संग्रहित छायाचित्र
पुणे: वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये दोषी आढळल्यामुळे राज्यातील कारागृहांत शिक्षा भोगत असलेल्या कुशल, अर्धकुशल आणि अकुशल कैद्यांना किमान वेतनाप्रमाणे त्यांच्या कामाचा मोबदला देण्यात यावा, अशी मागणी कारागृह प्रशासनाने राज्य सरकारकडे केली आहे.
राज्याच्या विविध कारागृहातील कारखान्यांमध्ये ‘सुधारणा आणि पुनर्वसन’ कार्यक्रमांतर्गत कैद्यांना विविध उद्योगात गुंतवून ठेवले जाते. यामध्ये हातमाग, यंत्रमाग, सुतारकाम, चर्मकला, लोहारकाम आदींचा समावेश आहे. कारागृहातील रोजगारांशी सुसंगत किमान वेतनदरासाठी कुशल, अर्धकुशल व अकुशल अशी सरासरी निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार कुशल कैद्यांसाठी प्रतिदिन ३२२ रुपये, अर्धकुशल कैद्यांसाठी प्रतिदिन ३०२ रुपये आणि अकुशल कैद्यांसाठी प्रतिदिन २८८ रुपये वेतनवाढ करण्याची मागणी कारागृह प्रशासनाने केली आहे.
कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या बंद्यांमध्ये सुधारणा व्हावी, त्यांचे पुनर्वसन व्हावे यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. कारागृहात विविध उद्योग आहेत. शिक्षा भोगून बाहेर पडणाऱ्या बंद्यांचे पुनर्वसन करण्यासाठी विविध रोजगार विषयक प्रशिक्षण दिले जाते. विविध उद्योगात काम करणाऱ्या कैद्यांना वेतन दिले जाते. सध्या कुशल बंद्यांना ६७ रुपये, अर्धकुशल ६१ तर अकुशल बंद्यांना ४८ रुपये प्रतिदिन वेतन दिले जाते. यात चार ते साडेपाचपट वाढ करण्यात यावी, असा प्रस्ताव कारागृह प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठवला आहे.
राज्यातील ६० पैकी नऊ मध्यवर्ती कारागृहांत उद्योग
राज्यातील ६० कारागृहांपैकी नऊ मध्यवर्ती कारागृहे, नऊ खुली कारागृहे, एक महिला कारागृहात कैद्यांनी विविध उद्योगात गुंतवून ठेवले आहेत. यामध्ये येरवडा, नाशिक, नागपूर कारागृहाच्या कारखान्यात हातमाग, यंत्रमाग, सुतारकाम, चर्मकला, लोहारकाम, बेकरी, रसायन उद्योग सुरू आहेत. या माध्यमातून एक ते दीड दशकापूर्वी कैदी कोटीच्या कोटी रुपयांचे उत्पन्न घेत होते. त्यावेळी कारखान्यात काम करणाऱ्या सिद्धदोष पुरुष कैद्यांची संख्या सत्तर टक्के होती. आता मात्र हीच संख्या तीन ते चाळीस टक्क्यांपर्यंत आली आहे.
खुल्या कारागृहातील कैद्यांना वेतनवाढीचा प्रस्ताव नाही...
राज्यात नऊ खुली कारागृहे आहेत. या कारागृहात शेकडो कैदी शेती कामासह कँटिन चालवितात. काहीजण वॉशिंग मशिन, तर काहीजण सलून आणि इस्त्री विभागामध्ये काम करतात. काहीजण सुंदर अशी पैठणी साडी सुद्धा हातमागावर तयार करतात. त्यांनादेखील कमी वेतन मिळते. असे असूनही त्यांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव कारागृह प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठवलेला नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कैद्यांना काय फायदा होणार?
कारागृहातील कारखान्यात काम करणाऱ्या अकुशल ( रुपये ३२२), अर्धकुशल ( रुपये ३०२) आणि कुशल ( रुपये २८८ ) कैद्यांच्या वेतनात वाढ करून ते प्रतिदिन अनुक्रमे ३२२, ३०२ आणि २८८ रुपये केल्यास या पैशाचा वापर करून ते दैनंदिन गरजेच्या वस्तू कारागृहातील उपाहारगृहातून खरेदी करू शकतील. दैनंदिन वेतनापोटी मिळणारी रक्कम टपाल खात्याच्या सुविधेतून कुटुंबीयांना पाठविली जाऊ शकते. तर काही कैदी दैनंदिन वेतनातून वकिलांचे शुल्क भरू शकतील. त्यामुळे बंद्यांची सुधारणा आणि पुनर्वसन हा उद्देश सफल होऊ शकतो.
कारखान्यातील लाकडी फर्निचर, सतरंजीला मोठी मागणी
कारखान्यातील लाकडी फर्निचर, देव्हारे, किचन, सतरंजी, टॉवेल, बेडशीट आदी वस्तूंना मोठी मागणी आहे. अनेक लाकडी टेबल, खुर्च्च्या, छपाई, पुस्तक बांधणी आदीला सरकारी कार्यालयांमध्ये पुरवठा केला जातो. त्यामुळे वर्षभर कैद्यांना काम मिळत असते.
कारागृहातील रोजगारांशी सुसंगत किमान वेतनवाढीसाठी कुशल, अर्धकुशल आणि अकुशल अशी सरासरी निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार कुशल कैद्यांसाठी प्रतिदिन ३२२ रुपये, अर्धकुशल बंदिवानांसाठी प्रतिदिन ३०२ तर अकुश बंदिसानांसाठी प्रतिदिन २८८ रुपये अशी वेतनवाढ करण्याची शिफारस करून तत्कालीन अपर पोलीस महासंचालक आणि कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे.
- डॉ. जालिंदर सुपेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक, कारागृह आणि सुधार सेवा