संग्रहित छायाचित्र
पुणे: नॉन प्रॅक्टिस अलाऊन्स ( एनपीए) घेऊन खासगी सेवा करणाऱ्या पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील सहा डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याबाबतचे वृत्त ‘सीविक मिरर’ ने प्रकाशित करून त्याचा पाठपुरावा केल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाला कारवाई करावी लागली.
पालिकेच्या आरोग्य सेवेत काम करणारे अनेक डॉक्टर नॉन प्रॅक्टिस अलाऊन्स ( एनपीए) घेतात. हे डॉक्टर पगाराच्या ३५ टक्के अतिरिक्त रक्कम नॉन प्रॅक्टिस अलाऊन्स म्हणून घेतात. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात किंवा स्वत:चे रुग्णालय थाटून प्रॅक्टिस करता येत नाही. काही डॉक्टर कोंढवा, चंदननगर, चाकण, किवळे येथे खासगी प्रॅक्टिस करीत आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभाग एनपीए घेऊन डॉक्टर खासगी प्रॅक्टिस करत नाहीत असा दावा करतात. मात्र, अनेक डॅाक्टरांनी समाज माध्यमांवर, गुगल मॅपवर आपल्या क्लिनिकचे लोकेशन टाकले आहे. त्यामुळे आरोग्य विभाग दर तीन महिन्याला डॅाक्टरांकडून लिहून घेत असलेला करारनामा केवळ दिखावा असल्याचे दिसून येते.
महापालिकेच्या आरोग्य विभागात स्त्रीरोग, बालरोग, भूलतज्ज्ञांसह सर्जन, प्लॅस्टिक सर्जरी करणारे वर्ग १ मधील तज्ज्ञ वीस ते पंचवीस डॅाक्टर तर वर्ग -२ मधील दीडशे डॉक्टर सेवेत आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांना दरमहा दीड लाखांपेक्षा अधिक पगार आहे. यामध्ये त्यांच्या पगाराच्या ३५ टक्के अतिरिक्त रक्कम नॉन प्रॅक्टिस अलाऊन्स ( एनपीए) म्हणून दिले जाते. मात्र, अनेक डॉक्टर शहरातील मोठ्या रुग्णालयात वैद्यकीय सेवा बजावत आहेत. काही डॉक्टरांनी आपली स्वत:ची रुग्णालये थाटली आहेत. त्यांची प्रसिध्दीसुद्धा त्यांनी समाजमाध्यमांवर केली आहे.
महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात डॅाक्टरांची कामाची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्यंत असते. अनेक डॅाक्टर दुपारी तीननंतरच काम संपवून आपल्या रुग्णालयात किंवा मोठ्या रुग्णालयात सेवा बजावण्यासाठी पळ काढतात. त्यामुळे अनेक डॉक्टर महापालिकेतील रुग्णालय, दवाखान्यात कमी आणि स्वत:च्या खासगी रुग्णालयात अधिक वेळ असतात. त्यामुळे गरीब व गरजू रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळत नाही. पुणे महापालिकेची ५० दवाखाने, वीस प्रसूतिगृहे आहेत. कमला नेहरू, राजीव गांधीसारखी मोठी रुग्णालये आहेत. महापालिकेच्या कमला नेहरू व राजीव गांधी रुग्णालयात शस्त्रक्रिया विभाग आहेत. या ठिकाणी कुटुंब नियोजनापासून इतर लहान-मोठ्या शस्त्रक्रिया केल्या जातात. उपनगरांमधील महापालिकेचे ५० दवाखाने व २० प्रसूतिगृहे आहेत. या ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग, बालकांचे लसीकरण केले जाते. काही ठिकाणी क्षयरोग, दंतचिकित्सा, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे उपक्रम राबविले जातात. या ठिकाणी कार्यरत असलेले डॉक्टर काही तासात काम संपवून आपल्या रुग्णालयात हजर होतात. अनेक डॉक्टरांनी व्हिजिटिंग कार्ड, गुगल मॅपवर आपल्या क्लिनिकचे लोकेशन टाकले आहे.
कारवाईची उत्सुकता
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने ३० जून २०२४ मध्ये डॅाक्टरांकडून खासगी व्यवसाय करीत नसल्याचे शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र लिहून घेतले आहे. यामध्ये विशेषतज्ज्ञ, परिमंडळ व क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, दंतवैद्य यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले आहे. असे असले तरीही काही डॅाक्टर खासगी प्रॅक्टिस करीत असल्याचे दिसून आले आहे. आता यांच्यावर काय कारवाई होणार याची उत्सुकता महापालिकेतील डॅाक्टरांनाच लागली आहे.
"पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील डॉक्टरांकडून दर तीन महिन्याला नॉन प्रॅक्टिस अलाऊंस (एनपीए) संदर्भात बंधपत्र (बॉंड) भरून घेतो. मात्र, काही डॅाक्टर बाहेर खासगी प्रॅक्टिस करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे."
- डॉ. कल्पना बळिवंत, आरोग्य प्रमुख, पुणे महानगरपालिका