जागतिक पर्यावरणदिनीच वनखात्याकडून वृक्षाची हत्या
सर्वत्र ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ (World Environment Day) म्हणून साजरा केला जातो. केंद्र सरकारचे पर्यावरण आणि वनमंत्रालय, राज्य सरकारचा वन विभाग, पुणे महापालिकेचा (PMC) उद्यान विभाग मोठा गाजावाजा करून या दिवसाचं औचित्य साधून वृक्षारोपण करतात. मात्र, बुधवारी (दि. ५) पर्यावरण दिनानिमित्त वन विभागाच्या हद्दीतील ३० ते ४० वर्षांच्या वृक्षावर कुऱ्हाड चालवण्याचं काम केलं गेलं आहे. याबाबत रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
भांबुर्डा, गोखलेनगर (Gokhalenagar) येथील मेंढी फार्मजवळील सर्व्हे क्रमांक ९८ आणि ९९ च्या शेजारी वन विभागाची जागा आहे. या ठिकाणी अनेक देशी वृक्ष आहेत. येथेच एका बांधकाम व्यवसायिकाच्या गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. यात एका झाडाची अडचण संबंधित बड्या बांधकाम व्यवसायिकाला होत होती. त्यामुळे चक्क वनखात्यानेच हे झाड तोडल्याचे पाहताक्षणी लक्षात येते.
वन क्षेत्रात अथवा वन विभागाच्या जागेवरील एखादं झाडसुद्धा कापणे कायदेशीर गुन्हा ठरतो. वन विभागाच्या जमिनीलगत असणाऱ्या शेतकऱ्यांना वन विभागाचा कायदा कठोर पाळावा लागतो. परंतु पुणे शहरातील वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्याच हद्दीतील वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे. येथील ओढ्याची दिशा बदलण्याचा प्रकार एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाकडून होत आहे. तरीसुद्धा महापालिकेचा बांधकाम विभाग डोळेझाक करताना दिसत आहे. यांच्यावर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न रहिवाशांनी महापालिकेला विचारला आहे.
ही दुर्दैवी घटनेची तक्रार उपवन संरक्षक अधिकाऱ्यांना दिली असून संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते समीर निकम आणि सुधीर धोत्रे यांनी ‘सीविक मिरर’सोबत बोलताना केली.
पर्यावरणा दिनानिमित्त नागरिक वृक्षारोपणाचे उपक्रम राबवित आहेत. मात्र, दुसरीकडे सरकारी यंत्रणाच वृक्षतोड करतानादिसत आहे. ही गंभीर बाब असून संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी. यासोबतच नाले वळविले जात आहेत. याकडे महापालिकेने गांभिर्यानेलक्ष द्यावे. अन्यथा पावसाळ्यात गोखलेनगर परिसरातील घरांमध्ये पुराचे पाणी जाण्याची शक्यता आहे.
- समीर निकम, सामाजिक कार्यकर्ते
वन विभागातील वृक्षतोड ही गंभीर बाब आहे. याची माहिती अद्याप मिळाली नाही. संबंधित माहिती परिक्षेत्र वन अधिकारी (आरएफओ) प्रदीप सकपाळ यांच्याकडून ती मिळू शकेल.
- महादेव मोहिते, उपवन संरक्षक, पुणे विभाग