रोबोटिक नी रिप्लेसमेंटची पुणे आता राजधानी
लोकमान्य हॉस्पिटलने आयोजित केलेला रोबोटिक नी रिप्लेसमेंटवरचा चौथा आंतरराष्ट्रीय परिसंवाद नुकताच पार पडला. या क्षेत्रातील आघाडीचे तज्ज्ञ, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक पातळीवरील शल्यविशारद परिसंवादाच्या रुपाने एकत्र आल्याने पुणे रोबोटिक नी रिप्लेसमेंटची राजधानी बनत असल्याचे सिद्ध झाले. या परिसंवादात नी रिप्लेसमेंट क्षेत्रातील प्रगती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे दर्शन झाले.
रोबोटिक नी रिप्लेसमेंटच्या क्षेत्रात लोकमान्य हॉस्पिटलचा समूह आघाडीवर आहे. लोकमान्य समुहाचे कार्यकारी संचालक डॉ.नरेंद्र वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्त्वाखाली २०१६ मध्ये पहिली रोबोटिक नी रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. तेव्हापासून लोकमान्य समुहाने आघाडी कायम ठेवत या क्षेत्रात आपण जागतिक पातळीवर सरस असल्याचे सिद्ध केले आहे.
चौथा आंतरराष्ट्रीय परिसंवाद हा वैद्यकीय ज्ञानाचा महासागर होता. यामध्ये १९ प्रत्यक्ष शस्त्रक्रिया दाखविण्यात आल्या. यामुळे जगभरातील डॉक्टरांना अत्याधुनिक शस्त्रक्रिया, तंत्रज्ञानाची माहिती घेता आली. ऑर्थोपेडिक आणि ऑर्थोप्लास्टी शल्यविशारदांना आपल्या ज्ञानाची, नव्या पद्धतीची, अनुभवाची, कल्पकतेची, सहकार्याची देवाण-घेवाण करण्याची संधी या परिसंवादाने उपलब्ध करून दिली.
परिसंवादाचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र वैद्य यांनी आपल्या भाषणात वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञान कसे अविभाज्य भाग बनत आहे हे विषद केले. अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्रे, कार्यपद्धती, अचूकता, कमीत कमी होणारी आरोग्याची हानी आणि रुग्णांना होणारा लाभ यावर त्यांनी सविस्तर विवेचन केले. परिसंवादाचे प्रमुख पाहुणे डॉ. विक्रम शहा, आंतरराष्ट्रीय ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. शरण पाटील यांचीही यावेळी भाषणे झाली. या परिसंवादात देशातील ३५० शल्यविशारदांनी भाग घेतला.