पुणे : आसनव्यवस्था बदलामुळे प्रवाशांचा गोंधळ

मध्य रेल्वेने आपल्या रेल्वेगाड्यांतील डब्यांत नुकतेच काही रचनात्मक बदल केले आहेत. त्यामुळे प्रवासी संभ्रमित झाले आहे. मध्य रेल्वेच्या डब्यांतील छोट्या भागातील मधला बर्थ ऐनवेळी हटवल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला आहे.

Pune Railway

पुणे : आसनव्यवस्था बदलामुळे प्रवाशांचा गोंधळ

मध्य रेल्वेच्या डब्यांतील छोट्या भागातील मधला बर्थ अचानक हटवला

मध्य रेल्वेने आपल्या रेल्वेगाड्यांतील डब्यांत नुकतेच काही रचनात्मक बदल केले आहेत. त्यामुळे प्रवासी संभ्रमित झाले आहे. मध्य रेल्वेच्या डब्यांतील छोट्या भागातील मधला बर्थ ऐनवेळी हटवल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला आहे.

रेल्वे ही बहुसंख्य प्रवाशांचा पसंतीचे प्रवास साधन आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांची दूर पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वे ही पहिली पसंती असते. वाजवी शुल्क आणि सोयी-सुविधांमध्ये रेल्वेने आपल्या इप्सित स्थळी सुखरूप पोहोचता येते. तथापि, प्रवासाच्या सुरुवातीला उडालेल्या गोंधळामुळे त्यांना मनस्तापाला तोंड द्यावे लागत आहे. (Pune: Confusion Among Passengers Due to Seat Arrangement Changes)

कल्पना करा की तुम्ही तुमच्या वृद्ध पालकांसाठी खालचे आसन-बर्थ राखून ठेवला आहे. पण तुम्ही रेल्वेत येता तेव्हा तुमच्या लक्षात येते, तुम्ही आरक्षित केलेले आसन क्रमांक बदलले आहेत.

 तुम्ही आरक्षित केलेले खालचे बर्थ वर गेले आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची किंवा दिव्यांगांची मोठी गैरसोय होत आहे. आपल्या सोयीसाठी नीट शहानिशा करून आसन आरक्षित केल्यानंतर ऐनवेळी असा गैरसोयीचा आसन बदल पाहून बहुसंख्यांना मनस्तापाला तोंड द्यावे लागत आहे. डब्याच्या बाजूच्या अरुंद भागात तीन बर्थ होते. मात्र, ते आता तिसरा बर्थ हटवून दोन बर्थ केले आहेत. परिणामी आसन, बर्थ क्रमांक बदलले आहेत.

अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला असला तरी, रेल्वे अधिकाऱ्यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या अरुंद जागेत तिसऱ्या बर्थमुळे प्रवाशांची अडचण होत असल्याच्या तक्रारी होत्या. ऑक्टोबरमध्ये अंतरिम आगाऊ आरक्षण हंगाम संपल्यानंतर ही समस्या जाणवणार नाही, असा रेल्वे अधिकाऱ्यांचा दावा आहे.

ज्या प्रवाशांनी डब्याच्या मोठ्या भागातील तळाच्या, मध्यभागी आणि वरच्या बर्थसाठी ऑनलाइन तिकीट नोंदवले होते, त्यांना पुणे रेल्वे स्थानकावर रेल्वेत आल्यानंतर असे दिसले, की त्यांची आसनव्यवस्थाच बदलली आहे. ऐनवेळी हे समजल्याने त्यांचा मोठा गोंधळ उडाला आणि मोठी निराशा झाली. शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना वरच्या बर्थवर चढण्यात अडचण असल्याने काळजीपूर्वक तळाचा बर्थ ऑनलाइन नोंदवला होता, त्यांना डब्यात पोहोचल्यानंतर हे पाहून धक्का बसला की त्यांचा आरक्षित खालचा बर्थ आता वरचा बर्थ झाला आहे. (उदाहरणार्थ आसन क्रमांक ९  वरच्या बर्थ क्रमांक ११ च्या ठिकाणी गेला.)

'सीविक मिरर'च्या चमूने  पुणे-नागपूर गरीबरथ एक्स्प्रेस पुणे रेल्वे स्थानकावरून निघण्यापूर्वी त्यात चढून अशा अनेक अस्वस्थ प्रवाशांशी संवाद साधला. नरेश शिंदे आणि त्यांची पत्नी अनिता यांना रेल्वेस्थानकावर पोहोचल्यानंतर त्यांनी ज्या डब्यात 'ऑनलाईन तिकीट' आरक्षित केले होते तो डबाच गायब असल्याचे समजल्याने त्यांना धक्का बसला. अनिता म्हणाल्या, “आम्हाला दुसरा बदललेला डबा देण्यात आला होता. जिथे आम्हाला मधला आणि वरचा बर्थ देण्यात आला. आम्ही आरक्षण करताना तळातील आणि मधला बर्थ नोंदवला होता. नवीन डब्यांच्या लहान विभागातील मधला बर्थ काढून टाकल्यामुळे सर्व गोंधळ निर्माण झाला आहे, ज्यामुळे सर्व बर्थ क्रमांक बदलून आसनव्यवस्था बदलली आहे. डब्यातील मोठ्या भागातील आसनव्यवस्थेत पुरेशा जागेमुळे ही अडचण येत नाही. डब्यातील अरुंद भागातील मधल्या बर्थमुळे प्रवाशांना झोपण्यास अडचण येत होती. मात्र, हा बर्थ हटवण्याच्या निर्णयास विलंब झाला आहे. ”

आणखी एक प्रवासी रत्नाकर भोसले म्हणाले की, ‘‘काही प्रवासी शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती मातांसाठी आसनव्यवस्था बदलण्यास अनुकूल असतात. मात्र, प्रत्येक जण तसे करत नाही. अन्य एक प्रवासी अनिल इंदाणे यांनी स्पष्ट केले, "डब्यातील एक आसनकक्षात मोठ्या आणि छोट्या विभागात एकूण नऊ बर्थ होते,  आता एक बर्थ काढून टाकल्याने ही संख्या आठ झाली आहे."

ऐंशी वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सुनीता साबणे यांनी सांगितले की, त्यांनी खालचा आसन क्रमांक ९ आरक्षित केला होता. मात्र त्यांची प्रतीक्षा यादीतून आरक्षण निश्चित झाल्यानंतर त्यांना वरचा बर्थ क्रमांक ११ मिळाला होता. त्यांच्या नातलग नातेवाईक संगीता देशपांडे यांनीही सांगितले की, त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या एका शारीरिकदृष्ट्या विकलांग तरुणीलाही बाजूच्या विभागात वरचा बर्थ मिळाला.

'प्रवाशांच्या सोयीसाठीच निर्णय'

'सीविक मिरर'ने याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू आर. दुबे म्हणाल्या, “१२० दिवसांचा आरक्षण कालावधी १३ ऑक्टोबर रोजी संपला की, आसन क्रमांक आणि बर्थ जुळण्याची समस्या त्यापुढे उद्भवणार नाही. रेल्वे डब्यातील छोट्या भागात अतिरिक्त आसन तयार करण्याचा प्रयोग होता. मात्र तेथे होत असलेली जागेची अडचण आणि प्रवाशांच्या होत असलेल्या गैरसोयीमुळे प्रचंड नाराजी होती. त्यामुळे डब्यांमधून या भागातील मधला बर्थ काढून टाकला. ऑनलाइन आसनस्थिती समजून घेण्याचे पर्याय उपलब्ध आहेत, परंतु प्रतीक्षा यादीतील ज्या प्रवाशांचे आसन निश्चित झाले त्यांना या आसनव्यवस्था क्रमांक न जुळण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. १३ ऑक्टोबरपर्यंत या समस्यांचे निराकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.’’

डब्यातील अरुंद भागातील मधला बर्थ काढून टाकल्यामुळे आरक्षित केलेले आणि उपलब्ध बर्थमध्ये तफावत निर्माण झाली आहे. त्याचा ऑनलाइन बुकिंगवर परिणाम होत आहे. गोंधळ टाळण्यासाठी त्यांनी बर्थ हटवण्याच्या काळातही आरक्षण नोंदणी प्रक्रिया थांबवली नाही, असेही दुबे यांनी नमूद केले.

वादाचे प्रसंग वाढले

तिकीट कलेक्टर धमेंद्र कुमार यांनी सांगितले की, दोन महिन्यांपूर्वी मधल्या बर्थशिवाय नवीन डबे कार्यान्वित केले आहेत, यापूर्वी ज्यांनी आरक्षण केले आहे त्यांच्या आरक्षण आसन क्रमांकाशी नवी आसनव्यवस्था जुळत नसल्यामुळे समस्या निर्माण होत आहेत. खालच्या बर्थचे प्रवासी पाठीच्या समस्यांसारख्या शारीरिक समस्यांचे कारण देऊन ऐनवेळी परस्पर सामंजस्याने आसन बदल करण्यास नाखूष असतात. आमच्यासाठी कोणी जुळवून घेणार नसेल तर आम्ही तरी कशाला जुळवून घ्यायचे? असे त्यांचे म्हणणे आहे. ही समस्या आणखी महिनाभर कायम राहण्याची अपेक्षा आहे. मात्र, त्यामुळे प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी यांच्यात दररोज वादाचे प्रसंग वाढले आहेत.

रेल्वे डब्यांतील छोट्या अरुंद भागातील आसनव्यवस्थेत मधल्या बर्थची रचना अतिरिक्त आसनव्यवस्था तयार करण्याचा एक प्रयोग होता. मात्र, त्यामुळे जागेची अडचण होत असल्याने आणि त्यामुळे प्रवासी अस्वस्थ होत असल्याने या डब्यांतून मधला बर्थ हटवण्यात आला आहे.

- इंदू दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest