पुणे शहर करणार रेबिजमुक्त; राज्यातील पहिले शहर ठरणार, २०३० पर्यंतचे टार्गेट

केंद्र सरकारच्या धोरणानुसार राज्यातील पुणे शहर हे २०३० पर्यंत रेबिज मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागात कृतिदलाची स्थापना केली असून कुत्र्यांची नसबंदी तसेच शस्त्रक्रियेवर भर दिला जाणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Dilip Kurhade
  • Edited By Admin
  • Wed, 10 Jul 2024
  • 10:32 am
Pune news,  central government, rabies, sterilization, Municipal Corporation, PMC, dogs sterilization

संग्रहित छायाचित्र

पालिकेच्या आरोग्य विभागात कृतिदलाची स्थापना, नसबंदी, शस्त्रक्रियेवर भर

केंद्र सरकारच्या धोरणानुसार राज्यातील पुणे शहर हे २०३० पर्यंत रेबिज मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागात कृतिदलाची स्थापना केली असून कुत्र्यांची नसबंदी तसेच शस्त्रक्रियेवर भर दिला जाणार आहे.

 रेबिज निर्मूलनासह शहरातील नागरिकांच्या आणि प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. नागरिकांमध्ये रेबिज विषाणूच्या  विरोधात लढण्यासाठी  सत्तर टक्के प्रतिकारशक्ती ( हार्ड इम्युनिटी) तयार करण्याचा प्रयत्न असणार असल्याची माहिती पुणे महापालिकेचे मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंडे यांनी ‘सीविक मिरर’ला दिली.

 रेबिज आजारावर उपचार नाहीत. प्रतिबंधात्मक उपाययोजना हाच एकमेव मार्ग आहे. कुत्रा चावल्यामुळे होणारा रेबिज हा आजार जीवघेणा असून वेळीच योग्य उपचार मिळाले तरच जीव वाचवता येऊ शकतो. कुत्रा चावल्यानंतर वैद्यकीय उपचारांबाबत खूप कमी प्रमाणात जनजागृती आहे. त्यामुळे रेबिजमुळे गेल्या वर्षी पुणे शहरात सहा तर शहराबाहेरील तब्बल ५२ जणांचा मृत्यू  झाला आहे.  

केंद्र सरकारच्या रेबिज निर्मूलन अभियानात राज्यातील पुणे आणि मुंबई ही दोन शहरे २०३० पर्यंत रेबिजमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने कृतिदलाची (टास्कफोर्स) स्थापना केली आहे.  

पुणे शहरात भटक्या आणि मोकाट कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया व लसीकरण विविध संस्थांच्या माध्यमातून होते. ब्लूक्रॉस सोसायटी, ॲनिमल वेल्फेअर असोसिएशन, युनिवर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटी अशा संस्थांच्या माध्यमातून दरवर्षी पुणे शहरातील भटक्या  कुत्र्यांना ॲंटिरेबिज लस दिली जाते. गेल्या साडेसहा वर्षांत या संस्थांनी ५७,४७४ कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया केली तसेच ॲंटिरेबिजची लस दिली आहे.  पुणे शहर २०३० पर्यंत रेबिज मुक्त होणार असल्याचा दावा पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे.  त्यासाठी पुणे महापालिकेच्या  आरोग्य विभागाने कंबर कसली आहे.  

गेल्या दीड वर्षांत ३५,९७३ जणांना कुत्र्याचा चावा
या वर्षी जानेवारी ते जून  या सहा महिन्यात १२,९८५ पुणेकरांना कुत्र्याने चावा घेतला आहे. गेल्या दीड वर्षांत ३५,९७३  जणांना  कुत्र्याने चावा घेतल्याची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागात आहे. महापालिकेच्या शहरातील कमला नेहरू , राजीव गांधी या मुख्य रुग्णालयात तसेच ५० दवाखान्यात ॲंटिरेबिजची लस उपलब्ध आहे.  ही लस मोफत रुग्णाला उपलब्ध असल्याची माहिती डॉ. सारिका फुंडे यांनी ‘सीविक मिरर’ला दिली.

रेबिज एक विषाणूजन्य आजार
प्राण्यांनी चावल्यामुळे विशेषत: कुत्रा चावल्यामुळे पसरणारा रेबिज हा एक विषाणूजन्य ( व्हायरस) आजार आहे. रेबिजचा विषाणू शरीरात शिरल्यानंतर मज्जासंस्थेवर हल्ला करतो. यामुळे डोक्यात आणि मणक्यात सूज येते. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार रेबिज व्हायरस रुग्णांच्या डोक्यात शिरला तर रुग्ण कोमात जाऊ शकतो किंवा त्याचा मृत्यू होऊ शकतो. काही रुग्णांमध्ये पॅरालिसिसची समस्या निर्माण होऊ शकते.

केंद्र सरकारचे रेबिजमुक्त भारत अभियान सुरू झाले आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील पुणे आणि मुंबई ही दोन शहरे घेतली आहेत.  २०३० पर्यंत राज्यातील पुणे शहर हे पहिले रेबिज मुक्त शहर करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने कृतिदल स्थापन केले आहे.  केंद्र सरकारकडून ॲंटिरेबिज लस खरेदी करण्यासाठी दीड कोटी रुपयांची मागणी केली आहे.  
- डॉ. सारिका फुंडे, मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी, पुणे महापालिका

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest