पुणे: बसथांबे नावालाच, प्रवाशांऐवजी जाहिरातदारांसाठी थांबे उभारल्याचा आरोप, सुस्थितीतील थांबे उभारण्याची मागणी

पुण्यात मान्सूनचे आगमन झाले असून गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक पुणेकर रोजच्या प्रवासासाठी बसवर अवलंबून असतात. तथापि, अनेक पुणेकर आणि बस प्रवासी आरोप करतात की शहरातील बस थांब्यांची दुर्दशा झालेली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Mon, 10 Jun 2024
  • 05:02 pm
Pune news

बसथांबे नावालाच, प्रवाशांऐवजी जाहिरातदारांसाठी थांबे उभारल्याचा आरोप

श्रेयस वांगे :
पुण्यात मान्सूनचे आगमन झाले असून गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक पुणेकर रोजच्या प्रवासासाठी बसवर अवलंबून असतात. तथापि, अनेक पुणेकर आणि बस प्रवासी आरोप करतात की शहरातील बस थांब्यांची दुर्दशा झालेली आहे. अनेक ठिकाणी एकतर छत नाही किंवा असले तर ते तुटक्या-फुटक्या अवस्थेत आहे, बसण्यासाठी योग्य जागा नाही, बस थांब्याच्या बाजूस संरक्षण नाही. बस थांबे अजिबात चांगल्या स्थितीत नाहीत. बस थांब्यांजवळ पावसाचे पाणी साचण्याची दाट शक्यता आहे. बस थांब्यांची रचना आणि देखभालीवर पुणेकरांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यातच पावसाळ्यात गरज असताना हे बस थांबे अजिबात कामाला येत नाहीत. 

‘देखभाल नाही’
बस प्रवासी व वानवडीचे रहिवासी अमोघ गायकवाड म्हणाले, “सध्या बांधलेले बस थांबे प्रवाशांच्या सोयीसाठी नसून जाहिरातदारांच्या सोयीसाठी आहेत असे दिसते. बसथांब्यांमुळे उष्मा आणि पावसापासून संरक्षण मिळणे अपेक्षित आहे, पण त्यांचा उद्देश पूर्ण होताना दिसत नाहीत. हे केवळ दिखाव्यासाठी आणि राजकीय नेत्यांच्या प्रचारासाठी उभारले आहे का अशी शंका निर्माण होते.”

धानोरीचे बस प्रवासी आशिष जक्कील्लू म्हणाले, “पावसाळा दारात असल्याने धानोरीतील बसथांब्यांच्या देखरेखीचा प्रश्न उपस्थित होतो. धानोरी येथील बसथांब्यांची अवस्था बिकट आहे. अनेक बसस्थानकांचे छत तुटले आहे. तेथे बसण्याची व्यवस्था योग्य नाही. बहुतांश प्रवासी, ऑफिसला जाणारे कर्मचारी, कॉलेजला जाणारे विद्यार्थी आदींना यामुळे बसथांब्यावर थांबणे अवघड होते. प्रशासनाने यावर प्राधान्याने कार्यवाही करून बसथांबे दुरुस्त करावेत. यामुळे  सर्वसामान्य प्रवाशांना पावसात काहीसा दिलासा मिळेल.”

बालेवाडीच्या  बस प्रवासी मेघना भंडारी म्हणाल्या, “बालेवाडीत फक्त २ बस स्टॉपवर शेड आहेत आणि १ बस स्टॉप खांबाजवळ आहे. आता त्याला स्टॉप म्हणता येणार नाही. कारण, येथे बस स्टॉपची कोणतीही रचना नाही. बेसिक शेड, वेळेसह बसची संख्या दर्शवणारे फलक आवश्यक आहेत. पावसाळ्यात आणि कडक उन्हात प्रवाशांना बसचा वापर करणे आणि वाट पाहणे अवघड जाते. बसशेड बांधण्यासाठी पीएमपीएमएलकडे काही लाख रुपये नाहीत का? बसप्रवासी मेट्रोपेक्षा कितीतरी जास्त आहेत. याशिवाय, बालेवाडी हे सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांतर्गत येते. तरीही बालेवाडी, बाणेर भागात शेडसह बसस्थानक मिळावे यासाठी आमची धडपड सुरू आहे.”

पीएमपीएमएलची प्रतिक्रिया
पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय कोलते म्हणाले, आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना पुण्यातील सर्व बस थांब्यांची पाहणी आणि दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आम्ही शहरातील जवळपास २०० नवीन बस थांब्यांसाठी निविदा जारी केल्या आहेत. शहरात जिथे योग्य बस थांबे नाहीत, अशा सर्व क्षेत्रांचा समावेश करण्याचा आमचा मानस आहे. या गोष्टीचा सक्रियपणे पाठपुरावा सुरु आहे.

Share this story

Latest