संग्रहित छायाचित्र
व्या वसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) राबवण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेसाठीची (सीईटी) नोंदणी प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून राबवण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेसाठीची (सीईटी) नोंदणी प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने नोव्हेंबरमध्ये जाहीर केलेल्या परीक्षेच्या संभाव्य वेळापत्रकानुसार मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी प्रथम नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून १९ व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा घेण्यात येते. त्यात कला विभाग, तंत्र शिक्षण विभाग, उच्च शिक्षण विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयारी करण्यास अवधी मिळावा यासाठी २७ नोव्हेंबर रोजी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून संभाव्य वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार १६ मार्च ते २७ एप्रिल २०२५ या ४५ दिवसांच्या कालावधीत प्रवेश परीक्षा होणार आहेत. संभाव्य वेळापत्रकानुसार मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षांसाठीची नोंदणी प्रक्रिया पुढील आठवड्यात २३ ते २७ नोव्हेंबरदरम्यान टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे, तर उर्वरित अभ्यासक्रमांसाठीची नोंदणी प्रक्रिया त्यानंतर सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
नोंदणी प्रक्रिया सुरू होणारे अभ्यासक्रम
एम.एड., एमपी.एड, एमबीए, एमएमएस, एलएलबी तीन वर्ष, एमसीए, बी.एड, बीपीएड, एम.एचएमसीटी, बी.एचएमसीटी, एम.एचएमसीटी एकात्मिक, बी. ए बीएड, बीएससी बी.एड. (एकात्मिक), बी.एड.- एम. एड. (तीन वर्ष एकात्मिक), बी. डिझाईन या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
नोंदणी जानेवारीमध्ये
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेपैकी एमएचटी सीईटी ही महत्त्वाची परीक्षा असते. या परीक्षेला दरवर्षी साधारणपणे सहा लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी नोंदणी करतात. या परीक्षेला महाराष्ट्रासह परराज्यातूनही नोंदणी होते. या परीक्षेसाठीची नोंदणी १ जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. एमएचटी सीईटी (पीसीबी) गटाची परीक्षा ९ ते १७ एप्रिल २०२५ तर एमएचटी सीईटी (पीसीएम) गटाची परीक्षा २७ ते २९ एप्रिल २०२५ या कालावधीत संभाव्य वेळापत्रकानुसार होण्याची शक्यता आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.