येरवडा कारागृहासमोरील बांधकामांना ब्रेक
पुणे: येरवडा खुल्या कारागृहाच्या (Yerwada Jail) जागेत ३,००० कैदी क्षमतेच्या नवीन कारागृहाचा प्रस्ताव आहे. त्याचबरोबर महिला खुल्या कारागृहाचे बांधकामदेखील लवकरच सुरू होणार आहे. कैदी क्षमता तिप्पट झाल्यामुळे नवीन कारागृहाचे प्रस्ताव आहेत. त्यामुळे भविष्यात कारागृहाला कोणताही धोका पोहोचू नये म्हणून कारागृह प्रशासन काळजी घेत आहे. त्यादृष्टीने येथील नवीन बांधकामांवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. अगदीच कारागृहाला खेटून असलेल्या बांधकामांना स्थगिती देण्यात आली आहे. यात काॅमरझोन तसेच उत्तम टाऊनस्केप गृहप्रकल्पाचा समावेश आहे. (Latest News Pune)
खबरदारीचा उपाय म्हणून कारागृहाच्या परिसरात नव्याने होणा-या गृह व व्यापारी प्रकल्पांना कारागृह प्रशासनाचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. काॅमरझोन तसेच उत्तम टाऊनस्केप गृहप्रकल्पाच्या बांधकामांना स्थगिती दिल्यानंतर हे बांधकाम करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्राची मागणी कारागृह प्रशासनाकडे करण्यात आली आहे. त्यावर अभिप्राय देण्यासाठीचे पत्र येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ यांच्याकडे पाठविण्यात आले आहे, अशी माहिती अतिरिक्त कारागृह महानिरीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर यांनी ‘सीविक मिरर’ला दिली.
येरवडा कारागृह पूर्वी शहराच्या बाहेर होते. शहराचा विस्तार झाल्यानंतर आता कारागृह शहराच्या मध्यभागी आले आहे. कारागृहाच्या भोवती नागरी वस्ती लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. या भागात आयटी पार्क आले आहेत. कैदी क्षमता तिप्पट झाल्यामुळे नवीन कारागृहाचे प्रस्ताव आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेता भविष्यात कारागृहाला कोणताही धोका पोहोचू नये म्हणून कारागृह प्रशासन काळजी घेत आहे. या भागातील नवीन बांधकामांवर कारागृह प्रशासनाचे बारिक लक्ष आहे. नव्याने होणा-या गृह व व्यापारी प्रकल्पांना कारागृह प्रशासनाचे ना हरकत प्रमाणपत्र ( एनओसी) घेणे बंधनकारक केले आहे. अगदीच कारागृहाला खेटून असलेल्या बांधकामांना स्थगिती दिली आहे.
येरवडा खुल्या कारागृहाच्या जागेत नवीन ३,००० कैदीक्षमतेचे कारागृहाचा प्रस्ताव तयार आहे. या ठिकाणी बहुमजली कारागृह होणार आहे. कारागृह आणि उत्तम टाऊनस्केप यांच्यामध्ये फक्त रस्ता आहे. ही बाब लक्षात आल्यावर उत्तम टाऊनस्केपच्या नवीन फेजच्या बांधकामाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे येथील काम एका स्लॅबनंतर थांबविण्यात आले आहे. महिला खुल्या कारागृहासमोर काॅमरझोन आयटी पार्क आहे. येथील नवीन बांधकामांनादेखील स्थगिती दिली आहे. काॅमरझोनने येथे नवीन बांधकाम करण्याची परवानगी कारागृह प्रशासनाकडे मागितली आहे.
येरवडा मध्यवर्ती कारागृहाची सुमारे ५५० एकर जागा आहे. विमानतळ रोड आणि विश्रांतवाडी ते बर्माशेल (५०९) चौक रोड, शाहू महाराज चौक ते अग्रसेन हायस्कूल रस्ता अशा तीन रस्त्यांच्या मध्ये कारागृह प्रशासनाची जागा आहे. अतिशय मोक्याच्या ठिकाणी ही जागा आहे. यामध्ये दौलतराव जाधव कारागृह अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय , शेती, खुले कारागृह, महिला कारागृह, महिला खुले कारागृह यासह कारागृह कर्मचारी वसाहत, येरवडा कारागृह मुद्रणालय आणि त्यातील कर्मचाऱ्यांची वसाहत असे विभाग आहेत. यापैकी येरवडा मध्यवर्ती कारागृह ६० एकरात वसलेले आहे.
पुण्याच्या विस्तारानंतर येरवडा कारागृह शहराच्या मध्यवर्ती भागात आल्याने कारागृहाचे दुसरीकडे स्थलांतर करण्याचा विचार काही राजकीय मंडळींच्या डोक्यात आला होता. एवढी अब्जावधी रूपयांची जागा कोणाच्या तरी घशात जाणाच्या बेतात होती. मात्र सत्तांतर नाट्यानंतर हा विषज बाजूला पडला आहे. भविष्यात कारागृहाचे स्थलांतर झाल्यास आश्चर्य वाटायला नको, अशी चर्चा स्थानिक नेत्यांमध्ये आहे.
काॅमरझोन आयटी पार्कने बांधकामासाठी ना हरकत प्रमाणपत्राची (एनओसी) मागणी केली आहे. मात्र, अशी परवानगी देणे सयुक्तिक ठरणार आहे का, यावर अभिप्रयासाठी येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या अधिक्षकांना पत्र पाठविले आहे.
- डाॅ. जालिंदर सुपेकर, अतिरिक्त कारागृह महानिरीक्षक
काॅमरझोन आयटी पार्कमधून महिला कैद्यांवर लक्ष
काॅमरझोन आयटी पार्क ही संपूर्ण काचेची इमारत आहे. त्यामुळे येथील कर्मचारी महिला खुल्या कारागृहातील कैद्यांच्या बारीक हालचाली सहज पाहतात. काही वर्षानंतर येथील महिला खुल्या कारागृहाचा विस्तार होणार आहे. यासह नवीन कारागृह झाल्यास समोरील कैद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाऊ शकते. त्यामुळे संवेदनशील कारागृहातील अनेक गोष्टी बाहेर येऊ शकतात. त्यामुळे कारागृह प्रशासनाने येथील बांधकामांसाठी काटेकोर नियम बनविले आहेत.