संग्रहित छायाचित्र
कल्याणीनगर पोर्शे अपघातानंतर (Kalyani Nagar Porsche Car Accident) राज्य उत्पादन शुल्क विभागाला जाग आली असून पुणे कार्यालयाने पुणे शहर, पिंपरी-चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलांना मद्य पुरवठा, हॉटेल आवारात (प्रिमायसेस) मद्य सेवा, विनापरवाना मद्य विक्री आदी कारणांसाठी १४२ हॉटेलवर दंडात्मक कारवाई केली आहे. यातील ६८ हॉटेल व पबचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. उत्पादन शुल्कच्या तपासणीत जर कोणी अल्पवयीन मुलांना मद्य देताना आढळल्यास त्याचा परवाना रद्द करणार असल्याची माहिती पुणे उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक सुजित पाटील (Sujit Patil) यांनी 'सीविक मिरर' ला दिली.
कल्याणीनगर पोर्शे अपघातानंतर सर्व यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. माध्यमांचा व पुणेकरांचा दबाव वाढल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने तीन आठवड्यात पब, हॉटेलची झाडाझडती घेतली. यामध्ये अल्पवयीन मुलांना मद्य देणे, मद्य पिण्याचा परवाना नसणे, हॉटेल-पब आवारात मद्य सेवा देणे अशा विविध कारणांसाठी १४२ हॉटेल, पबवर कारवाई केली. त्यापैकी ६८ हॉटेल, पबचा परवाना रद्य करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक सुजित पाटील यांनी दिली. (Pune Excise Department)
अतिक्रमण विभागाचा साक्षात्कार
पालिकेचा अतिक्रमण विभाग इतर वेळेस रस्त्यावरील भाजी मंडई, फेरीवाले, पथारीवाले यांच्यावर नियमित कारवाई करताना दिसतो. त्यांनी कित्येक वर्ष हॉटेल, पबकडे लक्ष दिले नव्हते. मात्र, कल्याणीनगर प्रकरणानंतर पुणेकरांचा वाढलेला दबाव लक्षात घेऊन हे लोण आपल्यापर्यंत येण्याआधी हॉटेल, पबवर कारवाई करा असा सज्जड दम अधिकाऱ्यांच्या बैठकीत महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी दिला होता. त्यानंतर केवळ शहराच्या एकाच विभागातील म्हणजे कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, विमाननगर, खराडी, मुंढवा या परिसरातील हॉटेल, पबवर कारवाई करण्यात आली. मात्र, शहरातील इतर ठिकाणी असलेल्या अतिक्रमणाचे काय, ही कारवाई कधी होणार, असा प्रश्न आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) कार्यकर्ते अमित म्हस्के (Amit Mhaske) यांनी विचारला आहे.
मालकांच्या वाढल्या फेऱ्या
कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, विमाननगर, खराडी, मुंढवा आणि कोंढवा परिसरातील पब, हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. या परिसरातील अनेक हॉटल, पब मालकांची उत्पादन शुल्क अधीक्षकांना भेटण्यासाठी रांग लागली आहे. अनेक प्रकारे विनंती, विनवण्या करताना ते दिसत आहेत. मात्र, परवाना रद्दचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात असल्याचे सांगून त्यांना अधिकारी परत पाठवत आहेत. काहीजण थोडे थांबा, वातावरण शांत होऊ द्या, असे समजावत आहेत. मात्र, आर्थिक गणित कोलमडलेले हताश मालक अधीक्षकांच्या भेटीसाठी आग्रह करताना दिसत आहेत.
पुणे शहरातील नियमभंग करणाऱ्या १४२ हॉटेल, पबवर कारवाई केली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलांना मद्य सेवा देणे, मद्य पिण्याचा परवाना नसणे, हॉटेल, पबच्या आवारात मद्यपानास परवानगी देणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई केली आहे. त्यापैकी ६८ हॉटेल, पबचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे
- सुजित पाटील, उपअधीक्षक, उत्पादन शुल्क पुणे विभाग