संग्रहित छायाचित्र
धानोरी, शिवणे, कोंढवा, कोथरूड, वारजे माळवाडी येथील व्यावसायिक सिंहगड रोडवरील एका लॉजमध्ये एकत्र येऊन तीन पत्ती (तिरट) हा जुगार खेळत होते. सिंहगड रोड पोलिसांनी लॉजवर छापा टाकून जुगार खेळणार्या ६ जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून ७३ हजार २१० रुपयांची रोकड व जुगारीचे साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई ५ जानेवारी रोजी रात्री करण्यात आली.
रवींद्र गुंदिया राठोड (वय ४०, रा. श्रीरंग एंपायर, धानोरी), हनुमंत मानसिंग राठोड (वय ४०, रा. वेस्ट कोस्ट , शिवणे), रामू दासू चव्हाण (वय ४०, रा. शिवनेरीनगर, कोंढवा), आंबु भद्रु राठोड (वय ४०, रा. लक्ष्मीनगर, डहाणूकर कॉलनी, कोथरूड), सत्यम खिमया राठोड (वय ३८, रा. सुसरुत रेसिडेन्सी, नर्हे), मोहन हरी चव्हाण (वय ३६, रा. वारजे माळवाडी) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांना त्या दिवशी अटक करण्यात आली होती. पोलीस अंमलदार विनायक मोहिते यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे, साहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस हवालदार तारू, मगर, पोलीस अंमलदार पाटील, विनायक मोहिते हे ५ जानेवारी रोजी रात्री हद्दीतील रेकॉर्डवरील आरोपी चेक करत संतोष हॉलसमोर आले. तेव्हा त्यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पूना गेट लॉज येथील पाचव्या मजल्यावरील रूममध्ये काही जण जुगार खेळत आहेत. या बातमीनुसार पोलीस रात्री दहा वाजता पूना गेट लॉजवर पोहोचले. त्यांनी पाचव्या मजल्यावरील या खोलीमध्ये छापा टाकला. तेव्हा तेथे सहा जण तीन पत्ती नावाचा तिरट पत्त्यांचा पैसे ठेवून जुगार खेळत होते.
रवींद्र राठोड (२७,९००रुपये), हनुमंत राठोड (१४०० रुपये), रामू चव्हाण (८६०० रुपये), आंबू राठोड (२९,५०० रुपये), सत्यम राठोड (१००० रुपये), मोहन चव्हाण (४८०० रुपये) असे एकूण ७३ हजार २१० रुपये व जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर तपास करीत आहेत.