संग्रहित छायाचित्र
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून विविध ८ अध्यासनांवर केलेल्या प्राध्यापकांच्या निवडी वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे आहेत. विद्यापीठातील एका प्राध्यापिकेने २०१९ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर विविध विद्यार्थी संघटनांकडून आंदोलन केल्यावर प्रशासनाकडून लेखी माफीनामा लिहून घेतला होता. याच वादग्रस्त व्यक्तीची संत नामदेव अध्यासन केंद्रावर नियुक्ती करण्यात आली आहे.
नियमानुसार त्या क्षेत्रातील नैपुण्य असलेल्या व्यक्तींची नेमणूक केली जाते. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्यावर दबाव टाकून या नियुक्त्या केल्याचा गंभीर आरोप करत नियुक्त्या रद्द करण्याची मागणी आता होत आहे.
प्रशासनाने रिक्त असलेल्या ८ अध्यासन केंद्रावर नियुक्त केलेल्या अध्यासन प्राध्यापकांची यादी ९ सप्टेंबर २०२४ रोजी जाहीर केली. त्यानंतर विविध विद्यार्थी संघटनांनी कुलगुरू डॉ. गोसावी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. प्राध्यापक नसलेल्या व्यक्तीची अध्यासन प्राध्यापकपदी नियुक्ती कोणत्या नियमावलीनुसार केली अशी विचारणा केली आहे. त्यावर समाधानकारक खुलासा न केल्यामुळे विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
नाव न छापण्याच्या अटीवर एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या अनेक महिन्यांपासून अध्यासन केंद्रांवर प्राध्यापकांची पदे रिक्त होती. त्यासाठी कुलगुरू डॉ. गोसावी यांच्याकडून दिरंगाई होत होती. अखेर व्यवस्थापन परिषदेतील काही सदस्यांनी लक्ष वेधले. त्यानंतर कोणतीही बैठक न घेता, कोणालाही विश्वासात न घेता थेट यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्या त्या विषयातील तज्ज्ञ, नैपुण्य असलेल्या व्यक्तींची निवड अध्यासन केंद्रावर निवड केल्यास संयुक्तिक ठरते.
विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष आणि पीएचडी संशोधक राहुल ससाणे म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीची तत्काळ हकालपट्टी झाली पाहिजे. त्या जागेवर योग्य व पात्र व्यक्तीची निवड झाली पाहिजे. ज्या निवड समितीने अशा वादग्रस्त व्यक्तीची निवड केली आहे, त्या निवड समितीवरही कारवाई झाली पाहिजे. जाणीवपूर्वक विशिष्ट विचारधारेच्या लोकांकडून सातत्याने महापुरुषांचा अपमान करण्याचे षडयंत्र चालू आहे. कुलगुरू डॉ. गोसावी यांच्यावर कोणाचा दबाव आहे, कोणत्या नियमांनुसार त्यांनी प्राध्यापक नसलेल्या व्यक्तीची अध्यासन प्राध्यापकपदी निवड कशी काय केली, याचा खुलासा करावा. अन्यथा आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही. "
राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसचे अक्षय कांबळे म्हणाले, राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसतर्फे येत्या ३ ऑक्टोबर रोजी तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. तोपर्यंत संबंधित व्यक्तीची हकालपट्टी झाली नाही तर निवड समितीमधील सदस्यांना काळे फासण्यात येईल. आमची मागणी आहे की , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावे एक अध्यासन लवकरच सुरू करण्यात यावे. ज्या प्राध्यापकांवर ॲट्रोसिटीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशा व्यक्तीची नेमणूक कशी काय करण्यात आली. हा महापुरुषांचा अपमान नाही का, असा आमचा कुलगुरूंना सवाल आहे."
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या मिडिया सेलचे अध्यक्ष अक्षय जैन, म्हणाले, एकीकडे राज्यातील शाळा अदानीला देण्याला सुरुवात झाली आहे. विद्यापीठातील महत्त्वाच्या अध्यासन केंद्रांवर त्या विषयातील तज्ज्ञ, अनुभव नसलेले परंतु विशिष्ठ विचारधारेवर निष्ठा असणारे, महामानवांचा अपमान करणाऱ्या व्यक्तींचे पुनर्वसन करण्यास सुरुवात झाली आहे. प्राध्यापक नसतानाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रावर कशी काय नियुक्ती केली जाते. याचा खुलासा कुलगुरू डॉ. गोसावी यांनी करावा. या नियुक्त्या तातडीने रद्द कराव्यात अशी आमची विनंती आहे.
या संदर्भात कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र- कुलगुरू डॉ. पराग काळकर आणि प्रभारी कुलसचिव ज्योती भाकरे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
विविध अध्यासनावरील नियुक्त्या
-संत नामदेव अध्यासन - डॉ. शामा घोणसे
-डी. एस. सावकार अध्यासन - डॉ. अशोक विश्वनाथ कांबळे
-लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन - डॉ. सुनील दादोजी भंडगे
-लोकमान्य टिळक अध्यासन - डॉ. दिलीप नारायणदास शेठ
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन - डॉ. सुधाकर जनार्दन बोकेफोडे
-पद्मश्री विखे पाटील अध्यासन - डॉ. अनिल माधव कारंजकर
-संत तुकाराम महाराज अध्यासन - डॉ. गजानन वामनराव आंभोरे
-संत ज्ञानदेव अध्यासन - डॉ. अरुणा ढेरे