PMPML Online payment facility : पीएमपीएमएलची 'स्मार्ट सुविधा'! आता खिशात पैसे नसतानाही करता येणार प्रवास; बसमध्ये ऑनलाइन पेमेंटची सुविधा
पुणे : पीएमपीएमल प्रवाशांसाठी महत्वाचा निर्णय पीएमपीएमल कडून घेण्यात आला आहे. लवकरच पीएमपीएमल बसमध्ये कॅसलेस सुविधा उपलब्ध होणार आहे. बसमधून प्रवास करताना, आता सुट्टे पैसे ठेवण्याची गरज पडणार नाही. शिवाय सुट्ट्या पैशांवरून होणाऱ्या रोजच्या कटकटीवर पीएमपीएमलने उपाय शोधला आहे. बसमध्ये ऑनलाइन पेमेंटची सुविधा म्हणजेच युपीआय कोड बसमध्ये लावण्यात येणार आहे. ही सुविधा पुढील आठवड्यापासून सर्व बसमध्ये उपलब्ध होणार असल्याचे पीएमपीएमलकडून सांगण्यात आले आहे.
पीएमपीएमलच्या ताफ्यात सध्या २ हजार १८१ बस आहेत. १५ डेपो अंतर्गत या गाड्यांच्या माध्यमातून पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए भाग आणि काही ग्रामीण भागात ३७८ मार्गांवर बससेवा पुरविली जाते. याद्वारे १२ ते १३ लाख प्रवासी दररोज प्रवास करतात. 'पीक अवर'मध्ये तर पीएमपीच्या बसमध्ये प्रचंड गर्दी बघायला मिळते यावेळी प्रवाशी आणि वाहकांना सुट्ट्या पैशांसाठी मोठी कसरत करावी लागते. सुट्ट्यां पैशावरून अनेक वेळा वाहक व प्रवाशांमध्ये वादही होतात. दरम्यान यावर पीएमपीएमलने तोडदा काढला आहे. त्यामुळे वाहक आणि प्रवांशी दोघांचीही सुट्ट्या पैशांच्या कटकटीतून सुटका होणार आहे. आता यूपीआय कोड स्कॅन करून प्रवाशांना पीएमपीएलचे तिकीट काढता येणार आहे. पीएमपीएमल प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला असून पुढील आठवड्यापासून पीएमपीएमलच्या सर्व बसमध्ये स्कॅनर उपलब्ध होणार आहे.
बसेसमध्ये गुगल पे आणि फोन पेची सुविधा देण्यात येणार आहे. युपीआय कोड स्कॅन करत प्रवाशांना तिकीट काढता येणार आहे. यामुळे प्रवासी ऑनलाइन पेमेंट करत प्रवास करुन शकतात. पीएमपीएमएलच्या या निर्णयामुळे सुट्ट्या पैशांचा घोळ मिटणार आहे. तसेच प्रवाशांना खिशात पैसे न बाळगता प्रवास करता येणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.