शाळकरी मुलांनी बांधल्या पोलिस उपायुक्त संदीप सिंह गिल यांना राख्या
रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने पुण्यातील डीईएस मुरलीधर लोहिया पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांशी पुण्याचे पोलिस उपायुक्त संदीप सिंह गिल यांनी संवाद साधला. तुम्ही भावी नागरिक होणार आहात. या वयात खूप खेळावं लागतं, त्यासोबतच चांगलं खावं लागंत, व्यायाम करा आणि अभ्यास करा. सोबतच शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास करून देशाचे चांगले नागरिक बनण्याचा उपायुक्त गिल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सल्ला दिला.
पोलिस उपायुक्त संदीप सिंह गिल म्हणाले, मी पूर्वी शिक्षक होतो. मी खूप मेहनत केली. तुम्ही सुद्धा हेच करा, खूप शिका, मोठे व्हा, देशाचे चांगले नागरिक बना. मुलांना घडवणे ही सोपी गोष्ट नाही, असे सांगून त्यांनी सर्व शिक्षकांचे कौतुक केले. मनमोकळ्या गप्पांमधून चांगल्या गोष्टी आणि चांगली वागणूक कशी असावी हे त्यांनी मुलांना सांगितले. यावेळी दामिनी पथकाने मुलांना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श, अनोळखी व्यक्तींपासून कशी काळजी घ्यावी याचे प्रात्यक्षिक दाखवले.
सामाजिक बांधिलकी जपत डीईएस पूर्व प्राथमिक शाळेने शहर पोलीस उपायुक्त संदीप गिल, दामिनी पथकाच्या प्रमुख अनिता मोरे व त्यांच्या पथकातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला. अवघ्या दोन दिवसांवर रक्षाबंधन येऊन ठेपले आहे. त्यादिवशी पोलीस प्रशासनावरील कामाचा ताण लक्षात घेऊन अनोखी राखीपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस विभागाची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी बर्वे, डेक्कन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष धनंजय कुलकर्णी, शाळा समिती अध्यक्षा राजश्री ठकार आदी उपस्थित होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.