पुणे: ब्रिटीशकालीन बंगले होणार इतिहासजमा!

येरवड्यातील विमानतळ रस्त्यावर शंभर ते सव्वाशे वर्षांपूर्वीचे सोळा ब्रिटीशकालीन बंगले आहेत. या बंगल्यांमध्ये पूर्वी ब्रिटीश अधिकाऱ्यांचे वास्तव्य होते. हे बंगले इतिहासाची साक्ष देत आहेत. प्रत्येक बंगले वास्तुस्थापत्याचा नमुना आहे.

संग्रहित छायाचित्र

‘पीडब्ल्यूडी’ पाडणार विमानतळ रस्त्यावरील सव्वाशे वर्षांपूर्वीचे सोळा बंगले, होणार नवी सरकारी कार्यालये अन् २५ लाख चौरस फुटाचा मेट्रो मॉल

येरवड्यातील विमानतळ रस्त्यावर (Airport Road Yerwada) शंभर ते सव्वाशे वर्षांपूर्वीचे सोळा ब्रिटीशकालीन बंगले (British-era bungalows) आहेत. या बंगल्यांमध्ये पूर्वी ब्रिटीश अधिकाऱ्यांचे वास्तव्य होते. हे बंगले इतिहासाची साक्ष देत आहेत. प्रत्येक बंगले वास्तुस्थापत्याचा नमुना आहे. यामध्ये प्रशस्त खोल्या, दगड व लाकडापासून केलेले बांधकाम आहे. सर्व खोल्यांमध्ये खेळती हवा असल्यामुळे ऐन उन्हाळ्यांतही थंड वातावरण बंगल्यात राहते. बंगल्यांभोवती मोकळी जागा आहे. बंगल्यात अनेक सरकारी कार्यालये आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने ( पीडब्ल्यूडी) वेळोवेळी देखभाल आणि दुरूस्तीमुळे या बंगल्यांना नवीन झळाळी दिली. मात्र, ‘पीडब्ल्यूडी’ आता हे ब्रिटिशकालिन महत्त्वाचे बंगले पाडून येथे फौजदारी न्यायालय, सेंट्रल बिल्डींग क्रमांक -२, जमाबंदी आयुक्त कार्यालयासह ‘पीएमआरडीए’ येथे उभारणार आहे. तसेच येथे २५ लाख चौरस फुटाचे मेट्रो मॉल बांधणार आहे. त्यामुळे हे सर्व बंगले आता इतिहासजमा होणार आहेत. 

नगर रस्त्यावरील गुंजन चौक ते येरवडा टपाल कार्यालया दरम्यान हे ब्रिटीशकालीन सोळा बंगले आजही इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. या सर्व बंगल्यात ब्रिटीश अधिकारी राहत होते. त्यामुळे प्रशस्त बंगले, मोठ्या खोल्या, लाकडी जीने, बंगल्याभोवती उद्यान, कारंजे, प्रशस्त प्रवेशव्दार पाहण्यास मिळते. अशा सोळ्या बंगल्यात राज्य सरकारची विविध कार्यालय आज थाटलेली आहेत. आता काही दिवसात हे बंगले कालबाह्य होणार असल्याने या बंगल्यांवर टाकलेली ही धावती नजर.

पहिल्या क्रमाकांच्या बंगल्यात हवेली तालुक्याचे भूमि अभिलेख कार्यालय आहे. दोन व तीन क्रमाकांच्या बंगल्यात सिंचन भवनचे कार्यालय आहे. या बंगल्याचे प्रवेशव्दार आकर्षक आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेते. विभागीय जिल्हा उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक व पुरातत्त्व विभागाचे कार्यालय बंगला क्रमांक चारमध्ये आहे. बंगला क्रमांक चार पाडून या ठिकाणी फौजदारी न्यायालय उभारण्यात येणार आहे. 

पाच क्रमाकांच्या बंगल्यात जिल्हा भूमि अभिलेख व जिल्हा हिवताप नियंत्रण कार्यालय आहे. याठिकाणी २५ लाख चौरस फुटाचे ‘पीएमआरडी’ मेट्रो मॉल उभारणार आहे. भूमि अभिलेख विभागाने बंगला क्रमांक एक व पाचचा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे. येथे सर्व प्रकारचे जागेचे उतारे, सात बारा संगणीकृत पद्धतीने जतन करून ठेवले आहे. अभिलेख तत्काळ मिळावेत म्हणून आधुनिक पद्धतीने कपाटांमध्ये सुरक्षित ठेवले आहेत. मात्र, त्यांना सुद्धा हा बंगला सोडावा लागणार आहे. त्यानंतर त्यांचे स्थलांतर सेंट्रल बिल्डिंग क्रमांक दोन मध्ये होणार आहे. 

पुणे शहर वाहतूक विभागाचे कार्यालय बंगला क्रमांक सहामध्ये आहे. या कार्यालयाची दुरुस्ती केली असली तरी याठिकाणी जामाबंदी आयुक्तांचे कार्यालय व बंगला होणार आहे. बंगला क्रमांक सातमध्ये सिंचन कार्यालय तर बंगला क्रमांक आठमध्ये विद्युत निरीक्षक व सांख्यिकी कार्यालय आहे. नऊ क्रमाकाचा बंगला येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या ताब्यात आहे. विक्रीकर भवनची इमारत बांधण्यासाठी बंगला क्रमांक दहा व तेरा तोडले आहे. रोजगार व स्वयंरोजगार कार्यालय व नगररचना कार्यालयासाठी बंगला क्रमांक अकरा देण्यात आला आहे. बारामध्ये स्थानिक सिंचन भवनचे कार्यालय आहे. बंगला क्रमांक चौदामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे भूमि अभिलेख कार्यालय आहे. गुंजन चौकासमोरील बंगला क्रमांक पंधरामध्ये हवेली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय आहे. भिमाशंकर सरकारी कर्मचारी वसाहतीच्या आवारात असलेल्या बंगला क्रमांक सोळामध्ये उपनियंत्रक वैधमापन शास्त्र विभागाचे कार्यालय थाटले आहे. हे सर्व कार्यालय आता लवकरच इतिहास जमा होणार आहेत.  (British-era bungalows in Pune)

बंगल्यांना झळाळी 

सरकारी कार्यालय म्हटले की तेथे नागरिकांची मोठया प्रमाणात ये-जा असते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळोवेळी या सोळा बंगल्यांची देखभाल व दुरूस्ती केल्यामुळे त्याला झळाळी मिळाली आहे. हे सर्व बंगले पुरातत्त्वदृष्टीने अतिशय महत्त्वाचे असून ब्रिटीशकालीन वास्तुशास्त्राचा सुंदर नमुना पाहण्यास मिळतो. शभंर ते सव्वाशे वर्षांनंतरही हे सर्व बंगले मजबुत आहेत. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest