लग्नासाठी ट्रेन मिळेल का?' अशी विचारणा केली आहे. ह्युमॅनिटी वॉरियरने एक ट्रेन म्हणजे अदानी आणि दुसरी अंबानी असल्याचे म्हटले आहे. जो व्होकल म्हणतो, 'दोन्ही फोटो पार्किंगमध्ये काढले आहेत. पुढील काही महिने या ट्रेन पार्किंगमध्येच राहणार आहेत.' मनोहर मुळुक म्हणतात, 'आधी ट्रेन चालू करा मग फरक विचारा.' अविनाश जाधव म्हणतात, 'हा वेडेपणा बंद करा आणि मेट्रो चालू करा.' फिरोज अन्सारी म्हणतात 'फोटो दाखवून समाधान करणार का? ट्रेन चालू कधी करणार?' एकूणच पुणेकरांना मेट्रोच्या क्वीझमध्ये नाही, तर मेट्रो लवकरात लवकर सुरू करण्यात रस असल्याचे त्यांच्या प्रतिक्रियेतून दिसून येत आहे.