फुकट्या प्रवाशांकडून दंड वसूली
पुणे रेल्वे विभागात मे २०२३ मध्ये तिकीट तपासणीदरम्यान २६ हजार १८८ लोकं विना तिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून २ कोटी २७ लाख ४० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच ७८२५ जणांना अनियमित प्रवासासाठी ४८ लाख ५८ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच सामान बुक न करता तसेच घेऊन जाणाऱ्या १३९ जणांकडून १४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक इन्दू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या समन्वयाने आणि विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांचे नेतृत्वात तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने करण्यात आली आहे.
रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रकारे तिकीट तपासणी मोहीम सातत्याने सुरू आहे. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल आणि न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो.