कोरेगाव भीमा परिसरात तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त
कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) येथील विजयस्तंभाच्या (vijay stambh) परिसरात ३१ डिसेंबर व २ जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत तब्बल तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त (Police arrangement) असणार आहे. यामध्ये आठ पोलीस उपायुक्त, २२ सहाय्यक पोलीस आयुक्त, ८८ पोलीस निरीक्षक , २७१ सहायक पोलीस निरीक्षक व उपपोलीस निरीक्षक, तर ८०० होमगार्डचा समावेश असल्याची माहिती परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी 'सीविक मिरर'ला दिली.
विजयस्तंभ परिसरात सुरक्षेच्या उपायोजनांसह आजूबाजूच्या गावातदेखील पोलीस बंदोबस्त नेमण्यात येणार आहे. कोरेगाव भीमा या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या लाखो लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेण्यात येणार आहे. दरवर्षी येथे अभिवादन करणाऱ्या अनुयायांची संख्या वाढत असल्यामुळे या परिसरात तीन हजारावर अधिक पोलिसांचा बंदोबस्त देण्यात येणार आहे. नुकतेच पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार , सह पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, संभाजी कदम, आर. राजा, रोहिदास पवार, वाहतूक पोलीस उपायुक्त विजय मगर, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ काईंगडे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी विजयस्तंभ परिसराची पाहणी करून सुरक्षेचा आढावा घेतला.
विजयस्तंभाच्या आत येण्याच्या व बाहेर जाण्याच्या दोन्ही मार्ग प्रशस्त करा, स्तंभाकडे जाणाऱ्या रॅम्पची मागील वर्षीपेक्षा रुंदी वाढवावी, आपत्कालीन मार्ग सज्ज ठेवावेत, कोरेगाव भीमासह आजूबाजूच्या परिसरातदेखील आवश्यक पोलीस बंदोबस्त नेमण्यात यावा, तसेच साध्या वेशातील पोलिसांची गस्त वाढवावी अशा अनेक महत्त्वपूर्ण सूचना यावेळी पोलीस आयुक्तांनी दिल्या.
सुरक्षेसाठी पाच ड्रोन व दोनशे सीसीटीव्ही
विजयस्तंभ परिसरात सुरक्षेसाठी पाच ड्रोन व २०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. पार्किंगसाठी २० मोकळी मैदाने निश्चित करण्यात आली असून तुळापूर फाट्यापासून विजयस्तंभाकडे येण्यासाठी बसेसची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.
विजयस्तंभ परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, वैद्यकीय व पोलीस मदत केंद्र, हिरकणी कक्ष, बेपत्ता नागरिकांसाठी मदत कक्ष तयार करण्यात येणार आहेत. पुस्तक विक्री व भोजन व्यवस्थेसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, बार्टी, आरोग्य विभाग, पीएमपीएल, अग्निशमन दल यांच्यासह विविध विभागांच्या मदतीने कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ परिसरात आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.
दरवर्षी एक जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या लाखो अनुयायांच्या सुरक्षेसाठी पोलीस दलाच्या वतीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. या ठिकाणी बंदोबस्तासाठी सुमारे ३०० हून अधिक अधिकारी व तीन हजार अंमलदार नेमण्यात आलेले आहेत. त्यासोबतच जलदकृती दल (क्यू आर टी), राज्य राखीव दल, बी डी डी एस, दहशतवाद विरोधी पथक, विशेष तपास पथक अशी विविध पथके नेमण्यात आलेली आहेत.
- शशिकांत बोराटे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ चार