Pune Police : पोलीस 'अलर्ट मोड' वर! इस्राएल-हमास संघर्षामुळे छाबड हाऊस-लाल देऊळ कडेकोट सुरक्षेच्या गराड्यात

गेल्या सहा दिवसांपासून ' इस्राएल आणि हमास' यांच्यामधील युद्धज्वर वाढत चालला आहे. या युद्धाचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटत आहेत. भारतातदेखील मोठ्या प्रमाणावर इस्राएली नागरिक राहतात. त्यातच पुणे शहरात इस्राएली नागरिकांच्या आस्थेची अनेक ठिकाणे आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Sat, 14 Oct 2023
  • 01:38 pm
Pune Police

पोलीस 'अलर्ट मोड' वर!

इस्राएली नागरिक, प्रार्थनास्थळांवर जागता पहारा

लक्ष्मण मोरे

गेल्या सहा दिवसांपासून ' इस्राएल आणि हमास' यांच्यामधील युद्धज्वर (Israel and Hamas War) वाढत चालला आहे. या युद्धाचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटत आहेत. भारतातदेखील मोठ्या प्रमाणावर  इस्राएली   नागरिक राहतात. त्यातच पुणे शहरात (Pune Police)  इस्राएली नागरिकांच्या (Israeli citizens) आस्थेची अनेक ठिकाणे आहेत. काही ठिकाणी त्यांची लोकवस्ती देखील आहे.  इस्राएल आणि हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस 'अलर्ट' झाले असून पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी शुक्रवारी या संदर्भात उच्चस्तरीय बैठक घेऊन  इस्राएली  नागरिक आणि त्यांची प्रार्थनास्थळे, लाल देऊळ आदी ठिकाणांच्या सुरक्षेचा आढावा घेतला. या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून पोलिसांचा अहोरात्र जागता पहारा ठेवण्यात आला आहे.

पुण्यामध्ये मूळचे ज्यू वंशाचे असलेले  इस्राएली नागरिक राहतात. त्यांची लोकवस्ती प्रामुख्याने पुण्याच्या मध्यवस्तीमधील लष्कर परिसर, वानवडी, कोरेगाव पार्क आदी भागात आहे. या भागात त्यांची प्रार्थनास्थळेदेखील आहेत. तसेच लाल देऊळ हे प्रसिद्ध ठिकाण पुण्यामधील अनेक आकर्षणांपैकी एक आहे. कोरेगाव पार्कमध्ये छाबड हाऊसदेखील आहे. या सर्व ठिकाणी पोलिसांनी जागता पहारा द्यायला सुरुवात केली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सुरक्षेबाबतीत अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याठिकाणी पोलिसांचे अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. काही ठिकाणांवर पोलिसांचा आधीपासूनच जागता पहारा आहे. त्यामध्ये अधिक भर घालण्यात आल्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी 'सीविक मिरर'सोबत बोलताना सांगितले. पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या बैठकीला सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोरेगाव पार्कमधील जर्मन बेकरीमध्ये १३ फेब्रुवारी २०१० रोजी इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने बॉम्बस्फोट घडवून आणला होता. या स्फोटामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला होता. तसेच अनेकजण गंभीर जखमी झाले होते. या घटनेचे आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटले होते. येथून जवळच ज्यू धर्मीयांचे 'छाबड हाऊस' होते. हे ठिकाण देखील दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते. त्यानंतर येथे कायमस्वरूपी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या स्फोटप्रकरणी पुढे हिमायत बेग याला अटक करण्यात आली. कालांतराने भारतीय गुप्तचर यंत्रणांनी केलेल्या कारवाईत यासीन भटकळलाही अटक करण्यात आली होती.

पुण्यामध्ये राहात असलेल्या इस्राएली नागरिकांच्या सुरक्षेची खबरदारी घेण्याचे कडक आदेश दिले आहेत. ज्यू धर्मीय राहात असलेल्या भागात पोलिसांची गस्त वाढविण्यासोबतच प्रमुख ठिकाणांवर पोलीस तैनात केले आहेत. स्थानिक परिमंडळाच्या उपायुक्तांना याविषयी बारकाईने लक्ष घालण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांनी केल्या आहेत. लाल देऊळ येथे निमलष्करी दलाचा कायमस्वरूपी बंदोबस्त आहे. या ठिकाणी आता पोलिसांच्या अतिरिक्त मनुष्यबळाची नेमणूक केली आहे. पोलिसांची वाहनेदेखील भोवताली उभी करण्यात आली आहेत. ज्यू धर्मीयांचे प्रार्थनास्थळ असलेल्या सिनेगॉगच्या परिसरातही बंदोबस्त वाढविला आहे. पुण्यामध्ये एप्रिल महिन्यात पकडलेल्या दहशतवाद्यांकडे मुंबईच्या छाबड हाऊसची छायाचित्रे मिळाली होती. त्यामुळे तेथे तत्काळ सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आलेली होती. पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाच्या आधीदेखील छाबड हाऊस आणि लाल देऊळ यांना धोका असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळालेली होती. मात्र, जर्मन बेकरीबाबत माहिती मिळालेली नव्हती. त्यावेळी स्फोट मात्र जर्मन बेकरीतच झाला.

इस्राएल आणि पॅलेस्टाईन तसेच  इस्राएल आणि हमास असे अनेक संघर्ष नेहमी होत असतात. ज्यू धर्मीय नागरिक जगभरात पसरलेले आहेत. त्यांच्यासंबधी कुठेही संघर्षाची घटना घडली की पुण्यामध्ये त्यांच्याशी संबंधित ठिकाणांना सुरक्षा पुरविली जाते. पुण्यामधील काही महत्त्वाच्या ठिकाणांना दहशतवादी हल्ल्याचा कायमस्वरूपी धोका आहे. त्यामुळे या ठिकाणांना सुरक्षा यंत्रणांकडून कायमस्वरूपी 'अलर्ट' दिलेला आहे. त्यामध्ये छाबड हाऊस आणि लाल देवळाचा समावेश आहे. लष्कर परिसरात लाल देऊळ सोसायटी नावाची रहिवासी सोसायटीदेखील आहे. ज्यू आणि अन्य धर्मीयांमधील संघर्षाचा मुद्दा अत्यंत संवेदनशील असल्यामुळे पोलिसांनी खबरदारी आणि दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने सुरक्षेचे नियोजन करण्यात आलेले आहे.  स्थानिक पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्त, पोलीस निरीक्षक या ठिकाणी स्वत: अधूनमधून गस्त घालून सुरक्षेची पाहणी करणार आहेत.

' इस्राएल-हमास' संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. याबाबत शुक्रवारी उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. यामध्ये  इस्राएल नागरिक आणि त्यांच्याशी संबंधित छाबड हाऊस, लाल देऊळ, सिनेगॉग आदी ठिकाणांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आहे. स्थानिक पातळीवर संबंधित परिमंडलांचे उपायुक्त लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेतली जात आहे.

- रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर पोलीस आयुक्तालय

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest