राज्यातील पर्यावरणाचे संवर्धन करणे गरजेचे; पोपटराव पवारांचे उद्योजकांना आवाहन
पुणे: माती आणि पाणी हे भविष्यात खूप महत्त्वाचे घटक ठरतील. त्यामुळे उद्योगव्यवसायांसोबत निसर्ग आणि पर्यावरणाचे संवर्धन करणे गरजेचे आहे, असे उद्गार राज्य आदर्शगाव संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी काढले. ऑटोक्लस्टर सभागृहात नुकतेच राज्य औद्योगिक विकास परिषद, पुणे आयोजित भारतरत्न जेआरडी टाटा उद्योग पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते.
ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे अध्यक्षस्थानी होते. या दोन्ही मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रांतील उद्योजकांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये तळवडे येथील अनिल शेटे आणि कात्रज येथील मंगेश पोखरकर यांना भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योगरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याचबरोबर नीलेश बोरचटे (उद्योगभूषण पुरस्कार), गोपीनाथ देशपांडे (उद्योगविकास पुरस्कार), डॉ. अक्षय पवार (उद्योगश्री पुरस्कार), सरपंच विमल ठाणगे (ग्रामभूषण पुरस्कार) आणि श्रेयश पुंड (युवा उद्योजक पुरस्कार) यांना सन्मानित करण्यात आले. तत्पूर्वी सरपंच विमल ठाणगे यांच्या हस्ते वृक्षाला जलार्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. अध्यक्षीय मनोगतातून गिरीश प्रभुणे यांनी, आपण शिवरायांचे वारसदार आहोत. स्वावलंबी होऊन आपल्या उद्योगांच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध करून देणार्या उद्योजकांचे योगदान जगापुढे आले पाहिजे. तसेच त्यांच्या भावी पिढीने स्वतःचे व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
राज्य औद्योगिक विकास परिषदेचे कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविक केले; तसेच पुरस्कारार्थींशी सुसंवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. महेंद्र भारती, सुप्रिया सोळांकुरे, अरुण गराडे, जयवंत भोसले, फुलवती जगताप, राजू जाधव, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. श्रीकांत चौगुले यांनी सूत्रसंचालन केले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.