संग्रहित छायाचित्र
मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अखेर रविवारी (दि. १५) देंवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या मंत्रिमंडळात पुण्याला लॉटरी लागली असून तीन जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर पुणे शहरातून चंद्रकांत पाटील आणि माधुरी मिसाळ या दोघांची तर जिल्ह्यातून दत्ता भरणे अशी एकूण चौघांची पुणे जिल्ह्यातून मंत्रिपदी वर्णी लागली आहे. माधुरी मिसाळ यांच्या रूपात प्रथमच पुण्यातील महिलेला मंत्रिपद मिळाले आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाराजीनाट्य रंगले होते. यामुळे तब्बल १३ दिवसांनी मोठ्या दिमाखात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथ विधी पार पडला. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यास वेळ लागत होता. या शपथविधीनंतर १० दिवसांनी नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला.
तसे पाहता पुणे जिल्ह्याला सहा मंत्रिपदे अपेक्षित होती. त्यात पुणे शहरात दोन, पिंपरी चिंचवडमधून एक आणि जिल्ह्यात तिघांना मंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती. परंतु केवळ चारच मंत्रिपदे मिळाली. तब्बल २० वर्षांनंतरही पिंपरी चिंचवड शहराला मंत्रिपद मिळालेले नाही. सोमवारपासून (दि. १६) नागपूर हिवाळी अधिवेशनास सुरुवात होणार आहे.
जिल्ह्यातील २१ आमदारांपैकी फक्त वडगाव शेरीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे बापूसाहेब पठारे आणि खेड-आळंदीतील शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे बाबाजी काळे वगळता सर्व आमदार सत्ताधारी महायुतीचे आहेत. जुन्नर विधानसभेतून शरद सोनवणे अपक्ष म्हणून निवडून आले. पण त्यांनी लगेचच शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे सत्ताधारी महायुतीचे २१ पैकी १८ आमदार जिल्ह्यात आहेत. त्यातील किमान सहा जणांना मंत्रिपदे मिळतील, अशी अपेक्षा होती.
कोथरूडचे आमदार चंद्रकात पाटील पक्षात ज्येष्ठ आहेत. त्यांचे मंत्रिपद फिक्स मानले जात होते. अपेक्षेप्रमाणे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गळ्यात दुसऱ्यांदा मंत्रिपदाची माळ पडली. त्यांच्यासह पुण्यातील पर्वती मतदारसंघातून माधुरी मिसाळ सलग चौथ्यांदा आमदार झाल्या. त्यांनी मागच्या सरकारच्याच काळात मंत्रिपदासाठी लॅाबिंग केले होते. परंतु त्यांना मंत्रिपद मिळाले नव्हते. यंदाच्या विधानसभेत त्यांनी चौथ्यांदा आमदारकीवर शिक्कामोर्तब केले. ज्येष्ठतेमध्ये मिसाळ यांचे नाव आघाडीवर होते.
दौंडमधील भाजपचे राहुल कूल यांचेदेखील नाव आघाडीवर होते. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवडमधून महेश लांडगे आणि अण्णा बनसोडे दोघेजण इच्छुक होते. कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे यांनाही सामाजिक समतोल साधण्यासाठी म्हणून मंत्री करतील, अशी चर्चा होती. परंतु अंतिम यादीत त्यांचे नाव आले नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या आमदारांमध्ये स्वत: अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. सत्तावाटपात आमदारांच्या संख्येच्या तुलनेत मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला आहे. त्यामुळे अजित पवार गटाला सर्वात कमी मंत्रिपदे मिळणार आहेत. यात त्यांच्या पक्षाचे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांची वर्णी लागली आहे. तीच परिस्थिती शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाची आहे. त्यांचे दोन आमदार (एक अपक्ष) जिल्ह्यात आहेत. त्यातील पुरंदरचे विजय शिवतारे माजी राज्यमंत्री आहेत. त्यांना आता कॅबिनेट मंत्रिपदाची अपेक्षा होती. जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी त्यांना मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता होती. परंतु तिन्ही पक्षांच्या अंतिम यादीत त्यांचा समावेश झालेला नाही.
माधुरी मिसाळ यांची वाटचाल
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीआधी मिसाळ यांना पर्वतीतून तिकिट देण्यास भाजपमधून विरोध करण्यात आला होता. पण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला. तो सार्थ ठरवत त्यांनी विजय मिळवला. माधुरी मिसाळ यांना यावेळी कष्टाचे फळ मिळाले. त्यांना मंत्रिपदासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा फोन आला. यानंतर त्यांनी नागपूरमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली.
माधुरी मिसाळ २० वर्षांपासून यांनी पुण्यात भाजप वाढवण्यासाठी काम केले. नगरसेविका ते आमदार आणि आता मंत्री अशी त्यांची वाटचाल आहे. उच्चशिक्षित असणाऱ्या माधुरी मिसाळ यांच्याकडून पुणेकरांना खूप अपेक्षा आहेत. पुण्याच्या सामाजिक-राजकीय आणि पायाभूत सुविधांमध्ये परिवर्तन करण्यासाठी मिसाळ यांचं मोलाचं योगदान आहे. त्या कसब्यातून २००७ मध्ये पहिल्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. २००९ मध्ये त्यांना पर्वतीतून आमदारकीचे तिकीट मिळाले. तेव्हापासून त्या पर्वती मतदारसंघाच्या आमदार म्हणून काम करत आहेत. २००९ ते २०२४ अशी सलग चार वर्षे त्यांनी पर्वती मतदारसंघातून यश मिळवले आहे.
चंद्रकांत पाटील यांचा राजकीय प्रवास
जुलै २०१६ ते ऑक्टोबर २०१९ विधान परिषद सभागृह नेता म्हणून जबाबदारी. २००८ साली पुणे पदवीधर मतदारसंघातून विधान परिषद सदस्य म्हणून निवड, २०१४ साली पुणे पदवीधर मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवड. २०१९ आणि २०२४ साली कोथरूड, पुणे विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवड. ऑगस्ट २०२२ पासून संसदीय कार्यमंत्री म्हणून प्रभावी कार्य.
भारतीय जनता पार्टी, प्रदेशाध्यक्ष १६ जुलै २०१९ ते १२ ऑगस्ट २०२२ पर्यंत
-प्रदेशाध्यक्षपदाच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा-शिवसेना युतीने विधानसभा निवडणुकीत १६१ जागा जिंकून पूर्ण बहुमत मिळविले. प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळात प्रभावी कार्य
-एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्रिपदाची जबाबदारी
-ऑगस्ट २०२२ ते ऑक्टोबर २०२३ पुणे जिल्हा पालकमंत्री; ४ ऑक्टोबर २०२३ पासून सोलापूर आणि अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी
-उच्च व तंत्रशिक्षणमंत्री म्हणून घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय
-मुलींना मोफत व्यावसायिक उच्च शिक्षण देण्याचा निर्णय.
-नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी.
-वस्त्रोद्योगमंत्री म्हणून घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय
-राज्यात वस्त्रोद्योग धोरण लागू करण्यासाठी योगदान.
राज्याचे कॅबिनेट मंत्री
-२०१४ ते २०१९ महसूल, सार्वजनिक बांधकाम, सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग, मदत आणि पुनर्वसन, कृषी व फलोत्पादन या खात्यांची जबाबदारी. मराठा आरक्षणासाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी.
मी अनेक वर्ष पुणेकर जनतेची सेवा करीत आहे. पक्ष सांगेल ती जबाबदारी पार पाडली. महापालिका, विधानसभा आणि लोकसभेला अधिकाधिक लोकप्रतिनिधी निवडून यावे, याकरिता प्रयत्न केले. विविध प्रकल्पांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी यथोचित प्रयत्न केले. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्तीला पक्षाने न्याय दिला आणि जनतेची सेवा करण्यासाठी पुन्हा मंत्रिमंडळात स्थान दिले. त्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी यांची आभारी आहे.
- माधुरी मिसाळ, राज्यमंत्री
पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडायची, हा शिरस्ता मी ठरवला आहे. यावेळीही मंत्रिमंडळात जी जबाबदारी येईल, त्याला न्याय देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. कोथरुडमधील जनतेने मला सलग दुसऱ्यांदा निवडून दिल्यामुळेच मला ही संधी मिळू शकली. पुण्याचा विकास वेगाने होत आहे. आता येत्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तो आणखी वेगाने आणि नियोजनबद्ध व्हावा, यायसाठी मी प्रयत्न करणार आहे.
- चंद्रकांत पाटील, कॅबिनेट मंत्री
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.