संग्रहित छायाचित्र
पुणे शहरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. ‘पुणे शहर, स्वच्छ शहर’ अशी ओळख असलेल्या शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना श्वास कोंडला जाऊ लागला असून श्वसनाचे विकार जडले आहेत. याची गंभीर दखल घेत शहरात धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना न करणाऱ्या बांधकाम प्रकल्पांवर पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने थेट कारवाईचा बडगा उगारला. याअंतर्गत शहरातील १५८ बांधकाम प्रकल्पांना नोटिसा बजावल्या असून, त्यातील ९१ बांधकामांचे थेट काम थांबविण्याचे धाडस बांधकाम विभागाने दाखविले आहे.
शहरात बांधकाम प्रकल्पांची कामे वेगाने सुरू आहेत. प्रदूषणामुळे पुण्याची हवा खराब झाली आहे. तसेच रस्त्याने मालवाहतूक करणाऱ्या जड वाहनांमुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाने वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत. केंद्र व राज्य सरकारने नियमावली जाहीर करत धूळ निर्माण होऊ नये, हवेत उडू नये, यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार हवा प्रदूषण रोखण्यासाठी आणि सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यामुळे तसेच महापालिकेच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याने गुरुवारी (दि. १२) एकाच दिवसात ९१ प्रकल्पांची कामे थांबवून कडक कारवाई केली आहे. महापालिकेच्या या कारवाईमुळे बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
बांधकाम व्यावसायिकांनी हे निकष पाळणे बंधनकारक
बांधकामाच्या ठिकाणी धूळ उडणार नाही, यासाठी उपाययोजना करणे
बांधकामाच्या सीमाभिंतीला २५ फूट उंचीचे पत्रे लावणे बंधनकारक
बांधकाम सुरू असलेला भाग हिरव्या कापडाने झाकणे आवश्यक
या कापडावर पाणी मारावे, जेणेकरून धूळ उडणार नाही
राडारोडा आणि बांधकाम साहित्य वाहतूक करणाऱ्या गाड्यांची टायर धुण्याची व्यवस्था करावी
बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्यांना गॉगल, मास्क, हेल्मेटसह अन्य साधने द्यावी
गाड्यांमधून माल उतरवताना परिसरात पाणी मारावे
रस्त्याच्या कडेला काम सुरू असल्यास त्यावर वर्दळीच्या वेळी पाणी मारणे
राडारोडा वाहतूक करताना तो झाकून न्यावा
अशी आहे नोटीस
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांची पूर्तता न करता बांधकाम सुरू ठेवल्यास महापालिका आयुक्तांनी आम्हाला अधिकार दिले आहेत. महाराष्ट्र महापालिका अधिनियमांचे कलम २६७ आणि महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५४ च्या अधिकारानुसार नोटीस मिळाल्यानंतर ताबडतोब बांधकामाचे काम बंद करण्यात यावे. बांधकाम चालू ठेवल्यास आम्हाला प्राप्त असलेल्या अधिकारान्वये काम करणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांच्या माध्यमातून कारवाई केली जाईल, असे बांधकाम प्रकल्पांना पाठवण्यात आलेल्या या नोटीसमध्ये नमूद केले आहे.
धूळ उडते त्याचे काय?
शहरासह उपनगर भागात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. हवा प्रदूषण केवळ बांधकाम साईटवरच नव्हे तर बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याच्या वाहतुकीमुळेदेखील होते. जड वाहनांतून खडी, सिमेंट, वाळू तसेच आदी साहित्यांची वाहतूक केली जाते. या वाहनांच्या वर्दळीमुळे रस्ते उखडले आहेत. त्यामुळे या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण होत आहे. त्याकडेदेखील महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे.
झोन पाचची थंड कारवाई
बांधकाम विभागाचे झोन एक ते झोन सहा असे विभाग आहेत. सर्व विभागांना नियमांचे पालन न करणाऱ्या प्रकल्पांना थेट काम थांबविण्याची नोटीस देण्याचे आदेश दिले होते. पण झोन पाचकडून ६७ बांधकाम प्रकल्पांना नोटीस बजावण्यात आली, मात्र त्यांचे काम न थांबविता उपाययोजना करण्यासाठी ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे झोन पाचच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत
सर्वाधिक नोटिसा लोहगाव, हडपसर, केशवनगर, उंड्री, पिसोळीतील बांधकामांना
बांधकामामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिकांना फुफ्फुस, रक्तवाहिन्या, डोळ्यांसंबंधित आजार होत आहेत. हिवाळ्यामध्ये तर याचा त्रास प्रचंड वाढतो. त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी बांधकाम व्यावसायिक, वास्तुविशारदांनी सुचविलेल्या उपाययोजना कराव्या, असे आदेश दिले होते. त्यासाठीचे ई-मेल संबंधितांना करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमावलीचे पालन करण्यास सांगितले होते, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. बांधकाम विभागातील अभियंत्यांनी झोन एक ते झोन सहामध्ये सर्वेक्षण करून ज्या ठिकाणी धूळ रोखण्यासाठी उपाययोजना केल्या नाही, अशा बांधकाम प्रकल्पांना नोटिसा बजावल्या. यामध्ये काम थांबविण्याच्या सर्वाधिक नोटिसा या झोन सहामधील लोहगाव, हडपसर, केशवनगर, उंड्री, पिसोळी या भागातील बांधकामांना देण्यात आलेल्या आहेत.
पुणे शहरातील मध्यवर्ती पेठा, कोरेगाव पार्क, बाणेर बालेवाडी या भागात जास्त प्रदूषण होत आहे. शहरात सुमारे ८ ते १० हजार बांधकाम प्रकल्पांचे काम जोरात सुरू आहे. महापालिकेकडून परवानगी घेताना सुरक्षिततेची काळजी घेण्यासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने निर्देश आणि मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात येणार असल्याचे बांधकाम व्यावसायिक मान्य करतात. मात्र, प्रत्यक्षात याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
झोननुसार दिलेली नोटीस
झोन एक - ३६
झोन दोन - १५
झोन तीन - ४
झोन चार - १६
झोन पाच - ६७
झोन सहा - २०
शहरातील बांधकाम प्रकल्पांनी कामे करताना प्रदूषण मंडळाच्या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक आहे. बांधकाम प्रकल्पांमुळे परिसरातील नागरिकांना धुळीचा त्रास होत आहे. त्यामुळे नियमांचे पालन करण्याची सूचना करण्यात आली होती. परंतु तरीही नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शहरातील ९१ बांधकाम प्रकल्पांना काम थांबविण्याचे आदेश दिले आहेत. नियमांचे पालन न केल्यास महापालिकेच्या झोननुसार बांधकाम प्रकल्पांवर कारवाईचे सत्र सुरूच राहणार आहे. - प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, पुणे महापालिका
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.