चांदणी चौकात पीएमपी बसचा अपघात
पीएमपी बसचा ब्रेक न लागल्यामुळे अपघात झाल्याची घटना पुण्यातील चांदणी चौकात घडली आहे. सुदैवाने या बसमध्ये प्रवाशी नसल्यामुळे मोठी हाणी टळली आहे मात्र या घटनेत बसचे मोठे नुकसान झाले आहे. आज रविवार (दि. २७) रोजी हा अपघात झाला. चांदणी चौक येथील नवीन पुलाचे उद्घाटन झालेल्या ठिकाणीच हा अपघात झाला आहे. त्यामुळे खरंच चांदणी चौकाचे स्टार उजळले का? असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.
अपघातग्रस्त बस ही चांदणी चौकातून कोथरूड डेपो येथे सीएनजी भरण्यासाठी जात होती. दरम्यान चालकाकडून ब्रेक न लागल्यामुळे बस थेट खड्ड्यात गेली. पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात झाला असून सुदैवाने चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही. ही बस बालेवाडी डेपोची होती.
चांदणी चौकात अद्यापही रस्त्याचे काम चालू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे व बॅरिकेड्स लावण्यात आले आहे. या कामामुळे रस्त्यावर चिखल साचला आहे. रस्त्याच्या कडेला हा चिखल साचल्यामुळे वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. आज झालेला हा अपघात असाच काहीसा असल्याचे दिसून आले आहे. बसचा अपघात झाल्याने या रस्त्यावर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र काही वेळाने वाहतूक सुरळीत झाली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.