Pune Ganeshotsav 2024: मंडळांचे भाविकांशी जुळले अनोखे नाते

पुण्याचा सांस्कृतिक वारसा आणि अध्यात्मिक भाविकतेचे प्रतिबिंब घडवणारा वैभवशाली गणेशोत्सव म्हणजे सळसळत्या उत्साहाचे, चैतन्याचे मूर्तीमंत प्रतीक म्हणता येईल.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Fri, 13 Sep 2024
  • 05:49 pm

संग्रहित छायाचित्र

कल्पकतेच्या माध्यमातून मंडळे घडवतात सामाजिक एकता, संस्कृती, जाणीवेचे दर्शन; देतात समाजात जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचा स्पष्ट संदेश

मधुप्रिया धनवटे

पुण्याचा सांस्कृतिक वारसा आणि अध्यात्मिक भाविकतेचे प्रतिबिंब घडवणारा वैभवशाली गणेशोत्सव म्हणजे सळसळत्या उत्साहाचे, चैतन्याचे मूर्तीमंत प्रतीक म्हणता येईल. भाविकांचा जागोजागी जाणवणारा उत्साह आणि ढोल-ताशांच्या आसमंतात निनादणाऱ्या आवाजाच्या संगतीने घरोघरी आणि सार्वजनिक मंडळातील गणरायाचे आगमन होते.

गणरायाच्या दहा दिवसांच्या काळात विविध धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रमांबरोबर शहरातील प्रत्येक रस्त्यांला जाग येते ती उत्सव पाहण्यासाठी आलेल्या भाविकांच्या हजेरीने. या काळात रात्रभर खवय्यांची मोठी मज्जा असते. विविध प्रकारचे खाण्याचे प्रकार उपलब्ध असल्याने काय खायचे याविषयी त्यांचा संभ्रम होतो.  गणेशोत्सवाला असलेल्या धार्मिक महत्त्वाबरोबर उत्सवातून सामाजिक एकता, विविध कला क्षेत्रातील कलाकारांची अभिव्यक्ती आणि सांस्कृतिक ठेव्याचे प्रदर्शन घडते. प्रत्येक वर्षी विविध मंडळे समाजातील ज्वलंत प्रश्नांवर प्रत्यक्ष देखाव्यातून आपली मते मांडत असतात. यावर्षीही मंडळांनी पर्यावरण रक्षण, सामाजिक एकतेसह विविध मंडळांनी सामाजिक संदेश देणारे देखावे उभे केले आहेत.       

वैद्यकीय विघ्नहर्ता गणेश
यावर्षी ४६ व्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या संयुक्त प्रसाद मित्र मंडळाने वैद्यकीय व्यवसायावर आधारित गणेश मूर्ती उभारली आहे. त्याला त्यांनी वैद्यकीय विघ्नहर्ता असे नाव दिले आहे. यावेळी त्यांनी उभारलेली गणेश मूर्ती ईसीजी मशीन, सिरींज, सलाईन, ऑक्सिजन सिलिंडर आदी वैद्यकीय उपकरणांचा वापर करताना दिते. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या ध्येयनिष्ठेला त्यांनी या उपक्रमातून मानवंदना दिली आहे. लोकमान्य टिळकांच्या विचाराचा वारसा चालवणारे हे मंडळ समाजसेवा आणि पर्यावरणपूरक उपक्रमासाठी प्रसिद्ध  आहे. आतापर्यंत त्यांनी ५०० हून अधिक प्रकल्प पूर्ण केले आहेत. तसेच अनेक पुरस्कार मिळवले आहेत.    

चाळीतला दहिहंडी उत्सव 
पुण्यातील जुन्या दहिहंडी उत्सवाच्या आठवणींना उजाळा देताना यावर्षी मंडळाने जुन्या काळातील दहिहंडी उत्सवाचे आयोजन केले. प्रत्येकाला यात सहभागी करून घेताना त्यांच्याकडून रंगीत कागद, पुठ्ठे आदी साहित्य जमा करून जुन्या चाळीतील सणाचे  वातावरण उभारले. त्यांच्याकडे मर्यादित जागा असली तरी त्यांनी आपल्या देखाव्यातून समाजाची एकता, सहकार्याची ताकदीच्या प्रेरणेचे दर्शन घडवले आहे.

पर्यावरणपूरक देखावा
भाऊसाहेब पडवळ यांच्या नेतृत्वाखालील सुवर्ण ॲग्रो फार्मने सेंद्रिय शेती आणि त्याविषयीच्या पारंपारिक चालीरितीचे देखाव्यातून दर्शन घडवले आहे. देखाव्यामध्ये गाईचे शेण, दूध, सेंद्रिय खत, मातीच्या भांड्याचा वापर केला आहे. यातून त्यांनी समाजाला शाश्वत शेतीचे काय फायदे आहेत ते नागरिकांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला आहे.   

बदलते पुणे
आपल्या मंडळाचे ८६ वे वर्ष साजरे करणाऱ्या प्रकाश मित्र मंडळाने यावेळी बदलते पुणे या संकल्पनेवर देखावा तयार केला आहे. या देखाव्यात एकता आणि मुल्यांना सांभाळणाऱ्या जुन्या वाडा, चाळीच्या संस्कृतीचे जसे दर्शन घडते तसेच आजच्या फ्लॅट संस्कृतीचे दर्शन घडते. आजकालच्या मुलांवर विघातक संस्कार घडू नयेत, त्यांना योग्य दिशा मिळावी, यासाठी जबाबदारी आणि आपल्या जाणिवेचा संदेश घराघरातील पालकांपर्यंत पोहचावा या उद्देशाने हा देखावा उभारला आहे. बदलत्या कुटुंब संस्कृतीने समाजाचा चेहरा कसा बदलला आहे हे दाखवण्याचा त्यांचा उद्देश आहे.

वर्दीतील माणूस; पोलिसांना मानवंदना
गेल्या काही दिवसांत पुण्यात घडलेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची प्रतिमा खालावली असून कायदा-सुव्यवस्था राखण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे अधोरेखित करणाऱ्या संकल्पनेवर आनंद तरुण मंडळाचा देखावा आधारित आहे. तरुणांमधील  अमली पदार्थाच्या व्यसनाचे वाढते प्रमाण आणि जागोजागी दिसणाऱ्या कोयता गँगला आवर घालण्यासाठी समाजानेही काही पावले उचलली पाहिजे असा संदेश त्यांनी दिला आहे. आपली मुले कशामध्ये गुंतली आहेत त्याकडे पालकांनी बारकाईने लक्ष देण्याची गरज असून त्याच्या बरोबरीने पोलिसांचा आत्मविश्वास कसा वाढेल त्यादृष्टीने आपले वागणे ठेवण्याची गरज हा देखावा व्यक्त करतो. तसेच सुरक्षित पर्यावरणावरही त्यांनी भर दिला आहे.  आपल्या देखाव्यांच्या माध्यमांतून गणेश मंडळे केवळ उत्सव साजरा करत नसून सामाजिक जाणीव, एकता, समाजाचे उत्तरदायित्वाला प्रोत्साहन देण्याचेही काम करत असतात. यामुळेच गणेशोत्सव मंडळांचा पुण्याच्या सांस्कृतिक मंचावर मोठा परिणाम झालेला आढळतो.

पोर्शे कार अपघात
साधारण तीन -चार महिन्यांपूर्वी शहरात झालेल्या हाय प्रोफाईल पोर्शे कार अपघातामुळे पुण्याकडे साऱ्या देशाचे लक्ष वेधले गेले. या अपघाताबरोबर घडलेल्या नाट्यमय घटनांमुळे पाठोपाठ नव नवे वाद  निर्माण झाले. त्यामध्ये विविध सरकारी विभाग, न्यायव्यवस्था, रुग्णालयातील घटनांचा समावेश होता. पोर्शे अपघात आणि त्या पाठोपाठच्या घटनांमुळे पुणे देशाचे केंद्रबिंदू बनले. पोर्शे कार अपघाताचा देखावा तयार करणारे पुणे निवासी निलेश तुसे याबाबत म्हणाले की, समाजात घडलेल्या घटनांवर आधारित देखावे तयार करताना समाजापर्यंत एक विशिष्ट संदेश पोहचावा हा आमचा उद्देश असतो. कोणतेही वाहन चालवताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे, याबाबतची जाणीव समाजात तयार व्हावी याकडे लक्ष दिले आहे. त्याशिवाय जगप्रसिद्ध दगडूशेठ  गणपती मंडळाने तयार केलेल्या हिमाचल प्रदेशातील जातोली शिव मंदिराच्या देखाव्याची प्रतिकृती तयार करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.

सामाजिक दायित्व
थोडक्यात पुण्यातील गणेशोत्सवाचे मूळ केवळ धार्मिक कल्पनांशी जोडलेले नाही. या उत्सवामुळे विविध जाती-जमातीचे, धर्माचे, समाजातील विविध घटक एकत्र येतात. त्यासाठी मंडळे आपली कल्पकता वापरतात आणि त्यातून समाजापर्यंत संदेश पोहचवतात. यावर्षी शहरातील मंडळांनी एक वेगळा दृष्टीकोन स्वीकारला आहे. देखाव्यांच्या माध्यमातून सार्वजनिक सुरक्षा, पर्यावरण संवर्धन, सामाजिक एकता यावर लक्ष केंद्रीत करणारे देखावे सादर केले आहेत. आपल्या प्रयत्नातून मंडळे केवळ पुण्याच्या सांस्कृतिक ठेव्याचे जतन करत नाहीत तर नागरिकांमध्ये सामाजिक जबाबदारी कशी वाढेल, त्याविषयी समाजात जागृती कशी होईल याकडे लक्ष देतात. पुण्यातील गणेशोत्सवाची भाविकता, उत्साह टोकाला पोहचत असताना आपल्या देखाव्याच्या माध्यमातून मंडळे समाजाच्या एकीची ताकद किती प्रभावी आहे आणि सामाजिक जाणिवेचा आपल्या भविष्यावर कसा परिणाम होतो याचे स्मरण समाजाला करून देत असतात.

Share this story

Latest