घरामधे लागलेल्या आगीमधे अडकलेल्या महिलेची दलाकडून सुखरुप सुटका
पुणे : धनकवडी, श्रीधर नगर, हिल पॉईंट (Pune Fire) सोसायटी येथे तीन मजली इमारतीत पहिल्या मजल्यावर आग लागली होती. या घरात अडकलेल्या महिलेची सुटका अग्निशामक दलाच्या (fire brigade) जवानांनी केली. आग लागल्याची वर्दी मिळताच अग्निशमन दलाकडून काञज व जनता अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले होते. ही घटना शनिवारी रात्री पावणेनऊ च्या सुमारास घडली.
घटनास्थळी पोहोचताच दलाच्या जवानांनी पाहिले असता पहिल्या मजल्यावर एका सदनिकेत आग लागून मोठ्या प्रमाणात धुर निर्माण झाला होता. त्याचवेळी तेथेच एका खोलीत एक महिला धुरामुळे अडकली असल्याने जवानांनी तातडीने बी ए सेट परिधान करत खोलीत प्रवेश करुन सदर महिलेला सुखरुप बाहेर घेतले तर इतर जवानांनी आगीवर पाण्याचा मारा करत सुमारे पंधरा मिनिटात आग पुर्ण विझवली. आग कशामळे लागली याचे नेमके कारण समजू शकले नसून आगीमधे सदनिकेचे मोठे नुकसान झाले असून गृहपयोगी वस्तु जळाल्या आहेत.
या कामगिरीत अग्निशमन अधिकारी सुभाष जाधव तसेच वाहनचालक विशाल बोबडे, ॠषी बिबवे व तांडेल वसंत भिलारे, संजय जाधव आणि जवान किरण पाटील, महेश गारगोटे, अजित लांडगे, निरंजन गायकवाड, संकेत शेलार, विनय निकम यांनी सहभाग घेतला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.