घरात कोंडून घेऊन गॅस सिलेंडरचे बटन सुरू ठेवणार्या व्यक्तीची अग्निशमन दलाकडून सुटका
पुणे: मानसिक संतुलन बिघडल्याने स्वत: ला घरात कोंडून घेऊन स्वयंपाक घरातील गॅस सिलेंडर सुरू ठेवलेल्या व्यक्तीची अग्निशमन दलाने सुटका केली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (०८ ऑक्टोबर) दुपारी ११.४२ वाजता महर्षीनगर, तांबोळी हाऊस या इमारतीत रहिवाशी असलेल्या एका इसमाने स्वतला घरात कोंडून घेत गॅस सिलेंडर सुरु ठेवला असून धोका निर्माण झाला असल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल मुख्यालय व गंगाधाम अग्निशमन केंद्र येथून एकूण दोन अग्निशमन वाहने घटनास्थळी रवाना करण्यात आली होती.
घटनास्थळी पोहोचताच जवानांनी माहिती घेतली. जवानांना समजले की, तळमजला अधिक दोन मजली असलेल्या एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावरील रहिवाशी असलेल्या घरामध्ये एका व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडल्याने त्याने स्वयंपाक घरातील गॅस सिलेंडर सुरु ठेवत शेगडीचे बटण सुरू करून ठेवले आहे. तसेच ती व्यक्ति घरातील वस्तु गच्चीतून बाहेर फेकत आहे. जवानांनी तातडीने घटनेचे गांभीर्य लक्षात घेत खाली सुरक्षेच्या दृष्टीने सेफ्टी नेट धरुन ठेवली. तर काही जवानांनी वर गच्चीवर जाऊन पयत्न सुरु केले. त्याचवेळी काही जवानांनी स्प्रेडर व घन या उपकरणांचा वापर करुन दरवाजा तोडत आत प्रवेश केला. यावर त्या व्यक्तीने जवानांना आत येण्यास मज्जाव केला. तरीदेखील जवानांनी प्रथम शेगडीचे बटण बंद करत गॅस सिलेंडर बाहेर घेत मोठा धोका दूर केला. त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकण्याच्या स्थितीत नसल्याचे जाणवताच पोलिसांची मदत घेत रश्शीच्या साह्याने त्याला सुखरुप बाहेर काढले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. जवानांनी मोठा अनर्थ टाळून सुमारे तासाभरात संपुर्ण कामगिरी पार पाडली.
या कामगिरीत अग्निशमन अधिकारी सुभाष जाधव, प्रदिप खेडेकर, सुनिल नाईकनवरे, प्रशांत गायकर व वाहनचालक हनुमंत कोळी,निलेश कदम तसेच तांडेल राहुल नलावडे आणि जवान विनायक माळी, केतन नरके, अतुल खोपडे, सवाईलाल चव्हाण, सुरेश सूर्यवंशी, धीरज जाधव, हेमंत शिंदे, हर्षद सोनवणे, महेश घटमाळ, साईनाथ पवार, अनिकेत खेडेकर यांनी सहभाग घेतला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.