संग्रहित छायाचित्र
पुणे: अवजड आणि भरधाव डंपरची धडक बसल्यामुळे गंभीर स्वरूपाचे अपघात घडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील काही दिवसांत अशा स्वरूपाच्या प्राणांतिक अपघातांमध्ये वाढ झाली आहे. अशीच एक घटना नगर स्त्यावर घडली असून भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला पतीसह बॅडमिंटन खेळून परत येत असताना हा अपघात झाला. डंपरचालक अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेला. सीसीटीव्हीच्या आधारे त्याचा शोध घेऊन आरोपीला अटक करण्यात आली. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीचंदना विश्वनाथ हेक्टम (वय ३२ ,रा. न्याती इलॉन, वाघोली, मूळ रा. आंध्र प्रदेश) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. दुचाकीस्वार विश्वनाथ गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अनिल अशोक मुदळकर (वय ३२, रा. भावडी रोड, वाघोली) या डंपरचालकाला अटक केली आहे. हा डंपर विकास पोपट कोळेकर यांच्या मालकीचा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वनाथ आणि श्रीचंदना ही दोघे दुचाकीवरून रविवारी सकाळी बॅडमिंटन खेळायला गेले होते. साधारण सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ते बॅडमिंटन खेळून घरी निघाले होते. नगर रस्त्यावर असलेल्या चितळे मिठाई या दुकानासमोरून ते निघाले होते. त्यावेळी भरधाव आलेल्या डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
जोरात धडक बसल्याने दोघेही खाली पडले. डंपरचे चाक श्रीचंदना यांच्या अंगावरून गेल्याने त्या चिरडल्या गेल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला. विश्वनाथ यांना गंभीर इजा झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आरोपी डंपरचालक पसार झाला. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.