संग्रहित छायाचित्र
पुण्यामध्ये दर वर्षी प्रमाणे यंदाही उद्या म्हणजेच रविवारी प्राईड मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या सायंकाळी चार वाजेपासून जेएम रोडवर हा मार्च सुरू होईल. या मार्चमध्ये राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि अतिरिक्त सचिव असणारे श्रीकांत देशपांडे हे सहभागी होणार आहेत. इंडियन एक्स्प्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे.
ट्रान्सजेंडर समुदायाबाबत जनजागृती करण्यासाठी जगभरात प्राईड मंथ साजरा केला जात आहे. पुण्यामध्ये यानिमित्ताने दर वर्षी प्राईड मार्च आयोजित करण्यात येतो. त्यानुसार उद्या श्रीकांत देशपांडे यांच्या उपस्थितीत सायंकाळी चार वाजेपासून जेएम रोडवर हा मार्च सुरू होईल. याबाबत बोलताना देशपांडे म्हणाले की, “मुख्य निवडणूक आयोगाने प्रत्येक पात्र मतदाराची नोंदणी सुनिश्चित करण्यासाठी सर्वसमावेशक लोकशाही संकल्पनेवर भर दिला आहे. याच मोहीमेचा भाग म्हणून ट्रान्सजेंडर समुदायापर्यंत पोहोचणेही आवश्यक आहे. आपण आपल्या कर्मचाऱ्यांसोबत या मोर्चात सहभागी होऊ.”
पुढे ते म्हणाले की, “ट्रान्सजेंडर व्यक्तींचे प्रश्न अगदी वेगळे असतात. समाजाने या व्यक्तींना लांब ठेवले आहे, आणि कित्येक ट्रान्सजेंडर व्यक्तींनीही समाजाला लांब ठेवले आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या पाहता, राज्यात लाखो ट्रान्सजेंडर व्यक्ती आहेत. या सर्वांना मतदार यादीमध्ये घेण्याचे आमचे लक्ष्य आहे”, असेही ते म्हणाले.